Skip to main content

'शरद तांदळे' लिखित पुस्तक ' रावण - राजा राक्षचांचा '

                  'शरद तांदळे' हे नाव परिचित नाही,असे म्हणणारे लोक क्वचितच आढळतात. कोणतीही व्यक्ती घडण्यासाठी त्या व्यक्तीची परिस्थिती कारणीभूत असते, मग काही लोकांना वाईट परिस्थिती मधून त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला तोंड देण्याची ऊर्जा मिळते,तर काही लोकांना चांगली परिस्थिती असतानाही, 'मला काहीतरी करायचं आहे' या विचारातून आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.आणि त्याचप्रमाणे एका सामान्य घरातील मुलगा स्वकर्तृत्वावर तरुण पिढीचा आदर्श बनतो, ही गोष्ट अविश्वासनीय वाटते. लेखक, तरुण पिढीचे प्रेरणा स्त्रोत आहेतच पण उत्तम  लेखकही आहेत, हे मला त्यांचे पुस्तक  ' रावण - राजा राक्षसांचा' वाचताना जाणवले. लहानपणापासून रामायणाबद्दल ऐकत असताना आणि पुढे रामायण वाचल्यावरही, राम आणि रावण या पात्रांचा विचार करत असताना, रामाच्या व्यक्तीमत्वाबद्दल असणारा चांगुलपणा अभ्यासताना रावणामध्ये चांगले गुण असतील हा विचार मनामध्ये आला नव्हता. पण या पुस्तकाने मला नवीन विचार मिळाला. शरद तांदळे यांच्या लिखाणात वाचकांना पकडून ठेवण्याची जबरदस्त शैली आहे कारण मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर, पुढे आणखी काय असेल अशी उत्कंठा  पुस्तक वाचून संपेपर्यंत तशीच होती.

                 हे पुस्तक काही प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. सुरुवात होते,ती रावण  लहान असतानाच्या एका प्रसंग वर्णनातून आणि हे पुस्तक म्हणजे रावणाने केलेले स्वतःच्या आयुष्याचे कथन आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचत असताना, आपणच रावण या पात्राच्या ठिकाणी आहे असे भास होतात. सुरुवातीच्या प्रकरणामधील एक प्रसंग असा आहे की, रावणाने लहानपणी पावसाळ्यामध्ये फुलपाखराला पकडलेले असते आणि त्या फुलपाखराला सोडून देण्यासाठी आई सांगत असते, त्यावेळी 'रावण ' म्हणजेच 'दशग्रीव ' याला उद्देशून त्याची आई म्हणते की, ''दशग्रीव, बंदिस्त आयुष्याच्या दुःखाची जाणीव झाल्यावर तुला समजेल की, मी त्याला का सोडून द्यायला सांगितले" आणि  हेच आईचे वाक्य आणि त्या वाक्याचा अर्थ त्याच्या आईचे पूर्ण आयुष्य उलगडून सांगणारे आहे. दशग्रीव, कुंभकर्ण, बिभीषण हे तिघे सख्खे भाऊ आणि महापार्श्व, खर, दूषण , शुर्पनखा, महोदर,  ,कुंभीसनी असे एकूण नऊ सावत्र आणि मावस भाऊ. ते लहान असताना वडील 'विश्रवा ' आणि आई 'कैकसी ' यांच्यासोबत एका आश्रमात राहत असतात. त्यावेळी सुद्धा या लहान भावंडांमध्ये देवांच्या अस्तित्वाबद्दल चर्चा चाललेल्या असतात. त्यानंतरचा एक प्रसंग असा आहे की, एके दिवशी त्यांच्या आश्रमातील कुटीवर हल्ला होतो.बऱ्याच वेळाने समजते की , हे  दुसरे कोणी नसून दशग्रीवचे आजोबा 'सुमाली ' आणि त्यांच्याबरोबर  दशग्रीवच्या आईचा लहान भाऊ 'प्रहस्त ' आहे पण त्या हल्ल्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असते आणि ते खरे कारण समजल्यानंतर दशग्रिवही आपल्या आई सोबत जाण्याचा निर्णय घेतो. आपल्या जन्माची खरी कहाणी, ज्यावेळी दशग्रीवला समजते त्यावेळी, त्याचे मन शांत बसायला तयार नसते. त्याची मनस्थिती त्याला जीवन संपवण्यापर्यंत घेऊन जाते आणि आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात येतो.आणि एका जंगलात गेल्यानंतर लांडग्याचा त्याच्यावर हल्ला होतो आणि त्या ठिकाणी लांडग्याला मारल्यानंतर,' मी असा मरणार नाही ,मला फक्त मीच मारू शकतो ' असे म्हणणाऱ्या 'दशग्रिवच्या ' म्हणजेच 'रावणाच्या ' मनाची तग-मग आणि लहानपणापासूनचा त्याच्या आयुष्यातील संघर्ष हे पुस्तक वाचत असताना आपल्याला समजतो. मग त्यानंतर त्याच्या वडिलांनी केलेला त्याच्या आई व मावशी यांच्या अत्याचाराची आठवण, प्रतिशोधाची भावना त्याच्या मनात निर्माण करताना दिसते. आणि त्यानंतरचा प्रत्येक श्वास त्या दोघींवर झालेल्या अत्याचाराच्या सुडासाठीच असेल अशी शपथ रावण घेतो.

                  त्याने त्याच्या मनामध्ये ठरविलेल्या संकल्पाची सुरुवात करण्याअगोदर तो त्याच्या 'पौलस्त्य ' आजोबांना  भेटण्याचे ठरवतो. त्यासाठी प्रहस्ताला सोबत घेऊन तो त्यांना भेटण्यासाठी निघतो. तिथे गेल्यानंतर त्याचे असणारे आजोबा म्हणजेच विश्रवाचे वडील खूप योग्य असे विचार प्रकट करून रावणाच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता पेरतात. रावणाच्या मनामध्ये अनेक शंका असतात आणि त्या शंकांना उत्तर देत असताना, आजोबा सांगतात की, जन्मजात कुणीही श्रेष्ठ नसतो. त्यामुळे नकारात्मक गोष्टींचा विचार न करता, स्वतःची क्षमता वाढवण्यात ऊर्जा खर्च करण्याचा सल्ला ते देतात. आणि पुढील शिक्षणासाठी ब्रह्मदेवांकडे जायचे आहे, याची कल्पनाही ते देतात. स्वतःच्या कुळाबद्दल माहिती नसल्यामुळे त्याला वाईट वाटत असते. पण ज्यावेळी आईकडून त्याला समजते की महादेव हे त्यांचे आद्य दैवत आहे, आणि 'पुष्पक यान ' जे कुबेराकडे होते ते सुरुवातीला महादेवाने आजोबांच्या वडिलांना दिले होते. पण देव आणि असुर यांच्यामध्ये झालेल्या युद्धात असुरांचा पराभव झाल्याने ते आता आपल्याजवळ नाही याची कल्पना रावणाला येते. त्याचबरोबर लंका त्यांच्या हातून कुबेराला कशी मिळाली, याबद्दलचाही पूर्ण इतिहास त्याला समजतो. आईने भोगलेले दुःख आणि संघर्ष यांना साक्षी ठेवून या सगळ्याचा बदला घेण्याचे दशग्रीव ठरवतो आणि त्याकरता सुरुवातीला अज्ञान दूर करण्याची गरज लक्षात घेऊन ब्रह्मदेवाकडून विद्या ग्रहण करण्याचे ठरवले जाते. त्या ठिकाणी घेतलेले ज्ञान आत्मसात करून कुंभकर्ण , बिभीषण आणि रावण परत येण्यासाठी निघतात. परत आल्यानंतर त्यांना पाहून सर्वांना खूप आनंद होतो.आईला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याची आई ,'आता फक्त तुला असुर राजा झालेलं बघायचा आहे' असे वचन मागते. तेव्हापासून 'देवांचा राजा इंद्र' आणि 'राक्षसांचा किंवा असूरांचा राजा दशग्रिव ' हा एकच विचार त्याच्या मनात रुजू लागतो. त्यासाठीची परिक्रमा सुरू होते, सुरुवातीला जंगलात फिरत असताना काही सामान्य लोकांवर हल्ला झालेला होता.ते लोक या रावणाकडे आले, त्यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल सांगितले. आणि त्या हल्लेखोरांना प्रहस्त, महोदय, कुंभकर्ण, दशग्रिव हे  सर्वजण मिळून मारतात. त्या लोकांना आपल्या असुर सेनेत सामील करून घेतात. आणि तेव्हापासून असुर सेनेमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरू होतात.

                    पुढे सगळे ंच्या मतानुसार दशग्रीवला 'असुरांचा राजा' करण्याचे ठरवितात. पण राज्याभिषेक हा 'लंका ' काबीज केल्यानंतरच होणार असे निश्चित करण्यात येते. त्यासाठी सर्वजण दक्षिणेकडे कुच करतात आणि राक्षस जमातीसाठी सैन्य वाढविण्यासाठी  प्रयत्न सुरू करतात. आणि त्यातूनच असुर सेनेबद्दल सर्व ठिकाणी दहशत बसावी, म्हणून दशग्रीवला दहा डोकी आणि वीस हात असल्याची अफवा सगळीकडे पसरवण्यात येते. पुढे सैन्याची तयारी झाल्यानंतर सर्वजण लंकेच्या राजधानीकडे कुच करतात. पण हल्ला करण्याच्या अगोदरच कुबेर लंका दशग्रिवला देऊन टाकतो. ही लंका काबीज केल्यानंतर रावणाचे मंदोदरीशी लग्न होते.आणि मेघनाथ आणि अक्षयकुमार हे दोन पुत्र होतात. त्यानंतर अशाच मोहिमा करत असताना अंगद्वीप, यवद्वीप, मलयद्विप, शंखद्वीप, कुशद्वीप, वराहद्वीप, आंध्रालयावर आपली सत्ता निर्माण करतात. साम्राज्याची निर्मिती होते आणि दशग्रीव याला आता 'लंकाधिपती रावण ' असे संबोधण्यात येते. अनेक पराक्रम करत असतानाच पुढे आर्यवर्तात 'कुशल ऋषींचा आश्रम' उध्वस्त करण्यात येतो. त्यानंतर , त्यांचाही पराभव केला जातो. हा सर्व प्रतिशोध चालू असतानाच रावणाच्या मनामध्ये स्वकर्तुत्वाच्या जोरावर लंका निर्मिती करण्याचे मनात येते.आणि त्यासाठी मंदोदरीचे वडील ' मय ' यांना बोलवण्यात येते. लंका ही पूर्ण सोन्याची असावी यासाठी  लंकेची राजधानी असणाऱ्या ठिकाणच्या 'त्रिकुटा पर्वताची ' निवड करण्यात येते. सोने, माणिक, रेशीम, सागवान या सर्वांचा वापर करून भव्य लंकेची निर्मिती  करण्याचे ठरविण्यात येते. या लंकेची निर्मिती करत असताना, उच्च प्रतीचे शिल्प आणि कलाकुसर यांचा विचार मय यांनी केला असतानाच पायथ्याला भव्य सिंहाची प्रतिकृती कोरली होती.आणि हे पाहिल्यानंतर रावणालाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, इतकी सुंदर , अप्रतिम अशी सोन्याची लंका मयाने निर्माण केली होती. आणि ते पाहिल्यानंतर  आतापर्यंत कधीही न झालेला आनंद 'लंकाधिपती रावणाच्या' चेहऱ्यावर दिसत होता. पण या आनंदामधूनच त्याला त्याचे आजोबा आणि आईचा मृत्यू पाहण्याचे दुर्दैव समोर येते, त्यावेळी त्याच्या मनाची झाली स्थिती वर्णन करत असताना रावणाने उचललेले वाक्य 'जगणं  ज्याच्याकडून शिकलो तेच उरले नाहीत'  विचार करायला भाग पाडते.

                   म्हणून रावणाच्या आयुष्याचा विचार करत असताना, त्याच्या आयुष्यातील अनेक नवनवीन पैलू या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात. त्यामध्ये वाली आणि रावणाची मैत्री आदर्शवत  होती,असे जाणवते. रावणाने लंकाधिपती होण्याचा मान स्वकर्तृत्वाने मिळवलेला आहे ,हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. त्याने मिळवलेल्या प्रत्येक वि जयामध्ये त्याचे खरे सामर्थ्य,नियोजन आणि प्रगल्भ विचार दिसून येतात.याचप्रमाणे त्याच्या मनात त्याच्या प्रजेविषयी असणारी कळकळही नजरेतून सुटत नाही.त्यामुळेच त्याने उभारलेली लंका ही पूर्ण प्रजेसाठी होती, त्यामध्ये फक्त स्वतःचा विचार नव्हता. लंका उभारणी झाल्यानंतर रावणाने जो प्रतिशोध घेण्याचे ठरवलेले असते, तो पूर्णत्वास आला आहे असे वाटते. पण खरे संकट पुढे ठाण मांडून बसलेले असते. राम , लक्ष्मण आणि सीता हे तिघेजण वनवासासाठी बाहेर पडलेले असतात. आणि एका जंगलात राम-लक्ष्मण आणि सीता  हे  वास्तव्यास असतात.त्याचवेळी रावणाची बहिण ' शुर्पणखा ' पण भटकंतीसाठी त्याच जंगलात आलेली असते. राम आणि लक्ष्मण तिच्या दृष्टीस पडतात आणि त्यांना ती लग्नाची मागणी घालते.पण ही गोष्ट न आवडल्यामुळे लक्ष्मण तिचे नाक आणि कान कापून  तिचा चेहरा विद्रूप करून टाकतो.आणि या घटनेमुळे, आपल्या बहिणीला विद्रूप करणाऱ्या राम आणि लक्ष्मणाचा बदला घेण्यासाठी तो मारीच ऋषीची मदत घेऊन सीतेचे हरण करतो.आणि तिला 'अशोकवनामध्ये ' ठेवतो. अशोकवनामध्ये ठेवल्यानंतरही त्या ठिकाणी संरक्षणासाठी असणाऱ्या दासी या स्त्रिया असतात आणि रावण तिच्या केसालाही धक्का लावत नाही. यातूनच त्याच्या  स्वभावातील वेगळा गुण आपल्याला समजल्याशिवाय राहत नाही. सीतेला आपल्या लंके मध्ये  आणल्यानंतर तो तिच्यासोबत काहीही करू शकला असता पण तसे करताना तो आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. आणि हीच गोष्ट रावण या व्यक्तिमत्त्वाबद्दल वेगळा विचार करण्यास वाचकांना भाग पडते.

                    पुढे राम आणि लक्ष्मण लंकेमध्ये सीतेला सोडवण्यासाठी आल्यानंतर प्रतिशोध घ्यायचा असे रावण ठरवतो. पण पुढे त्याचाच भाऊ 'बिभीषण '  मनात आलेल्या सत्तेच्या लालसेतून  रामाला जाऊन मिळतो.आणि सैन्याबद्दलचे आणि रावणाच्या मृत्यू बद्दलचे गुढ त्यांना सांगतो.दुसरीकडे  मेघनाद यज्ञ करत असताना त्याची केलेली हत्या, वालीची कपटाने केलेली हत्या  वेगळा विचार करायला भाग पाडते. या  दोन प्रिय व्यक्तींच्या मृत्यूने रावण सावरू शकत नसल्याचे आपल्याला हे पुस्तक  वाचताना लक्षात येते. शेवटी राम आणि लक्ष्मण यांच्यासोबत युद्ध करण्याच्या तयारीने घराबाहेर जात असताना ,तो आपल्या पत्नीला  असे सांगतो की 'या युद्धामध्ये जर मला मृत्यू आला तर माझ्या मृत्यू नंतर तू सती जायचं नाहीस ,तर रावणालाही दोन बाजू होत्या आणि जी बाजू अंधारात होती,ती बाजू तू लोकांना सांगण्याचं काम करायचं, तो रावण प्रजेला समजला पाहिजे 'अशी ताकीद देतो आणि मग युद्धासाठी जातो. पुढे त्या दोघांमध्ये युद्ध सुरू असताना बेंबीमध्ये बाण लागल्याने त्याचा मृत्यू होतो आणि तो मरतो. लहानपणापासून  कोणाची साथ नसताना, ऐश्वर्य नसताना, स्वतः ऐश्वर्य निर्माण करून, युद्ध करून, सोने जमवून,प्रजेसाठी सोन्याची लंका निर्माण करणारा,'लंकाधिपती रावण ' सहजासहजी विसरता येत नाही. सुरुवातीपासूनच रावण हे पात्र आपली जीवन कथा सांगत असल्यामुळे आपण कधी रावण पात्रात समरस होऊन जातो हे समजतच नाही.

                  या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक 'शरद तांदळे ' यांनी रावणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला, असे म्हणायला हरकत नाही.अशी  कादंबरी 'रावण - राजा राक्षसांचा ' ही वाचनीय तर आहेच पण त्याचप्रमाणे अनेक जीवनमूल्ये आणि वास्तव यांचे दर्शन घडवणारी आहे.


Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...