गिरीश कर्नाड हे भारतीय नाटककार, दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध कलाकार होते. ' हयवदन ' हे त्यांनी कन्नड भाषेत लिहिलेले एक लोकप्रिय नाटक आहे. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद ' खानोलकर ' यांनी केलेला आहे. या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी अपूर्णतेकडून परिपूर्णते कडे जातानाच संघर्ष ' हयवदन ' या पात्रातून दाखविण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे.
या नाटकाची सुरुवात गणेश प्रार्थनेने केलेली आहे. भागवत या पात्राकडून संपूर्ण कथानक आणि नाटकातील इतर पात्रे यांचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये महाकाय श्रीगणेशाच्या रचनेबद्दल बोलताना आपल्या सारख्या लोकांना ईश्र्वराच्या संपूर्ण स्वरूपाची कल्पना करता यावी यासाठीच हा खटाटोप असावा, असे सांगतात. त्यानंतर भागवत हे पात्र कथा सांगायला सुरुवात करते. त्यात ते सांगतात की, एका धर्मपुरी नगरात एक धर्मपरायन राजा राहत होता. या राज्याचा खूप नावलौकिक होता. याच नगरात ' देवदत्त शर्मा ' , एका ख्यातनाम पंडित विद्यासागर यांचा मुलगा आणि ' कपिल ' , एका लोहराचा मुलगा हे दोन जिवलग मित्र राहत होते. त्यामध्ये देवदत्त चे वर्णन, ' कोमल शरीराचा, गौर वर्णाच, सुंदर, मदनासारखा मनोहर ' असे केले आहे. आणि दुसरीकडे कपिल शरीराने बलदंड आणि कुस्तीमध्ये प्रवीण आहे. या दोघांची अतूट मैत्री आहे जसे की राम - लक्ष्मण किंवा लव - अंकुश. ही माहिती दिली जात असताना एका पात्राचा त्याठिकाणी प्रवेश होतो. ते पात्र सांगते की, त्याने चेहरा घोड्याचा आणि शरीर मनुष्याचे असणाऱ्या व बोलता येणाऱ्या विचित्र प्राण्याला पाहिलेले आहे. भागवतला विश्वास बसत नाही. नंतर रंगमंचावर ' हयवदन ' प्रवेश करतो आणि त्यावेळी भागवत त्याचे तोंड मुखवटा आहे असे समजून ते ओढण्याचा प्रयत्न करतो. पण ते खरे असल्याने , तो मुखवटा निघत नाही. पण त्यानंतर ते त्याची पूर्ण माहिती विचारतात. त्यावेळी ' हयवदन ' त्याची कथा सांगायला सुरुवात करतो.
तो सांगतो की, त्याची आई कर्नाटक देशातील एक लावण्यवती राजकन्या होती. एक पांढराशुभ्र घोडा तिला आवडला आणि त्याच्याशीच लग्न करण्याचा तिने हट्ट केला. त्या दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या १५ वर्षानंतर त्या घोड्याचे गंधर्वात परिवर्तन झाले. मानव प्राण्याबरोबर पंधरा वर्षे संसार केल्यामुळे कुबेर याचा शापातून तो मुक्त झाला आणि इंद्रलोकी जाऊ असे म्हणाला. पण तिने नकार दिला, त्यावेळी तिला शाप मिळून ती घोडी बनली. त्या दोघांच्या अडाणी संभोगातून जन्म झालेला अभागी पुत्र ' हयवदन ' असल्याचे समजते. त्यानंतर भागवत त्याला चित्रकुटावरील महाकालीची पूजा करण्यास सांगतो. ते केल्यानंतर तू या रूपातून मुक्त होशील असेही सांगतो.त्यानंतर ते पात्र व हयवदन तिकडे जाण्यास निघतात. पुढे भागवत पुढील कथा सांगण्यास सुरुवात करतो.
देवदत्त आणि कपिल आपापल्या क्षेत्रात प्रवीण असतात. पुढे देवदत्त पावनतीर्थावर पाहिलेल्या पद्मिनीच्या प्रेमात पडतो. तिला विचारण्यासाठी कपिल त्या ठिकाणी जातो. पुढे देवदत्त आणि पद्मिनी चे लग्न होते. पण त्या पुढील संभाषणात असे जाणवते की कपिल आणि पद्मिनीचे एकमेकांबद्दल आकर्षण वाढले आहे. उज्जैनचा प्रवास कपिल, देवदत्त आणि पद्मिनी सोबत करत असतात. या प्रवासात देवदत्तला कपिल आणि पद्मिनीचे आकर्षण समजते. त्यामुळे त्या ठिकाणी दोन मंदिरांचा संदर्भ आहे ' भगवान रुद्र 'आणि ' श्रीदेवी कालीमाता ' असे दोन मंदिरे त्या ठिकाणी होती. त्यामध्ये कपिल आणि पद्मिनी भगवान रुद्राच्या मंदिरात जातात आणि देवदत्त कालीमातेच्या मंदिरात जाऊन त्या दोघांच्या सुखासाठी मस्तक अर्पण करतो. काही वेळाने कपिल तेथे येतो व मैत्रीसाठी आपलेही मस्तक अर्पण करतो.पद्मिनी त्याठिकाणी येते आणि त्या दोघांची अवस्था पाहून तीही तिसरा बळी देण्याचे ठरवते. पण देवी प्रसन्न होऊन तुटलेले मस्त शरीराला जोडल्यावर ते दोघे जिवंत होतील असे सांगते. पद्मिनी देवदत्तचे मस्तक कपिलच्या शरीराला आणि कपिलचे मस्तक देवदत्ताच्या शरीराला जोडते. या अदला बदलीने या दोघांचे भांडण सुरू होते आणि इथपर्यंत या नाटकाचा पूर्वार्ध संपून उत्तरार्ध सुरू होतो.
यामध्ये पद्मिनी कुणाबरोबर जावी यावर भागवत गंभीरपणे घोषणा करतो की, देवदत्तचे मस्तक ज्या शरीरावर आहे, तो देवदत्त ठरावा आणि पद्मिनी त्याची पत्नी ठरावी. पुढे त्या बदललेल्या शरीरामुळे देवदत्त आणि कपिल या दोघांनाही खूप अडचणींचा सामना करावा लागतो.पुढे बाहुल्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला समजते. बाहुल्या जुन्या झाल्याच्या कारणावरून नवीन बाहुल्या आणण्यासाठी, पद्मिनी देवदत्त ला यात्रेत पाठवते आणि कपिल याला भेटण्यासाठी बाळाला घेऊन जाते. देवदत्त यात्रेतून परतल्यावर घरी पद्मिनी नसल्याचे त्याला समजते. आणि तो अंदाज बांधून कपिलकडे येतो तर पद्मिनी त्याला त्या ठिकाणी दिसते. पद्मिनी कुणाला मिळावी याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ते लढाई करायचे ठरवतात आणि हे दोन मित्र लढाई करतात आणि दोघेही मरतात. आपल्यासाठी हे दोघे मित्र मेले या कारणामुळे पद्मिनी ही सती जाण्याची ठरवते आणि आपल्या मुलाला भागवतकडे देऊन त्याला भिल्लाकडे सोपवा असे सांगते आणि पाच वर्षांचा झाल्यावर देवदत्तचे वडील विद्यासागर यांच्याकडे त्याला द्या ,असे सांगून आपण सती जाते.
त्यानंतर चित्रकुटावरून एक पात्र , तो पाच वर्षांचा मुलगा धर्मपुरीत येऊन भागवत यांच्याकडे नेऊन देतो.पुढे ' हयवदन ' याचा प्रवेश होतो. तो पूर्ण घोडा बनलेला आहे , पण आवाज मात्र मनुष्याचा आहे आणि तो सांगतो की , देवी माझे वाक्य पूर्ण होण्याआधी अंतर्धान पावली आणि मी पूर्ण घोडा झालो. पण त्यामुळे मनुष्यवाणी तशीच राहीली. घोड्याचे खिंकाळणे आले, तेव्हाच मी पूर्णांग होईल. हयवदनला पाहून ते लहान बाळ हसायला लागते आणि या दोघांच्या संभाषणातून त्याला खिंकाळने येते व शेवटी ते मुल घोड्यावर बसून विद्यासागर यांच्याकडे जायला निघते.
अशाप्रकारे हे नाटक मनोरंजक तर आहेच पण त्याप्रमाणेच पूर्णत्व, मित्र प्रेम, स्त्री सौंदर्य या प्रत्येक गोष्टीबद्दल सांगण्याचा अत्यंत सुंदर प्रयत्न लेखकाने या नाटकाच्या माध्यमातून केलेला आहे.
Comments
Post a Comment