जेष्ठ मराठी लेखक, पटकथाकार,साहित्यिक,पटकथालेखक,अनुवादक म्हणून व्यंकटेश माडगूळकर प्रसिद्ध होते. त्यांचेच माणदेशी माणसं हे पुस्तक माझ्या वाचनात आले.
या पुस्तकात लेखकाने माणदेशी माणसांच्या अनुषंगाने अनेक व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतलेला आहे.गावाकडील बलुतेदारी पद्धत आणि त्यामध्ये येणाऱ्या जातींचा उल्लेख करताना त्यांची जीवनशैली सांगायला लेखक विसरलेले नाहीत.
या पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्याला भेटतो धर्मा रामोशी.लेखकाच्या घरी प्रामाणिकपणे काम करणारा धर्मा रामोशी रेखाटताना वय झाल्यानंतर आयुष्याबद्दल बोलताना भागवतो कसतरी कळणाकोंडा करून....अस म्हणतो त्यावेळी हे व्यक्ती मनात घर करून जाते.गरिबितही स्वाभिमान जपताना धोतर मागताना दहा वेळा विचार करणारा आणि ते धोतर दुसऱ्या दिवशी धर्माची मुलगी बजा हिच्या अंगावर दिसते.त्यानंतर भेटणारा 'लोहराचा झेल्या'जो नवीन मास्तरांची शाळेतून बदली झाल्यानंतर आता मी नाय जाणार मास्तर त्या शाळेत म्हणतो तेव्हा त्यातून शिक्षक आणि गुरूच नात कस असल पाहिजे हे समजते. ढोरावणी जीव! काय अंगभर चांगला धडूता मिळतय का गोडधोड खाया मिळतया ! आमा गरीबाच हे असच म्हणणारा रामा मैलकुली विसरता येत नाही.शिक्षकी पेशा सोडून तमाशात रमलेला नामा मास्तर.त्यानंतर स्वतःच प्रश्न विचारणारा आणि स्वतःच उत्तर देणारा 'मुलाण्याचा बकस' "चुलत्यान डागलया. खुरापी तापवून डाग दिल्यात. डागल्यावर येड हे माणूस बर हुतं.मी काय वेडा हे का?" अस म्हणणारा मुलाण्याचा बकस आपल्या लक्षात राहतो.१९४९-५० या दशकात एका खेड्यात राहणारी थोर आसामी 'बन्या बापू'.माणुसकी जपणारी,आपुलकी ठेवणारी ही माणसं. महात्मा गांधींच्या वधानंतर जाळपोळीमध्ये यांचा वाडा जळून जातो. त्यातूनही कुणाचेही उपकार न घेता रानात झोपडी बांधून राहणारे बापू लक्षात राहण्यासारखे आहेत. त्याचप्रमाणे बलदंड ,रागीट आणि लेखकाच्या आजोळतील कठोर काळजाचा 'कोंडीबा गायकवाड' जमिनीच्या वादात आपल्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून करतो.आणि पोलिसांनी पकडल्यानंतर घरातील सर्वजण रडत असताना मळ्यातील पिकाची मोजदाद करणाऱ्या कोंडीबा याला काय म्हणावं हा प्रश्न पडतो.नवी चप्पल बनविताना लबाडी करणारा 'शिदा चांभार' आणि गरिबीमुळे आयुष्याची वाताहात झालेला शिवा माळी आपल्याला सहजासहजी विसरता येत नाही.लेखकाच्या मनात घर केलेली, गोडीगुलाबीने राहून चार माणसं आपलीशी करून भलेपणा मिळवायला सांगणारी 'तांबोळ्याची खाला' ,काय करायची आहे आपल्यासारख्या गरीब माणसाला बायको असं म्हणणारा आणि गरिबीमुळे बायकोचं दुसऱ्या पुरुषाशी सुत जमल्याचे कळल्याने अफु खाणारा 'रघु कारकून', आपल्या बायकोला छोट्या छोट्या कारणांनी मारहाण करणारा परंतु अस्वलाने पंजात स्वतःच्या मुलाला ओरबडल्यानंतर त्याला हात न लावणारा 'बाबाखान दरवेशी'. तमाशात काम करणारा 'गणा महार' त्याचप्रमाणे लस टोचून घेऊ नये म्हणून काळजी करणारे लेखकाचे वडील.आयुष्यभर दुःख भोगण्यासाठी जन्माला आलेले 'बिट्या काका' आपणास पहावयास मिळतात. आणि या पुस्तकाच्या शेवटी कष्ट न करत श्रीमंत व्हावे यासाठी अनेक उपाय करणारा 'गण्या भ पट्या' वाचकांना हसवून जातो.
अशा प्रकारे निर्मळ,प्रामाणिक,माणुसकी जपणारी,काळजी करणारी ही माणसं चांगली का स्वार्थ साधण्यासाठी काहीही करणारी,कुजकी विचारसरणी असणारी आजची माणसं चांगली. पुस्तक वाचून झाल्यावरही खूप वेळ ही माणसं मनाच्या कोपऱ्यात रुतून बसतात.
Comments
Post a Comment