या पुस्तकाच्या पृष्ठभागावरून या पुस्तकात काय असेल याची जाणीव होते.यामध्ये उल्लेख केलेल्या घटनांची दाहकता न पटण्यासारखी असली तरी त्याला सत्याची किनार आहे.आणि सत्याचे तेच धागे हे पुस्तक वाचताना मनाला पोखरतात, मन सुन्न करतात.
'भिमराव गस्ती' यांनी चळवळी, आंदोलन आणि समाजकार्य यातून काय मिळविले हा वेगळा प्रश्न असला तरी त्यांची समाजकार्याची सुरुवात बालपणात झालेली आहे.' यमनापुर ' या गावी जन्म घेतलेले 'भिमराव ' इतर मित्रांच्या संगतीला झुगारून शाळेशी मैत्री करतात.आणि त्यासाठी त्यांच्या वडिलांचा खंबीर पाठिंबा पाहायला मिळतो. पुढे याच शिक्षणाचा उपयोग समाजाला न्याय देण्यासाठी करण्याचे ते ठरवितात. त्यावेळी मात्र ते एकटेच बाजूला पडतात.ना घरच्यांचा पाठिंबा, ना समाजाचा आणि ज्यांच्यासाठी त्यांनी झगडायचे ठरविले त्यांचाही पाठिंबा असत नाही. अशा परिस्थितीत नोकरी मिळत असताना, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झट नाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला खरा सलामच. समाजकार्यात वाहून घेतल्यानंतर कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले आणि तरीही समाजसेवेची वाट त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. हे व्यक्तीमत्त्व मनात जिद्द असेल आणि शिक्षणाची सोबत व संयम असेल तर व्यक्ती जगात जगात काहीही करू शकतो, हीच प्रेरणा देऊन जाते.
पण या पुस्तकात त्यांनी मांडलेले सत्य म्हणजे विस्तवाशी झुंज देणे असेच वाटते. लहानपणी बेरड समाजात जन्माला आल्याने सर्वजण त्यांना चोर म्हणून हिनवतात. कित्येक वेळा त्यासाठी शिक्षकांचा मारही त्यांना खावा लागतो. आणि दुसऱ्याच्या कृत्याची शिक्षा लहानपणापासून तेही अनुभवतात. शाळेत शिकत असताना पोलिसांच्या मारातून त्यांच्या भावाचा झालेला मृत्यू, मन हेलावून टाकतो. त्याचप्रमाणे त्यांनी समाजासाठी संघटना तयार करणे, परिषदा भरविणे आणि काही वेळेस त्यामध्ये लोकांचा पाठिंबा न मिळणे , हे पण वेगळा विचार करायला भाग पाडते. बेरड समाज असलेल्या दोन गावात झालेली भांडणं आणि त्यातून न सांगता येण्यासारखे अत्याचार करणारे पोलिस आणि या तिढ्यातून जातीबांधवाणी त्यांनाच खुनाची दिलेली धमकी वास्तवाला कायम जिवंत ठेवते. त्याचप्रमाणे भीमरावांच्या वाढत्या प्रस्थाला आडकाठी करणारे राजकारणीही पाहायला मिळतात . पण आपल्या गावासाठी, समाजासाठी सायकलवरून गावोगावी फिरणारे' भिमराव गस्ती'दुसरे आंबेडकर वाटतात. त्यातच शेवटी ' यल्ल्या ' या सोळा वर्षांच्या मुलाचा झालेला खून आणि पैशाने दडपविलेले सत्य म्हणजे ' दाहक वास्तव '. हे आत्मचरित्र आहे, असे म्हणताना या महात्म्याने एवढे सोसून आपले कार्य अखंडित कसे काय ठेवले असेल आणि तेही राजकारणाचा कोणताही आधार न घेता, याबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
Comments
Post a Comment