" वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ
"नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकामध्ये असणारे हे नाटक जीवनाचे खरेखुरे तत्त्वज्ञान सांगताना, रंगमंचावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या नटाचे म्हातारपण किती क्लेशदायक असू शकते हे दाखवतानाच म्हातारपणाची ससेहोलपट प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेऊन जाते.
या नाटकामध्ये गणपतराव बेलवलकर(अप्पा ),त्यांच्या अर्धांगिनी कावेरी (सरकार), त्यांना असणारी मुलगी नलिनी,मुलगा नंदन, सून शारदा,जावई सुधाकर, मुलीच्या घरी काम करणारा नोकर विठोबा आणि शेवटी रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नाते जपत अप्पांना सांभाळणारा राजा अशी पात्रे आहेत. प्रत्येक पात्राच्या तोंडी असणारी वाक्ये काही वेळा फक्त शांत बसून विचार करायला भाग पाडतात. या नाटकाची सुरुवात होते ती एका दृष्यामधून, त्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती खुर्चीवर बसलेली आहे. आणि ते रंगभूमीवर कशाप्रकारे दाखल झाले, याबद्दलचा प्रवास प्रेक्षकांना सांगत आहेत. ती माहिती सांगत असताना, रंगमंचावर अभिनय करणाऱ्या कलाकाराला फक्त प्रेक्षकांचे प्रेमच ऊर्जा देत असते आणि त्यामुळेच सुरुवातीला बरीचशी संकटे असतानाही गणपतराव बेलवलकर (अप्पा) या नाटकामध्ये असणारे प्रमुख पात्र, चाळीस वर्षे रंगभूमीची सेवा करताना दिसतात.हे ते त्यांच्या सुरुवातीच्या संवादातून व्यक्त होताना दिसतात. रंगभूमीला पंढरी आणि काशी असे संबोधताना ते बऱ्याच वेळा भावनिक होतात.हे मुख्य पात्र नाटकाचा आत्मा आहे असे म्हणायला हरकत नाही.त्यांनी चाळीस वर्षांच्या कालावधीत अनेक भूमिका साकारल्या आणि त्यामुळेच त्यांना नटसम्राट ही पदवी देण्यात आली आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी सर्वजण जमलेले आहेत,असे दृश्य आहे. त्या सत्काराच्या वेळी हार - तुर्यांबरोबरच चाळीस हजार रुपयांची थैलीही त्यांना देण्यात आलेली आहे.आणि या अशा खास सत्कारासाठी ते रंगभूमीचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतात.
त्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना नंदन आणि नलिनी यांना रंगमंचावर बोलवतात. त्यावेळेस आपल्याला मिळालेल्या सत्काराची रक्कम , ते आपल्या दोन्ही मुलांमध्ये वाटणार असल्याचे घोषित करतात. आपण दिलेल्या पैशांचा त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी उपयोग होईल असे त्यांना वाटते. आपल्या मुलांचे वर्णन करताना ते म्हणतात,"अहो, माझी पोरं म्हणजे मोगऱ्याच्या कळ्या आहेत नुसत्या आणि मी त्यांना वाढवले ही फुलासारखं." आप्पा आपल्या निर्णयाने खुश असतात. परंतु; त्यांची पत्नी कावेरी ज्यांना ते नेहमी सरकार या नावाने हाक मारत असतात, त्यांना ही गोष्ट काहीशी खटकत असते. त्यांनी जी निरवानिरव केलेली असते,त्याबद्दल अप्पा ज्यावेळी विचारतात, त्यावेळी त्या म्हणतात, "आजच एवढी घाई कशाला करायला हवी होती आणि माणसं वाईट नसली तरी म्हातारपण वाईट असतं. पुढचं वाढलेलं ताट द्यावं, पण बसायचा पाठ देऊ नये माणसानं."आणि हळूहळू त्याचाच प्रत्यय येताना दिसतो. अप्पा आणि कावेरी हे दोघे आपल्या मुलाकडे राहायला लागतात. सुरुवातीचे काही दिवस खूप चांगल्या पद्धतीने जातात.पण पुढे त्यांची सून शारदा,तिला अप्पांच्या काही गोष्टी खटकायला लागतात. त्यांचे मोठमोठ्याने नाटकामधील डायलॉग मारणे ही गोष्ट शारदाला अजिबात आवडत नाही. त्यांची नात सुहासिनी अप्पा यांच्या सोबत नेहमी खेळत , दंगामस्ती करत, पण हेही शारदाला आवडत नाही.आणि एके दिवशी ती ही गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगते. त्यातून काही वादविवाद होतात, त्यावेळी कावेरी अप्पांना सांगते की, आपला या ठिकाणी सतत अपमान होतोय, त्यापेक्षा आपण आपल्या मुलीपाशी राहायला जाऊ आणि बऱ्याच दिवसापासून ती आणि जावईबापू बोलवत आहेत, या ठिकाणी पहिला अंक संपतो.
दुसऱ्या अंकामध्ये ते दोघे राहिनगर ला आपल्या मुलीकडे राहायला जातात. एका रेल्वे स्टेशनवर मुलगी न्यायला येईल या विचाराने ते दोघे वाट पाहत असताना एकमेकांशी बोलत असतात. त्यावेळी कावेरी म्हणते की, आपण तार केली होती मग आपल्याला न्यायला कोण का नाही आलं? त्यावेळी अप्पा म्हणतात, "तार माणसाच्या घरापर्यंत जाते,माणसाच्या मनापर्यंत जात नाही. घराची दारं उघडी आहेत आणि माणसाच्या मनाची बंद आहेत. "तिथे बसलेले असताना एक लहान मुलगी, त्यांना आपल्या नातीसारखी वाटते आणि अप्पा चालत्या रेल्वे बरोबर त्या मुली पाठी पळू लागतात. एक हमाल जाऊन त्यांना पकडतो आणि तिकीट कलेक्टरला सांगतो की, या आजोबांना पकडले नसते तर ते रुळाखाली गेली असते.नंतर तिकीट कलेक्टर चौकशी करतात,त्यावेळी त्यांच्या ओळखीचे असणारे सुधाकरचे ते सासरे आहेत हे समजतं. मग तो त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. हे चालू असताना त्यांच्या मुलीने त्यांना आणायला पाठवलेला नोकर विठोबा त्या ठिकाणी पोहोचतो. आणि त्यांना घरी घेऊन जातो. या ठिकाणीही सुरुवातीचे दिवस चांगले जातात, पण काही दिवसानंतर नलिनी कमी बोलू लागते. तिच्या वागण्यात बोलण्यात बदल जाणवायला लागतो. पुढे तर ती आपल्या आई-वडिलांची सोय आऊटहाऊस मध्ये विठोबाला करायला सांगते. त्यावेळी नलिनीचा नवरा सुधाकर ति ला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की, " म्हातारपण हे दुसरे बालपण असते." आणि नलिनी त्यावर म्हणते की, "पण या दुसऱ्या बालपणाला आई कुठून आणायची."पुढे- पुढे आपल्या आई-वडीलांपाशी ती खूप कमी जाऊ लागते. हा परकेपणा जाणवू लागल्यानंतर कावेरी अप्पांना सांगते की,नव्याचे नऊ दिवस संपून गेलेत आणि आता अजून वेगळं घडण्याआधी आपण इथून निघून मोरवाडीला जाऊ, या ठिकाणी आता रहावं असं वाटत नाही.
नाट्यसृष्टीतून निवृत्ती घेतल्यानंतर मुलांना रक्कम वाटून देऊन राहिलेल्या रकमेतून अप्पांनी कावेरीसाठी म्हणजे आपल्या पत्नीसाठी चंद्रहार आणला होता. तोच चंद्रहार ती त्यांच्याकडे देते आणि तो मोडून आणून त्यातून मिळणारे पैसे आणायला सांगते. ती त्यावेळी अशी इच्छा व्यक्त करते की, या पैशातून आपण मोरवाडीला,आपल्या गावी जाऊ आणि तिथे आपण दोघे आनंदाने राहू.त्या ठिकाणी तुम्ही नाटकातले डायलॉग म्हणत असताना कोणी तुम्हाला अडवणारही नाही आणि आपल्यामुळे कोणाला त्रासही होणार नाही .पण थकल्यामुळे कावेरीच्या आजारपणावर गावाकडे शहरातल्यासारखे चांगले डॉक्टर मिळतील का? हीच शंका अप्पांच्या मनामध्ये असते.पण कावेरीने मात्र निश्चय पक्का केलेला असतो.पण ही चर्चा झालेली असताना नलिनी अचानक त्या ठिकाणी येते आणि प्रत्येक गोष्ट बघू लागते,त्या ठिकाणी काहीतरी शोधू लागते.त्यांच्या ज्या काही वस्तू एका ट्रंकमध्ये ठेवलेल्या असतात त्याठीकानिही ती शोधते.काय शोधते असं विचारलं असता ती सांगते की, काही सुया हरवल्या आहेत त्या शोधते आहे. काही वेळाने ट्रंकमध्ये बघून ती निघून जाते. या गोष्टीबद्दल त्या घरातील नोकर विठोबाला अप्पा आणि कावेरी विचारतात,त्यावेळी त्यांना असं समजतं की सुधाकरचा झालेला पगार घरातून चोरी झालेला आहे.आणि त्यामुळेच नलिनी पुन्हा पुन्हा आप्पांना,तुम्ही तिकडच्या घरात पेपर वाचायला आला होता का ?हे विचारत होती.हे लक्षात आल्यावर अप्पा रागा- रागाने तिच्याकडे जातात आणि नलिनीला स्पष्ट विचारतात. त्यावेळी नलिनी, तुम्हीच पैसे चोरले असे म्हणते आणि तुम्ही माझ्याकडे मागितले असते तर मी दिले नसते का ?असा प्रति प्रश्न करते. खरं तर तिने पाहिलेली रक्कम ही त्यांनी मोडलेल्या चंद्रहाराची असते. त्यावेळी आपल्या मुलीने चोरीचा आरोप आपल्यावर केला हे त्यांना सहन होत नाही. तेव्हा एक वाक्य आप्पा म्हणतात, "मी चोर आहे! मी चोर आहे !मी आप्पा बेलवलकर नटसम्राट लक्षावधीची मालमत्ता गुलाल बुक्क्याप्रमाणे ज्यांना उधळून दिली तो हा गणपतराव बेलवलकर चोर ठरला. आपल्या पोरांच्या घरामध्ये!" आणि पुन्हा शोधल्यानंतर ते पैसे घरामध्येच सुधाकरच्या पॅंटच्या खिशामध्ये सापडतात. ही चूक कळाल्यानंतर नलिनी मोठ मोठ्याने रडायला लागते. परंतु या घटनेचा कावेरी आणि आप्पा यांच्या मनावर खोलवर परिणाम झालेला असतो आणि या आरोप घेण्यामुळे आपण लवकरात लवकर मोरवाडी ला जाऊया असे म्हणत असतानाच कावेरीच्या छातीत कळ येते आणि ती जमिनीवर कोसळला आणि तिथेच तिचा जीव जातो.
तिसऱ्या आणि शेवटच्या अंकामध्ये कावेरी निघून गेल्यानंतर अप्पा कुणालाही न सांगता मुलीच्या घरातून बाहेर पडतात, दिसेल त्या रस्त्याला, आतापर्यंत जेवढ्या नाटकांत काम केले होते,त्या नाटकामधील वाक्य बडबडत भ्रमिष्ट सारखे फिरू लागतात.असेच फिरत असताना ते एका नाट्यगृहापासून येतात, तेथे आल्यानंतर त्यांना राजा नावाचा एक मुलगा भेटतो आणि तो अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने त्यांची चौकशी करतो. त्यांना प्यायला पाणी देतो, खायला जेवण देतो अन् एक वेगळीच माया लावतो.अप्पा आपल्या आयुष्यबद्दल सांगतात, तो त्याच्या आयुष्याबद्दल सांगतो. त्यांचं एक रक्ता पेक्षा एक घट्ट नातं काही वेळेमध्येच बनून जातं. आणि काही झालं तरी तुम्ही तुमच्या मुलांपाशी पुन्हा अपमान करायला जायचं नाही, कायम माझ्यासोबत राहायचं. असे राजा अप्पाच्याकडून वचन घेतो. परंतु; काही वेळानंतर त्यांना शोधत शोधत नंदन, नलिनी, शारदा, सुधाकर, विठोबा हे सगळे अप्पांच्या पाशी येतात आणि घराकडे परत येण्याची विनवणी करू लागतात. राजा त्यांना पाठवणार नाही असं म्हणतो, त्यावेळी त्याला मारहाण करतात. त्यावेळी अप्पा सगळ्यांच्यावर ओरडून सांगतात की, तुम्ही माझे कोणीही नाही आणि राजा माझा आहे. त्याला तुम्ही काहीही करायचं नाही. आणि शेवटी पुन्हा एकदा शेक्सपियरचे ओथेल्लो, किंग लियर, जुलियस सीझर या सर्व नाटकांमधील वाक्य ते बोलत बोलतच जमिनीवर कोसळतात आणि तेही आपल्या सरकारपाशी निघून जातात.
या पूर्ण नाटकामध्ये एक नटसम्राट ,याची सुद्धा म्हातारपणी कशाप्रकारे अवस्था झाली, हे बघत असतानाही, वाचत असताना सामान्य माणसाच्या म्हातारपणाचा विचार केला तर ही अवस्था किती वाईट असू शकते, याची कल्पना येते. म्हातारपण कोणाला चुकणार नाही आणि त्यामुळे प्रत्येक माणसाने स्वतः त्या अवस्थेत जाऊन थोडा तरी विचार करायला हवा.आणि नक्कीच हे नाटक खूप दूरपर्यंतचा विचार करायला लावते. त्यामुळे प्रत्येक साहित्य प्रेमींनी हे नाटक नक्कीच वाचायला हवे हे नाटक वाचल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा अनुभव मिळेल, हे नक्की.
.jpg)
Comments
Post a Comment