Skip to main content

' लक्ष्मण माने ' लिखित एक प्रसिद्ध पुस्तक ' पालावरच जग '

       '  पालावरचे जग ' हे  'लक्ष्मण माने ' यांचे पुस्तक माझ्या वाचनात आले. या जगात आपल्याला असंख्य लोक भेटत असतात. काहीजण आपल्या आठवणीत राहतात, तर काही लोकांना काळाच्या ओघात आपण विसरून जातो. आयुष्याबद्दल आपण कितीतरी सुंदर कल्पना करत असतो. पण ज्या आयुष्याची आपण कल्पना करू शकत नाही, अशा काही लोकांचे अनुभव 'लक्ष्मण माने ' यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे.

       पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच त्यामध्ये भटक्या जाती-जमाती मधील लोकांचे अनुभव कथन केलेले आहेत. अशा जमाती ज्यांना स्वतःचे अस्तित्व नसते, ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरावे लागते,ज्यांचे आयुष्य जात पंचायतीच्या निर्णयावर अवलंबून असते. पण काळाच्या ओघात या लोकांमध्ये बदल घडत आहेत. हे या पुस्तकाच्या रूपाने दाखविलेले आहे.

       सुरुवातीला वैदू समाजाचे वर्णन आहे. लंगोटी लावून वाईच औषध, वाताचं औषध, सुई- दोरा विकणारा वैदू, माणसांच्या सावलीला बीचकणारा वैदू, गाढवाच्या पाठीवर बिऱ्हाड घालून कुत्र्यांची खांड्याच्या खांड घेऊन फिरणारा वैदू, ठेस लागली तरी नवस बोलणारा वैदू, पैशाने मुली विकणारा वैदू. यांच्या जमातीतील जत्रा म्हणजे घरटी सात बकऱ्या कापल्या जाणार तसेच लग्नपद्धतीही वेगळी. पण या लग्नपद्धतीत यल्लाप्पाने केलेला बदल खूपच आशादायक आहे. त्यानंतर गोसावी समाज आणि त्यांच्यामधील दीक्षाविधी तसेच गोरगरिबांची वास्तव स्थिती या पुस्तकात वर्णन करण्यात आलेली आहे. तसेच पारधी समाज ज्याला कारण नसतानाही चोर म्हणून पकडून नेले जाते. याबद्दलही सांगण्यात आलेले आहे. सुरुंग लावण्याचा काम करणारा तायाप्पा आणि या कामामध्ये त्याला जीव गमवावा लागतो. बायकोला एकटीला मागे ठेवून तो निघून जातो. हे दाहक सत्य लेखकाने आपल्यासमोर मांडलेले आहे.  आम्ही गुन्हेगार आहोत असं मानणारा समाज आम्हाला माणूस होऊ देणार नाही असा आक्रोश मन पिळवटून टाकतो. पारधी समाजात जन्माला आल्यामुळे यांच्या नशिबाची फरफट आणि पोलिसांचा त्रास लिहायला लेखक अजिबात विसरत नाही. माणसांना जात नसते हे कसं पटवणार हा प्रश्नही लेखक वाचकांवरती सोडतो. त्यापुढे कंजारभाट समाजाची लग्न पद्धती हे पुस्तक वाचताना आपल्याला समजते. पंचांना परमेश्वर मानणाऱ्या या सगळ्या जमाती पण पंचाचा निर्णय चुकला तर आयुष्याचा निर्णय पण चुकणार हे वास्तव माहिती असूनही रीती- रिवाज सोडायला तयार नसल्याचेही आपल्याला कळते. या निर्वासित जाती-जमाती कशा राहत असतील याचा विचार आपण करू शकत नाही. यानंतर वाचकांच्या भेटीस येतो तो नंदीवाला समाज. नंदीवाले ज्यांना प्रत्येक गोष्टीसाठी नवस बोलायची सवय असते. आणि त्यामुळेच या समाजातील साऱ्या पोरी समजायच्या आत नवसामुळे बायका झालेल्या पाहायला मिळतात. यापुढे मांग-गारुडी समाजाची व्यथा लेखकाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न  केला आहे. प्रगती करू पाहणाऱ्या मांग-गारुडी समाजातील 'गैरन ' ज्याला गावातील लोकांनी ठार मारलेले असते. ही विदारक कथाही आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. या देशात गरिबाला न्याय मिळेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही याचीही जाणीव या ठिकाणी आपल्याला होते. तसेच पुढे निलंगा गावांमधील मातंग समाज. मेलेल्या माणसाशीही वैर करणारा समाज. या सर्व जाती-जमाती आणि त्यांचे अनुभव लेखकांनी याठिकाणी सांगितले आहे.

        परंतु बदलत्या काळानुसार या जमातीतही आमूलाग्र बदल होत आहेत. आणि हे सामर्थ्य चळवळीचे आहे याची जाणीव लेखक करून देतात. पाठीमागे वर्णन केलेल्या जाती-जमाती प्रमाणेच राजपूत भ****, मदारी यांचाही उल्लेख या पुस्तकामध्ये आहे. मसनजोग्यांची वस्ती आणि तेथील एका स्त्रीवर झालेला अत्याचार आणि खूप प्रयत्न करूनही गुन्हेगाराचं मोकाट फिरणं मनाला स्पर्श करून जाते. याप्रमाणेच कोल्हाटी समाजातील बदलती लग्नपद्धतीही लेखकाने सांगितली आहे. अशाप्रकारे अनेक जाती- जमातींचे वास्तव या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडण्याचा उल्लेखनीय प्रयत्न लेखकानी याठिकाणी केला आहे. हे पुस्तक खऱ्या अनुभवावरती आधारित असून लिहिलेला प्रत्येक प्रसंग लेखकांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि त्यामुळेच हे पुस्तक वाचत असताना तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर  जसाच्या - तसा उभा राहतो. 

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...