Skip to main content

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी" 

                                                                     पुस्तकाचा सारांश  थोडक्यात 

                                                     बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र

       सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादंबरीचे कथानक काय असेल अशी एक वाचक म्हणून मला उत्सुकता वाटत होती आणि या पुस्तकाच्या  नावावरूनच याची कथा काय असेल याविषयी मला समजावून घ्यावसं वाटलं. ज्यावेळी या कादंबरीच्या सुरुवातीचा भाग वाचला, पण सुरुवात करतो तेव्हा पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज बांधत असतो पण मी लावलेल्या अंदाजही काहीसा चुकलेला याठिकाणी  जाणवला.आणि या कादंबरीमध्ये  श्रीकांत आणि श्रीमती ही प्रमुख पात्रे आहेत. या दोन्ही पात्रांभोवती कथा फिरत असल्याचे ही कादंबरी वाचताना जाणवते. 

      या कादंबरीची सुरुवात हुबळीच्या मॉडेल हायस्कूलमध्ये दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या मानाच्या निबंध स्पर्धेचा निकाल इतिहासाचे कुलकर्णी सर वर्गामध्ये जाहीर करताना होते. सम्राट अशोका विषयी अत्यंत प्रगल्भ भाषेत निबंध लिहिणारी  मुलगी असते श्रीमती देशपांडे. हा निकाल सरांनी जाहीर केल्यानंतरच श्रीमती या पात्राविषयी एक आगळी वेगळी आपुलकी सुरुवातीपासूनच वाटायला लागते. वर्गातील सर्वात बुद्धिमान आणि हुशार मुलगी म्हणून सर्वजण तिच्याकडे पाहत असतात, तरी तिची नम्रता,मितमितभाषीपणा  आणि तिला तिच्या घरचा परिस्थिती असणारी जाणीव यावरूनच तिच्या स्वभावातील चांगुलपणाबद्दल अगोदरच खूप काही सांगून जाते . तिच्याबरोबर अजून एक मुलगा तितकाच  हुशार आणि बुद्धिमान असतो आणि तो म्हणजे या कादंबरीतील दुसरे प्रमुख पात्र श्रीकांत. या दोघांच्या हुशारीमुळे पूर्ण वर्ग एकमेकांना आव्हान देताना पाहायला मिळतात. श्रीमतीच्या वडिलांचे नाव श्रीकांत असल्याने वर्गातील मुले मुली या दोघांना नावावरून नेहमी चिडवताना दिसतात. पुढे दहावी बोर्डाचा निकाल लागतो आणि त्यामध्ये बोर्डात पहिला क्रमांक श्रीमतीचा आणि दुसरा क्रमांक श्रीकांतचा  आलेला असतो. त्यामुळे श्रीकांतच्या घरामध्ये नाराजी पसरते कारण; या दोन्ही कुटुंबामध्ये बऱ्याच वर्षांपासून वैमनस्य असते. याची कारणे अगदी किरकोळच असतात. 

       पुढे श्रीकांत आणि श्रीमती वेगवेगळ्या कारणासाठी धारवाडला निघालेली असताना रेल्वेत पहिल्यांदा ते एकमेकांशी बोलतात. श्रीकांत बोर्डात पहिली आल्याबद्दल श्रीमतीचे कौतुक करतो. त्यानंतर पुढील ऍडमिशन विषयी ते एकमेकांना सांगतात. श्रीकांत ने सायन्सला जायचं ठरवलेले असते तर श्रीमतीने आर्ट्सला. दोघांनाही आपापल्या वाटा माहीत असतात. त्या दिवसापासूनच त्यांना एकमेकांना भेटण्याची, एकमेकांशी बोलण्याची ओढ वाटू लागते. त्या दोघांच्या घरात वातावरणामुळे समोरासमोर ते बोलू शकणार नाही त्याची त्यांना जाणीव असते. मग त्या दोन्ही घराच्या मध्ये असणारे बकुळीचे झाड आणि त्या झाडाखाली फुले गोळा करण्याच्या निमित्ताने ते दोघे येऊन एकमेकांशी बोलू लागतात. आणि त्या बोलण्यातून पुढे त्यांचे  एकमेकांवर प्रेम असल्याचे लक्षात येते. अपार जिद्द  आणि कष्टाच्या जोरावर दोघे आपल्या विषयात यश आणि ज्ञान प्राप्त करतात. श्रीकांत इंजिनिअरिंग  कॉलेजमध्ये आपले शिक्षण पूर्ण करतो आणि श्रीमती इतिहासाची आवड असल्यामुळे इतिहासात एम.ए. पूर्ण करते. श्रीकांतही कम्प्युटर सायन्स या विषयातून आपली डिग्री पूर्ण करतो. बकुळीच्या झाडापाशी सुरू झालेल्या गप्पा पुढे चालूच राहतात. त्या गप्पांमधून ते  एकमेकांना त्यांच्या क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करता  होती. त्यामुळे त्या दोघांना गप्पा मारायला लागल्यानंतर अनेकदा वेळ अपुरा पडत होता. 

        पण नुसत्या गप्पा मारूनही नाते पुढे नेता येणार नाही याची पूर्ण कल्पना श्रीमतीला  होती. आणि यामुळेच एके दिवशी आपल्याला लग्न करावे लागणार आहे याबद्दल ती श्रीकांतला विचारते. श्रीकांतला  चांगला जॉब लागलेला असतो, त्यामुळे लग्न करण्यामध्ये तशी फारशी अडचण येणार नव्हती. पूर्वीचे  असणारे वैर यामुळे दोघांच्या घरातील व्यक्ती लग्नाला तयार होणार नाहीत याची कल्पना त्यांना होते. श्रीमतीच्या आईच्या मतानुसार, श्रीमतीला  श्रीकांतच्या घरातले सून म्हणून कधीही स्वीकारणार नाहीत त्यामुळे विचार करण्याचा सल्ला आपल्या मुलीला देते. पण त्यामधून श्रीमतीला असे वाटते की, नवरा आपल्या बाजूने असला, आपल्यासारखा विचार करणारा असला तर घरातील इतरांची काळजी करण्याची काही गरज पडणार नाही. त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे त्यांचे लग्न होते. खरे तर त्यांचे लग्न होऊ शकणार नाही, असा अंदाज मी सुरुवातीची काही पाने वाचत असताना केलेला होता परंतु; तो अंदाज या ठिकाणी चुकलेला दिसला . आणि मग पुढे काय होणार ह्या उत्सुकतेपोटी पुस्तक वाचणे भाग पडले. एक लेखिका म्हणून सुधा मूर्ती यांची  लिहिण्याची शैली अतिशय प्रभावी असल्याचे देखील या निमित्ताने जाणवते. लग्नानंतर ते हुबळीतून मुंबईला स्थायिक होतात. लग्न झाल्यापासून श्रीमती श्रीकांतच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असते. काय हवं, काय नको या सगळ्याची जबाबदारी अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असते. ती स्वतः हुशार आणि महत्त्वकांक्षी असूनही श्रीकांतच  यश आपलेच यश आहे अशा विचाराने प्रत्येक काम करत असते. पुढे पुढे श्रीकांत त्याच्या कामात, त्याच्या नोकरीत अजून प्रगती कशी करता येईल आणि अजून पैसा कसा मिळवता येईल या महत्त्वाकांक्षेपोटी श्रीमतीच्या भावनांचा विचारही करताना दिसत नाही. 

       श्रीमतीला श्रीकांतच्या  पैशापेक्षा, तिला मिळणाऱ्या सुख सोयींपेक्षा श्रीकांतचा  वेळ पाहिजे असतो, नाहीतर निदान एखादा मूल तर पाहिजे असतं ,ज्यामुळे तिचा एकटेपणा दूर होईल. पण स्वतःला नोकरीमध्ये पूर्ण गुंतवून घेतल्यामुळे तो यापैकी कोणतीच गोष्ट करत नाही आणि श्रीमती कडे लक्षह देत नाही. त्याची प्रत्येक गोष्ट त्याच्या हातात देणारे  एक यंत्र म्हणून किंवा एक नोकर म्हणून श्रीकांतच्या आयुष्यात श्रीमतीचे स्थान  झालेले असते. अनेक क्लायंट घरी आल्यानंतर त्यांची  विचारपूस करणे, त्यांचा पाहुणचार करणे, त्यांना खुश ठेवणे अशा गोष्टी ती करत असते,ते फक्त श्रीकांतचा विचार करून. परंतु तिला यामधील कोणत्याही गोष्टींमध्ये आनंद वाटत नसतो. बऱ्याच वेळेला या सगळ्यांविषयी ती श्रीकांतला सांगण्याचा प्रयत्न देखील करते. परंतु; त्याला वेळच नसतो आणि त्यामुळे  दोघांमधील नाते दुरावत जाताना दिसते. पुढे रोजच्या रोज अशा गोष्टी होत असल्यामुळे,आपण एवढे हुशार असताना देखील घरात बसून आहे आणि शिक्षणाशी  सुद्धा आपण दुरावा ठेवलेला आहे याची जाणीव तिला होते. मग शेवटी ती अमेरिकेत जाऊन इतिहास विषयात डॉक्टरेट मिळवण्याचा निश्चय करते. या निर्णयाबद्दल ती श्रीकांतला सांगते, पण ही गोष्ट सांगितल्यानंतर त्याला ते खरे वाटत नाही. कारण बरेच वर्ष फक्त श्रीकांतचाच  विचार ती करत बसलेली असते. तिने स्वतःकडे, तिच्या स्वतःच्या स्वप्नांकडे, स्वतःच्या महत्त्वकांक्षाकडे लक्ष दिलेले  नसते. आणि एक मर्यादा ओलांडल्यानंतर समाजाचा,  श्रीकांतचा विचार न करता, स्वतःचा विचार करत, स्वतःहून अडकलेल्या बंधनातून तिने  मुक्त होण्याचा निर्णय घेतला. या विचारापासून परवृत्त करण्याचा श्रीकांतचा प्रयत्न असतो पण  ती पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने निघून जाते. हाच या  कादंबरीचा शेवट आहे. 

      आपल्या आजूबाजूला देखील श्रीकांत आणि श्रीमती सारखे अनेक जोडपी आपल्याला दिसतात. त्यामध्ये बायको म्हणून एक मुलगी आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होत असते. परंतु ज्यावेळी मुलीच्या स्वप्नांचा विचार येतो त्यावेळी नवरा साथ देताना दिसत नाही. बायको म्हणजे एक यंत्र नसून एक माणूस आहे आणि तिचीही काही स्वप्न आहेत ,त्यामुळे तिच्या स्वप्नांनाही साथ देणे हे प्रत्येक नवऱ्याचे कर्तव्य असते. पण आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणारे नवरे पण मोजण्याइतपतच समाजात पाहायला मिळतात. लग्न झाले म्हणून आलेली नवरी म्हणजे फक्त आपले काम करणारी एक बाहुली नसते तर तिलाही  मन असतं आणि भावना असतात आणि ही गोष्ट समजणे काळाची गरज आहे. या कादंबरी मधून पण हेच लक्षात येते की, श्रीकांत असणाऱ्या प्रत्येक स्वप्नाला साथ देण्याचे काम श्रीमती करत असते. आपल्याबरोबर श्रीमतीला देखील स्वप्न आहेत याचाच विसर या कादंबरीमध्ये श्रीकांतला पडलेला  दिसतो. आणि यातूनच जेव्हा श्रीमती स्वतःचा निर्णय घेते, त्यावेळी हतबल झालेला श्रीकांत बघताना पण श्रीकांत एवढा यशस्वी असताना पण हरलेला दिसतो. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला श्रीमती वाचकाच्या  मनामध्ये, मनाच्या एका कोपऱ्यामध्ये अभिमान वाटण्यासारखं एक स्थान निर्माण करते. प्रेम या शब्दाचा खरा अर्थ ही कादंबरी वाचताना जाणवते. प्रत्येक वाचकप्रेमीने हे पुस्तक नक्की वाचायला हवे.


Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...