Skip to main content

' रणजीत देसाई ' लिखित एक कादंबरी ' राधेय '

             एक थोर साहित्यिक 'रणजित देसाई ' यांचा जन्म कोल्हापुरातील ' कोवाड ' येथे एका संपन्न कुटुंबात झाला होता. त्यांचे कोणतेही साहित्य वाचणे म्हणजे एक ज्ञानमय व सुंदर अनुभव म्हणायला हरकत नाही. त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केलेले आहे. आणि त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र शासनाने त्यांना  'पद्मश्री ' हा किताब देऊन गौरवलेले आहे. त्यांच्या असंख्य साहित्य कृतीतील 'राधेय ' ही कादंबरी माझ्या वाचण्यात आली.

            ही कादंबरी महाभारतातील दुर्लक्षित,उपेक्षित पण सामर्थ्यपूर्ण, कर्तुत्वशाली सूर्यपुत्र ' कर्ण ' या पात्रावर आधारलेले आहे. कादंबरीच्या सुरुवातीला कुरुक्षेत्र आणि त्या ठिकाणी झालेल्या कौरव -पांडव यांच्या युद्ध समाप्तीनंतरची भेसूर शांतता आणि सर्व पांडव कुंती माता आणि कृष्ण यांचा चाललेला संवाद मन स्तब्ध करतो. त्यातूनच समजते ती कर्णाची जीवन कहाणी.

             राधा माता आणि अधिरथ यांच्या मायेच्या छत्राखाली कर्णाचे बालपण गेल्याचे आपल्याला समजते. लहानपणापासूनच त्याच्या मनात गंगा नदीविषयी असणारी अनामिक ओढ आणि त्या पाठीमागे असणारे कारण लक्षात येत नसते. तसेच कुणालाही न मिळालेली कवचकुंडल आपल्यालाच का मिळाली याचे उत्तरही त्याला अस्वस्थ करत असते. आणि त्यामुळे कृष्णा सोबत चर्चा करताना कर्णाच्या तोंडून निघालेल वाक्य त्याच्या मनातील अस्वस्थता वर्णन करते, ' ज्याला माता पित्याच छत्र नसतं, त्याला कवच कुंडल रक्षणार्थ मिळतात.' त्याच्या मनात त्याच्या जन्मापासूनचे असंख्य प्रश्न असतात पण त्या सर्वांची उत्तरे त्याला खूप उशिरा मिळतात. गंगेच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना राधा माता आणि अधिरथ बाबा यांना सापडलेला कर्ण ज्येष्ठ पांडवपुत्र असूनही शेवटपर्यंत उपेक्षितच राहतो. कुंतीला दुर्वास ऋषींच्या सेवेतून मिळालेला मंत्र आणि उत्सुकतेपोटी सूर्य साक्षीने उच्चारलेला तो मंत्र. व त्यातूनच कौमार्य अवस्थेत जन्माला आलेला कर्ण. जन्मापासूनच सुरू झालेले हे प्रतीत प्रवाह वाहने जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहते. त्यामुळे ही कादंबरी वाचत असताना या पात्राबद्दलचा आदर अधिकच वाढतो.

              द्रौपदीच्या स्वयंवराची कथाही या ठिकाणी वर्णिली आहे. त्यामध्ये सर्व क्षमता असूनही फक्त कर्ण  उच्चकुलातील नाही, तो सुतपुत्र आहे आणि त्यामुळे कितीही पण पूर्ण केले तरीही ' मी सुतपुत्राला करणार नाही ' असे द्रौपदीचे बोलणे, मनाला काही वेळ सुन्न करते. आणि त्याचवेळी राजसुय यज्ञाच्या वेळी द्रौपदी पंक्तीत वाढत असताना कर्णाला ' कावळ्यांनी राजहंसीकडे पाहू नये ' असे वाक्य उच्चारते. आणि या दोन प्रसंगामुळे पुढे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी कर्णाच्या तोंडून नको ते उद्गार बाहेर पडतात. या घटनेमुळे त्या ठिकाणी अनेक प्रतिज्ञा घेतल्या जातात. कर्णाच्या निर्मळ  मनाला ती चूक शेवटपर्यंत छळताना दिसते. सुरुवातीपासूनच चूक नसतानाही नशिबी आलेली पोरकेपण, उदासीनता, क्षणोक्षणी होत असणारा अपमान कादंबरी वाचत असताना करूनमय हृदयाला बांध फोडतो. प्रत्येक ठिकाणी सारथी पुत्र म्हणून हिनवले जाते. तरीही कर्ण हा प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असतो. याच कर्णाला पुढे दुर्योधनासारखा मित्र मिळतो जो त्याला सर्वांसमोर अंगदेशाचा राजा म्हणून घोषित करतो. आणि याच मित्रप्रेमापोटी कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या वेळीही कुंतीमाता, कृष्ण यांच्या सांगण्यावरून ही तो पांडवांच्या बाजूने जात नाही.

              कर्ण हा ज्येष्ठ पांडव पुत्र होताच पण सर्व विद्येतही निष्णात होता. आणि याच गोष्टीची जाणीव असल्यामुळे भीष्मानाही कर्ण सोबत असेल तर कौरव जिंकतील असे वाटत होते. आणि त्याचमुळे ते सतत कर्णाचा अपमान करताना पाहायला मिळतात. द्रोणाचार्य विद्या शिकवायला तयार नव्हते आणि त्यासाठी परशुरामांकडे ब्रह्मास्त्र मंत्र ग्रहण करण्यासाठी कर्ण गेला. त्याच वेळी एका ऋषीची गाय नकळत त्याच्याकडून मारली गेली आणि त्यामुळे ऐन रणांगणावर रथाचे चाक रुतून बसेल असा शाप त्याला मिळाला. आणि युद्धामध्ये तो शाप खरा ठरला, रथाचे रुतलेले चाक काढत असताना कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने निशस्त्र कर्णावर बाण सोडला. निशस्त्रावर शस्त्र चालवणे हे नीतीच्या विरुद्ध असते परंतु हीच नीती या युद्धामध्ये अवलंबली गेली. कर्णाला कोणी जिंकू शकत नाही हे माहीत असल्यामुळे, अर्जुनाचे गुरु इंद्रदेव कर्णाला  जाऊन कवचकुंडलाचं दान मागतात. आणि दानशूर कर्ण त्याला अभेद्य ठेवणारी ती कवचकुंडले देऊन टाकतो. कुंती माताही त्याच्याकडे येऊन मुलांच्या आयुष्याची भिक मागते. तो आपल्या वचनाला कटिबद्ध राहतो. तसेच अर्जुनाशिवाय कुठल्याही पांडव  पुत्राला मी मारणार नाही असा शब्द कुंती मातेला देतो आणि तो शब्द पाळतो.  शेवटी रथचक्र काढण्यात गुंतलेल्या कर्णाला मारणे हे चुकीचे असतानाही कृष्णाचा सल्ल्याने अर्जुना बाण चालवितो पण तो विजय शापित होता.

                या कादंबरीत भीष्माचार्यांनी मरण सेवेवर असताना उच्चारलेले वाक्य विचार करायला लावणारे आहे. ते कर्णाला म्हणतात की, ' आपल्या त्यागाने, सोसण्याने  दुसऱ्याच जीवन अधिक संपन्न करतात तेच कीर्ती रूप बनतात. ' कर्णाने तेच साध्य केले. परशुराम कडून मिळालेले ब्रह्मास्त्र अर्जुनाचा वध करण्यासाठी ठेवलेले होते परंतु दुर्योधनाच्या सांगण्यावरून घटोत्कचावर  त्याचा उपयोग करावा लागला नाहीतर शेवटच्या क्षणी त्याला ते वापरता आले असते. एक ना अशा असंख्य घटना, निर्णय घेतले. यातून सूर्यपुत्र कर्ण, दातृत्व ठायी असणारा कर्ण, मृत्यूलाही मित्र प्रेमापोटी स्वीकारणारा कर्ण शेवटपर्यंत वाचकांच्या मनावर भुरळ पाडतो. आपला मुलगा वृषसेन गेल्यानंतर कासावीस होणारा बाप आणि ती गोष्ट वृषालीला सांगत असताना खंबीर दिसणारा पती अशा असंख्य भूमिका प्रामाणिकपणे निभावणारा कर्ण खूपच महान होता. ही कादंबरी या पात्रात या  भावनांचा ठाव घेऊन आपल्यामध्येही दडलेला कर्ण ही असाच असेल किंवा असला पाहिजे असे भाकीत करते.


Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...