हे पुस्तक म्हणजे एक अकल्पित वास्तव. संघर्ष आणि आयुष्य यांचा सुरेख संगम या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने आपल्यासमोर मांडण्याचा सुंदर प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक वाचत असताना किती वेळा अंगावर शहारे आल्याचे मला जाणवले. लहान मुलांना गुलामगिरी, अत्याचार आणि अतिव दुःखातून बाहेर काढण्याकरिता झटलेल्या एका महान अवलिया 'कैलाश सत्यार्थी' यांची संघर्षमय गाथा आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळते.
लेखकाने कैलाश सत्यार्थी यांच्या जन्मापासून ते नोबेल शांतता पुरस्कार मिळेपर्यंतचा कठीण प्रवास या ठिकाणी वर्णिला आहे. एखाद्या व्यक्तीला आपण महानतेचा दर्जा देतो त्यावेळी त्या व्यक्तीचे आयुष्य, संघर्ष समजून घेणे खूप गरजेचे असते. बाल गुलामगिरीच्या नरकातून लहान मुलांना सोडवणारे कैलाश सत्यार्थी यांना त्यांच्या लहानपणापासून शाळेत येऊ न शकणाऱ्या मुलांबद्दल अतिशय ओढ होती. त्यांच्या जन्मा बद्दलची एक गोष्ट आहे, त्यामध्ये त्यांचा मोठा भाऊ सुरेंद्र याचा अचानक मृत्यू झाला आणि या घटनेमुळे त्यांचे पूर्ण कुटुंब निराश झाले होते. त्यावेळी ओरछचे तहसीलदार तिवारी राम मंदिरात जाऊन लोकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत असत. आणि तेच तहसीलदार कैलास सत्यार्थी यांच्या वडिलांच्या स्वप्नात येऊन तुम्हाला तुमचा मुलगा लवकरच मिळेल असे सांगतात. आणि काही दिवसानंतरच कैलास सत्यार्थी यांचा जन्म होतो. त्यामुळे सुरुवातीला प्रत्येक जण त्यांना सुरेंद्र अशी हाक मारीत असत. पण त्या नावाने हाक मारल्यानंतर कैलाश कोणतेही उत्तर देत नसत. पुढे चौकशी केल्यानंतर असे लक्षात आले की ते तहसीलदार एका अपघातात मरण पावलेले आहेत. आणि तेव्हापासून प्रत्येकाने त्यांना कैलाश या नावाने हाक मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा पुनर्जन्म झाला असल्याचे सर्वजण समजतात.
अशाप्रकारे त्यांच्या लहानपणापासूनचे प्रत्येक प्रसंग या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला समजतात. पुढे विदिशा नगरपालिकेच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या शाळेत कैलाश शर्मा यांना प्रवेश मिळाला. त्यावेळचा एक प्रसंग असा होता की, शाळेमधील प्रार्थना संपल्यानंतर शाळेच्या बाहेर बूट पॉलिश करणारा मुलगा त्यांना दिसतो आणि शाळेत येण्यासाठी ते त्याला विचारू लागतात. त्याचप्रमाणे वर्गातील वर्ग शिक्षकांनाही ते याबद्दल विचारतात पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. तेव्हा त्या शाळेचे मुख्याध्यापक सांगतात की 'ज्याला शिकायचे नाही त्याला आपण कसे काय शिकवणार'. पण या उत्तरानेही त्यांचे समाधान होत नाही. धाडस करून ते त्या मुलाच्या वडिलांना याबद्दल विचारतात, त्यावेळी त्याचे वडील सांगतात की आमच्या पिढ्यानपिढ्या कोणीही शिक्षण घेतलेले नाही. आणि आमचा जन्म मजुरी आणि इतरांची सेवा करण्यासाठीच झाला आहे. या प्रसंगावरून आपल्या समजते की कैलाशजींना लहानपणापासूनच समाज सेवा करायची आवड होती. आणि त्यामुळे पुढे जाऊन त्यांनी बालमुक्तीचे व्रत हाती घेतले. शाळेतही ते प्रतिभा संपन्न विद्यार्थी समजले जात असत.
लहान असल्यापासूनच त्यांना महागड्या वस्तू, कपडे यांची अजिबात आवड नव्हती. पुढे इंजिनिअरिंगला शिकत असतानाही त्यांची राहणी खूप साधी होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे कैलास सत्यार्थी आपल्याला खूप काही शिकवून जातात. अजून एक घटना अशा आहे की त्यामध्ये एका झोपडवस्तीत आग लागलेली असताना लोकांना मदत करताना त्यांचे दोन्ही हात पोळले होते. यावरूनही त्यांच्या स्वभावातील वेगळेपण आपल्या लक्षात येते. पुढे लग्न ठरल्यानंतर ही त्यांनी आपल्या पत्नीला ते करत असणाऱ्या कामात साथ देण्याबद्दल विचारले होते. आणि त्याचमुळे त्यांना बालकामगार मुक्ती संकल्प तडीस नेता आला. त्यांचा मुलगा भुवन आणि मुलगी अस्मिता दोघेही आजही त्यांच्या कामात मदत करीत असतात. मजुरी मुक्तीसाठी सुरुवातीला काम करणारे कैलाश सत्यार्थी चंदिगढ मधील एका घटनेमुळे बाल गुलामी मुक्तीकडे वळले. ती घटना अशी होती की, १४-१५ वर्षाच्या एका मुलीला वीट भट्टी ठेकेदार विकण्याची तयारी करत होते. कैलास सत्यार्थी यांना त्याबद्दल समजले व ते आपल्या मित्रांसोबत त्या ठिकाणी गेले. तेथील परिस्थिती फोटोग्राफरच्या साह्याने कॅमेरात कैद केली. आणि कारखान्यामध्ये बंदी केलेल्या मुलीची तिथून सुटका केली. आणि खऱ्या अर्थाने १९८६ पासून बचपन बचाव आंदोलनाला सुरुवात झाली. बालगुलामगिरी बद्दल बोलताना ते सांगतात की, लहान मुलांना त्यांचे बालपण जगण्याची ,शिकण्याची आणि खेळण्याचे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ध्येय माझ्या डोळ्यासमोर होते. या मार्गावर चालत असताना त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. मुलांची सुटका करायला जात असताना ,कित्येक वेळा ते घरात येतील की नाही याची शाश्वती नसायची. यावरूनच लक्षात येते की, बाल गुलामगिरीतून मुक्त करण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास वाटतो तेवढा सोपा नव्हता. पण त्यांनी तो पूर्ण करण्याचा सफल प्रयत्न नक्कीच केला. त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तुम्हाला मुलांच्या अधिकारांसाठी लढण्याशिवाय दुसरे काय जास्त आवडते? त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर होते 'घरचे जेवण'. यातूनच आपल्या लक्षात येते की या कामामधून ते आपल्या घरी किती कमी वेळा जात असतील.
१९९३ मध्ये बचपन बचाओ आंदोलन अंतर्गत बालमजुरी विरोधात बिहार-दिल्ली दरम्यान २००० किमी लांब पदयात्रेचे आयोजन त्यांनी केले होते. त्यातूनच त्यांच्या या मुक्ती मोहिमेला गती मिळाली. पुढे 'ग्लोबल मार्च अगेन्स चाइल्ड लेबर' याचे आयोजन त्यांनी केलेले होते आणि त्यामध्ये १०३ देशांमधून अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग सहभाग घेतला होता. कैलाश सत्यार्थी यांच्या प्रयत्नांमुळे,बाल गुलामी थांबविली पाहिजे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा करणे गरजेचे आहे असा विचार त्यांनी मांडला आणि १७८ पेक्षा अधिक देशात हा कायदा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या मतानुसार या सगळ्या घटनांमागे त्यांच्या प्रत्येक सहकार्याचा खंबीर पाठिंबा होता. आणि त्यामुळेच या कार्यात काही त्यांना यश मिळाले. बाल कामगारांच्या समस्येबद्दल बोलताना ते सांगतात की, निरक्षरता हे बालमजुरीचे मुख्य कारण आहे आणि त्यामुळे सर्वांना शिक्षण मिळायलाच हवे. या शिक्षणामधूनच मुलांची वैचारिक प्रगती होऊन बालमजुरी कमी होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. बाल गुलामी, बाल लैंगिक शोषण, अत्याचार अशा असंख्य घटना गरीबी आणि निरक्षरता यामुळे घडताना दिसतात. फक्त शिक्षणातूनच त्यांचे भविष्य उज्वल होऊ शकेल आणि त्याबरोबरच देशाचेही भविष्य उज्वल होईल. विचारातील विद्वत्ता स्पष्ट करताना ते सांगतात की 'जे करण्याची आणि मिळवण्याची तुमची मनापासून इच्छा आहे तेच करा'. मध्य प्रदेशामधील' विदिशा ' या अल्प विकसित शहरात राहणारे कैलाश शर्मा प्रत्येक आव्हानांचा सामना करत बालमजुरीला विरोध करण्याचे जगावेगळे धाडस करतात यावर आपला विश्वास बसत नाही. म्हणूनच त्यांना 'कैलाश सत्यार्थी' असे म्हटले जाते. ते पुढे असेही सांगतात की' काहीही न करता कोणीही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. जीवनाचा खरा अर्थ असा आहे की इतरांसाठी असे काहीतरी करून दाखवणे असते की ज्याची सर्व जगाने आठवण काढत राहावे'.
जगामध्ये बाल गुलामगिरी ,शिक्षण आणि जनजागृती यासाठी काम करणारे ते सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत. बालमजुरी आणि निरक्षरता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यामुळेच शिक्षण महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. अनेक मुलांची त्यांनी कालीन उद्योगातून सुटका केली आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच मुलींची सुटका करत असताना त्यांना अनेक वेळा मारही खावा लागला ,त्याचप्रमाणे काही घटनांमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांना प्राणही गमवावा लागला होता. त्यांच्या या उत्तुंग कार्याची घेतलेली नोंद म्हणून १० डिसेंबर २०१४ मध्ये त्यांना 'नोबेल शांतता पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. अशाप्रकारे हे पुस्तक म्हणजे कैलास सत्यार्थी यांनी केलेले केलेले कार्य-कर्तुत्व आपल्याला प्रेरणा देऊन जाते.
very good madam...keep it up.
ReplyDelete