विजय तेंडुलकर हे प्रसिध्द लेखक, पटकथाकार, साहित्यिक आणि नाटककार होते. त्यांच्या लिखाणातील वैचारिक प्रगल्भता आणि वास्तविकता वाचकाला आकर्षित करते.
' शांतता! कोर्ट चालू आहे ' या नाटकातून तेंडुलकर यांनी स्त्री अस्तित्व आणि तिचा संघर्ष असा एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे नाटक तीन अंकामध्ये विभागलेले आहे. यामध्ये सुखात्मे, काशीकर,पोंगशे, सामंत, कर्णिक, रोकडे, सौ. काशीकर आणि कु. लीला बेणारे ही प्रमुख पात्रे आहेत.
नाटकाचा पहिला अंक सुरू होतो, तो एका खोलीच्या दालनात. ज्याठिकाणी एकदोन जुनाट लाकडी खुर्च्या, एक खोके, एक स्टूल आणि भिंतीवर एक बंद पडलेले घड्याळ आहे. याच हॉलमध्ये अभिरूप कोर्टाचा कार्यक्रम होणार असतो. सुरुवातीला सामंत तो हॉल उघडतात आणि त्यांच्या पाठोपाठ कू. लीला बेणारे तिथे पोहोचते. सामंत आणि बेणारे यांच्यामध्ये चर्चा सुरू होते. त्या चर्चेमधून कू. बेणारे शिक्षक असल्याचे लक्षात येते. स्वतः शिक्षकी पेशाबद्दल बोलताना त्या सांगतात की, ' शाळेत पहिल्या बेलला माझं पाऊल शाळेच्या आवारात असत. गेल्या आठ वर्षांत कुणाचं या बाबतीत ऐकून घेतलेलं नाही मी. शिकवण्याच्या बाबतीत सुद्धा . मी माझं रक्त ओतते त्यांना शिकवण्यात. ' या वाक्यांवरून आपल्या लक्षात येते की शिकवणे त्यांच्या नसानसात भिनलेले आहे. सुरुवातीच्या काही वाक्यामधून लक्षात येते की त्या मनमोकळ्या, स्वच्छंदी वाटत असल्या तरी त्यांच्या मनात न उलगडून दाखवता येण्यासारखी जखम आहे. ते कारण पुढे नाटक वाचत असताना समजते. सामंताशी बोलताना उगाचच एक इंग्रजी गाणे त्या गुणगुणताना दिसतात. अभिरूप न्यायालयाविषयी सामंताना सांगताना प्रत्येका बद्दल बोलताना दिसतात. त्यानंतर रोकडे, पोंगशे, सुखात्मे, काशीकर आणि सौ. काशीकर सर्वजण जमतात. सुखात्मे , बेणारे बाईंना ज्यावेळी अल्लड आणि लहान आहे असे म्हणतात.त्यावेळी बेणारे बाई जे बोलतात ते खूप प्रभावी आहे. त्या म्हणतात," हसावं, खेळावं, गावं, जमलं आणि नाचू दिलं तर नाचवसुद्धा. काही कसली लाज नी भीड नि पर्वा ठेऊ नये. खरचं सांगते. आपलं आयुष्य संपलं तर काय कुणी स्वतःच द्यायला येणार आहे? लीला बेणारे , एक जिवंत बाई- अनुभवान म्हणते, आयुष्य कुणासाठी नसतं. ते स्वतः साठीच असतं. असल पाहिजे. ते फार फार महत्त्वाचं आहे. त्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कण मोलाचा आहे." त्यानंतर सर्वांच्याच चाललेल्या संभाषणात दामलेंचा उल्लेख अप्रत्यक्षपणे करण्यात आलेला आहे. सर्वजण ठरवितात कोर्टाचे कामकाज सामंताना समजण्यासाठी , एक काल्पनिक खटला कुणावर तरी करायचा. त्यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात ' लीला बेणारे ' हिला बोलावण्याचे तिच्या संमतीशिवाय ठरते. इंडियन पिनल कोडच्या ३०२ कलमाखाली आरोपी मिस बेणारे यांच्यावर भ्रूणहत्ये ्चा आरोप ठेवण्यात येतो. याठिकाणी पहिला अंक संपून दुसरा अंक सुरू होतो.
सुरुवातीला गंमत म्हणून चाललेला खटला पुढे जाऊन गंभीर स्वरूप घेतो. सुखात्मे वकील म्हणून कोर्टात उभे राहिल्यावर, ' मातृत्व मंगल असल्याचा उल्लेख करताना स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे ,' असे सांगतात. पुढे पोंगशे यांना साक्षीदार म्हणून बोलावण्यात येते. त्यानंतर प्रत्येकजण लीला बेणारे यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायला सुरुवात करतात. त्यातून लीला बेणारे यांचे वर्तन अनैतिक आहे हे सिद्ध करण्याचा खटाटोप करतात. त्यातूनच लीला बेणारे हिने वयाच्या पंधराव्या वर्षी स्वतःच्या मामावर केलेले प्रेम आणि प्रो. दामल्यांशी असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून तिच्या पोटात वाढणारे मूल याबद्दल समजते. अशा प्रकारे तिच्या खाजगी आयुष्याचे धिंडोरे काढण्यात येतात. सुरुवातीपासून खेळकर स्वभावाच्या बेणारे बाई शेवटी शेवटी खूप गंभीर दिसायला लागतात. सरकारी वकील सुखात्मे, भ्रूणहत्येपेक्षा विवाहपूर्व मातृत्वाचा गंभीर आरोप ठेऊन गर्भ मरेपर्यंत नष्ट करण्यात यावा अशी शिक्षा देण्याचे ठरवितात.
तिसऱ्या अंकामध्ये बेणारे बाईंचे स्वगत खूपच प्रभावी आहे. जीवनाची वेदना वर्णन करताना त्या जे काही बोलतात ते वाचताना मन हेलावून जाते. त्या म्हणतात, " जीवन हा टराटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन हा स्वतःलाच डंख करणारा महाविषारी साप आहे. जीवन म्हणजे विश्वासघात आहे. जीवन म्हणजे प्रतारणा आहे. जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिली पाहिजे, " अशा प्रकारे हे नाटक म्हणजे शांततेतून मनात अनेक प्रश्न निर्माण करते. शेवटी या अभिरूप कोर्टाची तालीम झाल्यानंतर हा फक्त गेम होता असे सांगून सर्वजण तिथून उठतात. पण लीला बेणारे , त्याठिकाणी तशीच बसून राहते.
नाटकाच्या सुरुवातीला असणारे ' चिमणीला मग पोपट बोले.....' हे सूर , नाटकाच्या शेवटीही वाचायला मिळतात. अशा रीतीने या नाटकाच्या माध्यमातून , स्त्रीची सामाजिक स्तिथी लीला बेणारे या पात्रातून खूप सुंदरपणे दाखवण्यात आली आहे.
Comments
Post a Comment