हे पुस्तक वास्तवाची जाणीव करून देणारे आहे.हे आत्मचरित्र असले तरीही त्यांनी प्रत्यक्षात भोगलेल्या वास्तवाची मनाला होणारी वेदना खूप काही सांगून जाते.
या पुस्तकाचे नाव ज्याप्रमाणे वेगळे आहे ,त्याचप्रमाणे लेखकाचे नावही वेगळे आहे.जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला ,वडिलांच्या नावाऐवजी लेखकाने आईचे नाव का लावलेले आहे त्याचे विदारक सत्य समजते.पुस्तकाचे मुखपृष्ठ जसे वेगळे आहे त्याचप्रमाणे त्यांनी जगलेले आयुष्यही खूपच वेगळे असल्याचे समजते.लेखक ज्याप्रमाणे मनोगतात सांगतात त्याप्रमाणे समाजाला जाणीव व्हावी या हेतूने हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे.हे पुस्तक वाचत असतानाच कोल्हाटी समाज आणि त्या समाजातील दाहक वास्तव मला समजले.
प्रत्येक समाज आणि त्या समाजातील लोकांचे जीवन वेगळे असते. या समाजात सुंदर मुलींनी जन्म घेणेच पापच.सुंदर दिसण्यामध्ये आणि त्यामुळे भोगावं लागणार दुःख न व्यक्त करता येण्यासारखं आहे.समाजाच्या बंधनामुळे आईच्या प्रेमाला बरीच वर्षे पारखा झालेला आणि आईपासून दूर असताना ज्या आजोबांकडे, जीजीकडे राहत असताना भोगलेल्या यातना,सहन केलेला मार आणि त्यातूनही शिक्षणाची धरलेली कास वाचकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करते.एका रक्ताचे असूनही आई, भाऊ आणि लेखक यांची नावे मात्र वेगवेगळी आहेत.हे कशामुळे झाले आहे ,या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातील शेवटचे पान वाचल्यावर समजते. खरे पाहता,लहानपणापासून झालेल्या संघर्षमय प्रवासातून M.B.B.S. पर्यंतची लेखकाने मारलेली मजल आदर्शवत अशीच आहे.त्यांनी भोगलेल्या आयुष्याबद्दल वाचताना असे वाटते की त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर जीव दिला असता नाहीतर कुणाचा घेतला असता.पण शिक्षणाची सुरुवात करायची हे ठरविणारे लेखक खूप काही शिकवून जातात.त्यांनी तोंड दिलेली संकटे पेलण्यासाठी अंगी कोणत्या प्रकारचे सामर्थ्य असायला हवे याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो.
शिक्षण आणि जिद्द असेल तर परिस्थिती,जात,धर्म यांना भेदून एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचते.आणि लेखकाने या आत्मचरित्रात आयुष्याचे केलेले चित्रण हेच आदर्शवत विचारांची प्रेरणा देऊन जाते.
Comments
Post a Comment