"मागेल हुंडा त्याच्या गळ्यात येईल धोंडा"
सुरुवातीला हुंडा म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. खरे पाहता, हुंडा म्हणजे एक प्रकारची देवाणघेवाण असे समजले जात होते. प्राचीन काळापासून हुंडा देणे आणि घेणे ही प्रथा सर्रासपणे चालत आलेली आहे. जसा पूर्वी हुंडा दिला जात होता, तसा आजही दिला जातो पण त्याचे स्वरूप बदलले आहे. सुरुवातीला मुलीचे लग्न झाल्यानंतर, ती सासरी जात असताना, तिच्यासोबत म्हैस,गाय किंवा इतर वस्तू दिली जात होती. आणि ही सुद्धा अप्रत्यक्षरीत्या हुंडा देण्याची पद्धत होती. पुढे काही काळानंतर, ही पद्धत बदलत गेली. माणसाचे राहणीमान सुधारले आणि त्यातूनच मग लोक दागिने ,पैसे, भांडी यांच्या रूपाने हुंडा घेतला जाऊ लागला. काही भागात तर लग्नात 'हुंडा देणे' ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. अशा प्रकारचा विचार लोकांच्या मनामध्ये येत असेल तर त्याचा उपयोग नैतिकता टिकवण्यासाठी होणार नाही. आजही शाही इतमामात लग्न करून देणे,कन्यादान करणे, तसेच प्रतिष्ठेप्रमाणे लग्न करणे हे सुद्धा सर्रासपणे केले जाते. आणि त्यामुळे हे सुद्धा एक प्रकारचे हुंड्याचे स्वरूप असते. पण रुढी आणि परंपरा यांच्या नावाखाली, मुलीकडले लोक कशाप्रकारे भरडले जातात , याचा विचार आपण आजही करत नाही आणि अशा प्रकारची हुंडा प्रथा जर आपल्याला थांबवायची असेल तर प्रथमतः लग्न करणारा मुलगा आणि मुलगी यांनी या परंपरेवर विचार करून हुंडा न घेता लग्न करण्याचे ठरविले पाहिजे.
पण आजही अशा प्रकारचा विचार केला जात नाही. खरे पाहता, नवतरुणींनी या बाबतीत आवाज उठवला पाहिजे.पण तरीही यासाठी, प्रत्येक मुलगी तयार होते असे नाही. आणि मग मात्र 'हुंडा विरोधी चळवळ' ही फक्त अभ्यासाचा भाग होऊन जाते. विचार आहे परंतु आचार नाही आणि प्रत्यक्षात मात्र या सर्व बाबतीत अनेक गोष्टींचा उडालेला बोजवारा ठणठण गोपाळ असतो. पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूपच बदल आढळतो, परंतु ' हुंडा मागेल त्याच्याबरोबर मी लग्न करणार नाही ' अशा म्हणणाऱ्या तरुणी खूपच थोड्या आहेत. या उलट दुसऱ्या बाजूला,काही मुली स्वतः आपल्या आई-वडिलांकडे, तुम्ही माझ्या लग्नात दागिने घेतले पाहिजेत, भांडी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी करताना दिसतात. त्यात मुलींच्या सुखातच आई-वडिलांचे सुख असते,त्यामुळे नुसते लग्न करून दिले म्हणजे त्यांचे काम संपत नाही तर लग्न झाल्यापासून मुलीच्या सासरच्या माणसांची, जावयाची मर्जी राखण्यासाठी नेहमी प्रयत्न करताना दिसतात. यावेळी मुलींनी लक्षात घ्यायला हवे की ,आई - वडील आपले लग्न थाटामाटात करून देण्यासाठी कर्जबाजारी होतात आणि आयुष्यभर ते कर्ज फेडत राहतात. आपले आई -वडील ,आपल्या सुखासाठी जर एवढे करू शकत असतील तर आपण त्यांना अशा प्रकारचा त्रास देणे योग्य नाही. आपले जीवन सुखी आणि आनंदी होण्यासाठी आपण दुसऱ्याच्या जीवाची, दुसऱ्याच्या सुखाची पर्वा का करत नाही? हा पण प्रश्न विचार करण्यासारखाच आहे. मुलींनी सुरुवातीला स्वतःच्या पायावरती उभे राहून, 'माझे लग्न मी स्वतःच्या कमाईवर करेल' असे ठरवले पाहिजे. तरच त्या रुढी आणि परंपरा काही प्रमाणात तरी कमी होतील.आणि हे फक्त शिक्षणामुळेच होऊ शकते. शिक्षण घेतलेली मुलगी धाडसाने आपले मत मांडू शकते आणि त्यातूनच आपल्याला अपेक्षित असणारा बदल घडेल हा विश्वास वाटतो.
मुलींच्या पेक्षा मुलांमध्ये आपल्याला हुंड्या घेण्याच्या प्रवृत्ती मध्ये वाढ होत असताना दिसते. यामध्ये अनेक मुले गडगंज संपत्ती असणाऱ्या मुलीला फसवतात आणि कोट्यावधी रुपयाचे मालक होतात. त्यामध्ये आपली परिस्थिती सुधारण्यासाठी एक साधन म्हणून किंवा एक पर्याय म्हणून,त्या मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्याशी लग्न केले जाते. अशा लोकांची मानसिकता फक्त लग्नामध्ये एखादी वस्तू घेऊन थांबत नाही तर लग्न झाल्यानंतरही त्या मुलीकडे घड्याळ पाहिजे, नवी मोटर पाहिजे, पैसे पाहिजेत अशा प्रकारचा तगादा लावला जातो. आणि पुढे मुलाचा खरा चेहरा समजल्यानंतर, त्या मुलीची झालेली मनस्थिती कोणी समजू शकत नाही. प्रेमाच्या नावाखाली फसवले जाण्याचे दुःख मोठे असते. चुकून एखाद्या मुलीच्या घरची परिस्थिती गरिबीची असेल, तर तिचा छळ होण्यास सुरुवात होते. आणि त्यातूनच मग त्या मुलीला मारहाण केली जाते, तसेच जीवनही संपविले जाते. एक मुलगी लग्न करून सासरी येते त्यावेळी तिला फक्त आपला नवरा आणि सासू-सासरे या लोकांनी आपल्याशी गोड बोलावे, आपल्या कामाचे कौतुक करावी, एवढीच साधी आणि सरळ अपेक्षा असते. परंतु हे सर्व पुन्हा पुन्हा त्या मुलीकडून, मुख्यतः मुलीच्या माहेर कडून आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे असा अठ्ठाहास धरतात. आणि तसे होत नसेल तर तिचा अनेक प्रकारे मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो.
एक मुलगी, ज्या मुलासोबत लग्न करते , त्याला आयुष्यभराची साथ मागते ,पूर्ण विश्वास त्या व्यक्तीवर ठेवते आणि आपली वीस-बावीस वर्षांची माहेरची माणसे सोडून, एका परक्या घरामध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी येते. तिला ज्यावेळी समजते की आपला नवरा फक्त पैशांचा विचार करणारा आहे त्यावेळी तिच्या मनामध्ये चाललेले द्वंद खूपच कमी वेळेस इतरांच्या लक्षात येते. या परिस्थितीला ती मुलगी सर्वात दुर्दैवी मानते. आणि आजही अशा अनेक घटना घडत आहेत, ज्यामध्ये हुंडा न दिल्याने त्या मुलीचा जाच करण्यात येतो. त्यामध्ये पाठीमागील काही वर्षांमध्ये घडलेली एक घटना आपण विसरू शकत नाही. ती म्हणजे 'मंजुषा सारडा ' या मुलीची अशीच हुंडा न दिल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सरकारचे डोळे उघडले आणि हुंडाविरोधी चळवळ सुरू करण्यात आली. हुंडा दिला नाही, म्हणून त्या मुलीला सासरची माणसे जाळून मारतात, यासारखीच भयंकर गोष्ट दुसरी कोणती नसेल.या गोष्टीची भयानकता स्वतःच्या बाबतीत झाल्याशिवाय कळत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की, 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही'. ज्यावेळी आपण प्रत्येक घटना वाचतो , त्यावेळी ती दुसऱ्याच्या बाबतीत असते. त्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त विचार न करता, ती गोष्ट काही काळाने विसरतो.पण ज्यावेळी अशाच प्रकारची घटना आपल्या आजूबाजूला,आपल्या जवळच्या नातलगांमध्ये होते, त्यावेळी मात्र आपले डोळे खरं उघडतात. आणि हुंडा विरोधी चळवळ आहे तिच्यावर विचार करावासा वाटतो. या गोष्टीचा परिणाम स्त्रीभ्रूणहत्या,मुलगी नको अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये होताना दिसतो.आणि मुलगी नको असण्याच्या कारणांमध्ये ,'हुंडा ' एक महत्त्वाचे कारण असल्याचे समजते.त्यामुळेच मुलीचा जन्म होतो,त्यावेळी ती सर्वांना एक प्रकारचे ओझे वाटते. आणि तिथूनच लहानपणापासून तिला मानाची वागणूक मिळत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला मुलापेक्षा कमी मानली जाते आणि मुळात हा विचारच बदलला पाहिजे, जेणेकरून पुढे होणाऱ्या संकटांना ती तोंड देऊ शकेल.
दुसऱ्या बाजूला हुंडा घेण्याबद्दल आणि देण्याबद्दल आपण विचार करतो. त्यावेळी आपल्याला असे जाणवते की, ज्या व्यक्ती हुंडा घेतात, त्या कर्तबगार कधीच नसतात. जर तो नवरा, आपल्या पत्नीला,आपल्या कष्टावर सांभाळू शकत नसेल ,सासरच्या माणसांकडून पैशांची अपेक्षा करत असेल ,तर ही गोष्ट खरी पाहता खूपच लाजिरवाणी आहे. आणि सुरुवात देणे- घेणे या रुढीतून झाली तर, अशा प्रकारचे विवाह यशस्वी होत नाहीत. कारण त्यांना शेवटपर्यंत पैशांची लालसा असते आणि त्यापुढे त्यांना पत्नीच्या माहेरचे लोक, त्यांची परिस्थिती, ती मुलगी या कुणाचाही विचार येत नाही. आणि तिचा दर्जा हा नेहमी दुय्यमच असतो. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, एखादा अनमोल जीव जाण्यामध्ये होतो. आणि तो जीव कोणीही परत आणू शकत नाही. खरंतर या सगळ्या घटनेमध्ये त्या मुलीची कोणतीही, कसल्याही प्रकारची चूक नसते. परंतु शिक्षा मात्र तिलाच भोगावी लागते आणि ती म्हणजे आपले स्वतःचे आयुष्य संपवून. खरच या गोष्टीची भयानकता, जसा आपण विचार करेल तस तशी वाढत जाते.
आता यासाठी हुंडा विरोधी कायदा अस्तित्वात आलेला आहे. परंतु आजही तो अंमलात आणला जात नाही. आपल्या मुलीच्या अब्रू जाऊ नये, यासाठी तिला ते दुःख सोसण्यास सांगितले जाते. आणि परिस्थिती बदलेल या आशेने ती आयुष्यभर दुःखाच्या सागरात डुंबत बसते. खरं दुःख कधी संपतच नाही, मुलाकडून पैशाच्या अपेक्षा कधी थांबतच नाहीत आणि यामध्ये आई वडिलांना त्रास झाल्याने, ती गप्प बसून सर्व काही सहन करते.पण यातून तिच्या स्वतःचे मानसिक खच्चीकरण होते आणि त्यावर विचार करण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. परंतु तसे न करता, आपल्या आजूबाजूला अशा प्रकारची घटना होत असेल तर, आपण त्याला प्रतिकार केला पाहिजे, काहीतरी मदत केली पाहिजे आणि हुंडा विरोधी कायदा आहे आणि त्याचा उपयोग कसा करावा याबद्दल सांगितले पाहिजे. हे सगळे थांबण्यासाठी उच्च शिक्षण घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.कारण शिक्षणामधून अशा प्रकारच्या गोष्टींची माहिती आपल्याला समजते आणि त्यातूनच आपण समाजामध्ये जागरूकता पसरवू शकतो. सध्याचे योग हे सोशल मीडियाचे आहे आणि याचाच उपयोग करून आपण आपले विचार इतर व्यक्तींना सांगू शकतो. आणि हुंडा देणे आणि घेणे हे कसे चुकीचे आहे, हे पटवून देऊ शकतो. आणि आई वडील जर सुशिक्षित नसतील तर अशा प्रकारचे विचार त्यांना माहिती असणार नाहीत, त्यावेळी त्यावेळी शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शिक्षकांनी लहानपणापासूनच मुला-मुलींना अशा प्रकारचे विचार दिले तर, भविष्यात ती मुले याचा विचार करून हुंडा घेण्यास आणि देण्यासही विरोध करतील. आणि अशा प्रकारची मानसिकता तयार होण्यासाठी, ही मुले आणि मुली, खऱ्या अर्थाने वैचारिक दृष्ट्या बदली पाहिजेत. या विषयावर विचारमंथन झाले पाहिजेत, अशा प्रकारची अशा विषयाची व्याख्याने आयोजित केली गेली पाहिजेत, जेणेकरून समाजामध्ये हे विचार रुजवता येतील आणि या सगळ्यांमध्ये घरातल्या प्रत्येकाचा सहभाग असणे आवश्यक आहे. कारण हे सर्व विचार त्यांच्या मनाने, त्यांनी स्वीकारले पाहिजेत, जबरदस्तीने नव्हे. आणि अशा प्रकारचे विचारांमध्ये परिवर्तन घडले तरच हुंडा देण्याची आणि घेण्याची पद्धत बंद करता येईल. त्यामधून गरीब आणि हुंडा देण्यास असमर्थ असणाऱ्या अनेक मुलींचे आयुष्य सुखकर होऊन जाईल यात शंका नाही.
Comments
Post a Comment