Skip to main content

' सुनिल डोईफोडे ' लिखित एक प्रसिद्ध कादंबरी ' मृगजळ '

  जेव्हा मी ही कादंबरी वाचायला सुरुवात केली तेव्हा वाचण्यात मला जास्त रस वाटत नव्हता. मात्र सुरुवातीची काही पाने संपल्यावर लेखकाची वाचकाला धरुन ठेवण्याची शाब्दिक ताकद प्रत्ययास आली. आणि पुढे काय होईल या उत्सुकतेपोटी हे पुस्तक वाचून संपल्यानंतर समाधान वाटले. या कादंबरीचा विषय ' मनोरुग्ण ' या व्यक्तिरेखांच्या वर्तुळावर आधारलेला आहे. शालीनीला होणारे भास, त्यानंतर विजयला, प्रियाला आणि काहीश्या सक्षम व्यक्तीरेखा आहे असे वाटणाऱ्या विजयच्या आईलाही शेवटी आपला मुलगा जिवंत असल्याचा भास, मन सुन्न करतो. लेखकाच्या शब्दात ताकद असते हे ,ही कादंबरी वाचताना लक्षात येते. 

या कादंबरीची सुरुवात होते ती राजेशच्या रिसेप्शन पार्टीने. गावापासून दूर असणाऱ्या एका लॉनमध्ये त्याने पार्टीसाठी आपल्या मित्रांना बोलवलेले असते. सर्वजण गप्पात रंगले असताना त्यामध्ये अधिक रंग भरण्यासाठी प्रिया या व्यक्तिरेखेचा प्रवेश त्याठिकाणी होतो. प्रिया आल्यानंतर त्याठिकाणी विजयचा विषय निघतो आणि त्यातूनच विजय, राजेश आणि प्रिया या तिघांच्या मैत्रीबाबत समजते. आणि थोड्या वेळातच विजय, त्याची आई आणि त्याची बहीण शालिनी यांचा त्याठिकाणी प्रवेश होतो. राजेशला शुभेच्छा दिल्यानंतर विजयची नजर प्रियाला शोधत आहे असे दिसते. यातून त्या दोघांच्या जवळीकतेची जाणीव वाचकांना होते. थोड्या वेळाने शालीनीच्या किंकाळीने सगळेजण शांत होतात. विजय आपल्या बहिणीचा आवाज ऐकून तिथे जातो , तर ती जोरजोरात ओरडत, किंचाळत असते आणि कुणी जवळ नसतानाही , कुणीतरी तिच्यावर अत्याचार करतो आहे असा तिला भास होत असतो...प्रत्यक्षात तिथे कुणीही नसते. तिथे असणारे सर्वजण तिला वेडी म्हणून हिणवत असतात तर काहीजण सहानुभूती दाखवितात. पुढे तिच्या वेडेपणाची कहाणी हे पुस्तक वाचताना , विजयकडून समजते. ती पहिल्यापासून वेडी नव्हती. तर ती २२-२३ वर्षांची असताना एमपीएससी लेखी परीक्षेत पास झाली होती. तिला इंटरव्ह्यूसाठी बोलवलेले होते आणि त्यावेळी तिची सगळी certificates चोरीला गेली. आणि त्यामुळे तिची निवड होऊ शकली नाही. आणि या मानसिक धक्क्यातून ती शेवटपर्यंत सावरू शकली नाही.  ही घटना जर सुखसंपन्न घरातील मुलीच्या बाबतीत घडली असती तर ती यातून सावरली असती. पण शालीनीची कौटांबिक स्तिथी कमालीची गरीब आणि त्यातूनही ती शिकली, अनावधानाने पुरावा असणाऱ्या certificates चीच चोरी. त्याक्षणी ती मेली. पण भासाच्या माध्यमातून क्षणाक्षणाला मरताना वाचकांना याठिकाणी पहावयास मिळते. हे पुस्तक वाचताना, आणखी एक गोष्ट मनात आली आणि ती म्हणजे तिला होणारा भास. त्यामध्ये कुणीतरी युवक तिला खुणावतो आणि त्याच्या पाठोपाठ ती जाते आणि एका अंधाऱ्या खोलीत कोणी दुसरा बसलेला असतो. काही क्षणातच तो तिच्यावर अत्याचार करू लागतो. मला असे वाटते की कदाचित असा अत्याचार प्रत्यक्षात तिच्यावर झाला असला पाहिजे आणि तिच्या मनावर झालेला हा आघात , भासाच्या माध्यमातून ती पुन्हा- पुन्हा अनुभवते आहे. या व्यक्तिरेखे बद्दल मला वाईट वाटते. कारण माझ्या मते गरिबी तिच्या मनोरुग्ण होण्याला कारणीभूत आहे.

१) विजय :

याची सुरुवात होते ती मोठा म्हणूनच. जणू काही लहानपण आणि तो, याचा काही संबंध वाटावा असे दिसत नाही. खरे पाहता दारू पिणारे वडील, कष्ट करून शिकवणारी त्याची आई आणि स्वतःही कष्ट करून उत्तम गुण मिळवणारा हा विजय. शिक्षण हा एकाच पर्याय आहे म्हणून प्रियाच्या प्रेमाला महत्त्व न देणारा विजय, वेडा तर होतोच पण अपघातात मरण पावतो. ही घटना शेवटी मनाला टोचत राहते. कॉलेजमध्ये हुशार म्हणून मिरविणारा, इंजिनिअर म्हणून कंपनीत नोकरी करणारा हा, कंपनीच्या बॉसची मुलगी ' नयनाच्या ' प्रेमात पडतो आणि ती व तिचे वडील लग्नाला राजी असल्याचा त्याला भास होतो. पण खरे तर अस काहीच नसत. कायम गरिबीत जगणाऱ्या विजयला ही वाटत असेल की लग्न करून परिस्थिती बदलेल. आणि या मृगजळामागे  पळून तो त्याचे आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त करतो. नयनामुळे त्याला नोकरीवरून कमी केले जाते. आणि या गोष्टीचा त्याच्या मनावर असा काही परिणाम होतो की तो वास्तवाला विसरतो आणि एका प्रसंगी नयना प्रत्यक्षात नसतानाही तो तिच्यासोबत भांडत असल्याचे त्याची आई पाहते आणि मटकन खाली बसते. हा विजय परिस्थितीमुळे करीयरच्या मागे लागल्याचे आपल्याला पहावयास मिळते. आणि यातूनच प्रियाच्या त्याच्या बद्दलचे प्रेम कळत असूनही प्रेमाच्या भानगडीत तो पडत नाही आणि नोकरी लागल्यावर          ' नयनच्या ' प्रेमात पडल्याचा त्याला भास होतो. आणि ती बातमी तो पहिल्यांदा प्रियाला सांगण्यासाठी जिथे प्रेमी युगुल भेटतात त्याठिकाणी बोलवतो आणि त्याचे प्रियाबद्दलचे मित्रप्रेम त्याला त्याचे नयनाबद्दलचे प्रेम सांगण्यास भाग पाडते. पण अशा ठिकाणी जिथे प्रेमी युगुल भेटतात तेथे बोलणे जरा विचित्र वाटते. नंतर जेव्हा नयनाच्या नकारानंतर त्याची नोकरी जाते आणि नोकरीच्या संदर्भात दुसऱ्या शहरात जायचे असते, तेव्हा तो जातो आणि प्रियाला त्याच्यासोबत येण्यासाठी विचारतो. आणि परत आल्यावर आपल्या आईला त्या दोघांनी केलेली मज्जा सांगतो. पण वास्तविकता भिन्न असते. कारण विजय गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियाचा अपघात झालेला असतो. आणि ती कोमात असताना  त्याच्याबरोबर कशी काय फिरू शकते. याची जाणीव आईने करून दिल्यानंतर तो तिला तिच्या आजोळी भेटण्यासाठी जायला निघतो पण परत येते ते त्याचे प्रेत. असा या पात्राचा दुःखद अंत दाखवण्यात आलेला आहे.

२) प्रिया : 

ही व्यक्तिरेखा निश्चितच खूप वेगळी आहे. प्रिया ही बारावीत मुंबईहून विजयच्या शहरात येते. तेव्हा मुंबईहून आलेली मुलगी म्हणून सगळ्यांना तिच्याबद्दल आकर्षण असते. मात्र प्रियाला विजयची हुशारी भावते व त्याच्या घराकडे नोट्स मागण्यासाठी तिचे येणे जाणे वाढते.पुढे प्रियाला मेडिकल कॉलेजमध्ये admission मिळते, पुढे ती नेहमी विजयच्या हिताचा विचार करताना दिसते. त्याच्या मनावर परिणाम झाल्याचे कळताच स्वतः पुढाकार घेऊन त्याला डॉक्टरांकडे नेण्यासाठी प्रयत्न करते. आणि नोकरीही मिळवून देते. आणि नयनाकडे जाऊन विजयबद्दलचा गैरसमजही दूर करते. याचप्रमाणे अपघातातून सावरल्यावर विजयच्या मृत्यूची बातमी समजल्यावर ती स्वतःला त्याच्या कुटुंबासाठी वाहून घेते. शेवटी वाचताना असे समजते की ,ती विजय परत आलाय असे समजून त्याच्या हाताला धरुन निघालेली आहे असे तिला वाटत असते पण प्रत्यक्षात तिच्याबरोबर कुणीही नसते. ही वास्तविकता मनाला चपराक देते. प्रियाचे मनोरुग्ण होणे मनाला उदास करते.

३) विजयची आई : 

ही व्यक्तिरेखा पहिल्यापासून खंबीर दाखविण्यात आली आहे. कुणाचीही साथ नसताना ती जगत होती, झगडत होती, आधार देत होती. पण शेवटच्या क्षणी ती सुद्धा मनोरुग्ण ठरते. एक तर दारू पिणारा नवरा, मनोरुग्ण मुलगी, काही दिवसांनी मनोरुग्ण झालेला मुलगा आणि त्यामुळे त्याचा झालेला अपमान, त्यानंतर सुनेची जागा घेणारी प्रियाही मनोरुग्ण होते. अशा प्रकारे एकापाठोपाठ एक झालेले आघात तिलाही शेवटी मनोरुग्ण बनवतात. या आईची व्यथा दिसत नसली तरी जीवघेणी आहे. आणि हे पात्र मनाच्या एका कोपऱ्यात कायम घर करून राहते.

४) विजयचे बाबा :

यांच्या असण्याने किंवा नसण्याने कुणाला काहीच फरक पडत नाही. मोहाच्या क्षणी झालेला संबंध आणि त्यातून झालेली ही मुलं, एवढीच काय ती कामगिरी म्हणायला त्यांनी केलेली आहे. बाकी कर्तव्याचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. या सगळ्या पात्रामध्ये हे विजयच्या बाबा काही मनोरुग्ण झाले नाहीत कारण त्यांना कोणत्याच भावना नाहीत. या पात्राचा विचित्रपणा दाखविण्यासाठी संपूर्ण कादंबरीत एकही संवाद या व्यक्तिरेखेच्या वाट्याला आलेला नाही.

५) राजेश : 

ही व्यक्तिरेखा समाजाचे एक प्रतीक म्हणून वापरण्यात आलेले आहे. यामध्ये बारावीचा जेव्हा निकाल लागतो त्यावेळी विजय आणि प्रियापेक्षा कमी गुण मिळाल्याने अस्वस्थ होणारे हे पात्र, पुढे कामाच्या रगाड्यात मैत्रीमध्ये स्वतः अंतर पाडण्यास कारणीभूत ठरते. विजय मनोरुग्ण झाल्यानंतर त्याच्या मनाचा कठोरपना आणि स्वतःच्या गर्भवती पत्नीची काळजी घेण्यात मग्न असलेला हा राजेश आजच्या काळात असणारी समाजाची गुणवैशिष्ट्ये घेऊन जन्माला येतो. या व्यक्तिरेखेबद्दल तिरस्कार वाटत नाही पण प्रेमही वाटत नाही. वाईट बातमी देण्याशिवाय आणि स्वतःची प्रौढी मिरविण्याशिवाय ही व्यक्तिरेखा फारसे काही करत नाही.

६) प्रियाचे वडील : 

प्रत्येक वडीलाप्रणाने मुलीची, तिच्या भवितव्याची वाटणारी काळजी त्यांच्या रागातून दिसून येते. आणि स्वतःची पत्नी वारल्यानंतरही दुसरे लग्न न करता मुलीची आईप्रमाणे काळजी घेणारी ही व्यक्तिरेखा कायम लक्षात राहते. व्यवहारिक जीवनात अशा रीतीने निर्णय घेणाऱ्या व्यक्ती अगदी थोड्या असतात.

अशा प्रकारे ही कादंबरी मनोरुग्ण आणि त्यांच्या समस्यांवर लक्ष वेधत असली तरी नाव मात्र खूपच भन्नाट आहे, ' मृगजळ ' म्हणजे होणारे भास. असे म्हणतात की, वाळवंटात खूप तहान लागली की, पाण्याचे तळे दिसते पण जेव्हा आपण ते पाणी पिण्यासाठी जाऊ तेव्हा प्रत्यक्षात त्याठिकाणी पाणी हे नसतेच. म्हणजे फक्त आहे असे वाटणारे वास्तवात नसते आणि वास्तवाची  जाणीव विसरायला भाग पाडणारे हे मृगजळ. या कादंबरीतील पात्रांची अवस्था वास्तविकता स्वीकारण्यास असक्षम असलेल्या मनाचा खेळ किंवा मनाचा कमकुवतपणा आहे. जे वास्तव आहे ते स्वीकारण्यास व आहे त्या परिस्थितीशी दोन हात करताना मृगजला पाठीमागे न धावण्याचा अनुमोल उपदेश केलेला आहे. आणि अशा लोकांना मानसिक आधाराची आणि औषधांची असणारी गरज यांची खूप सुंदर पद्धतीने जाणीव करून दिली आहे.




Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...