'फिरुनी नवी जन्मले मी'.... अरुणिमा सिन्हा '( अनुवाद - प्रभाकर ( बापू) करंदीकर
'अरुणिमा सिन्हा ' हे नाव सर्वांनाच परिचित आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या वीरबालेचे आत्मचरित्र वाचणे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या संकटांना न घाबरता पुढे जाण्याची प्रेरणा आहे. 'फिरूनी नवी जन्मले मी ' म्हणजेच 'Born again On the Mountain ' या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद 'प्रभाकर करंदीकर ' यांनी अत्यंत सुंदरपणे केलेला आहे.
प्रत्येकाचे आयुष्य हे वेगळे असते आणि त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटे तेवढीच वेगळी आणि आव्हानात्मक असतात. प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी मिळणारी स्फूर्ती म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकाची सुरुवात एका हृदयद्रावक प्रसंगातून होते. त्यामध्ये दोन ट्रॅक आणि त्यांच्या मधोमध पडलेली अरुणिमा. ती घटना अशी होती की, अरुणिमाला नोकरीची अत्यंत गरज होती आणि सी.आय.एस.एफ. कडून तिला मुलाखतीसाठी बोलावले होते पण त्या पत्रात जन्मतारीख चुकीची लिहिली होती. तिच्या आयुष्यात तिने नोकरीसाठी अर्ज भरपूर पाठवलेले होते पण पत्राद्वारे आलेला तो पहिलाच कॉल होता. त्यामुळे मुलाखतीपूर्वी चुकलेली जन्मतारीख वेळेत पूर्ण करण्याचे तिने ठरवलेले होते. पण काही वेळा, ठरवलेल्या गोष्टी जशा आपणाला घडाव्या वाटतात, तशा घडत नाहीत.
११ एप्रिल, २०११ ला लखनऊ मधल्या चारबाग स्टेशनवर दिल्लीला जाणाऱ्या 'पद्मावत एक्सप्रेसवर ' बहीण 'लक्ष्मी ' अरुणिमाला सोडायला स्टेशनवर आलेली होती. पण पुढे काय घडणार याची किंचितही कल्पना तिच्या मनात आली नसेल. जनरल वर्गाच्या डब्यात पुरुषांची संख्या जास्त होती, एक-दोन तास गेल्यानंतर, अरुणिमाच्या गळ्यातली सोन्याची साखळी कोणीतरी खेचतय,असे तिच्या लक्षात आले.एक खेळाडू , जी हॉलीबॉल चॅम्पियन राहिलेली होती, तिला तिच्या सोबत अशा प्रकारचे कृत्य होत आहे, ही घटना सहन होण्यासारखी नव्हती.आणि कुणीतरी आपली गोष्ट हिसकावून घेत आहे, हे तिच्या मनाला पटलं नाही. काही गुंड तीच्या गळ्यातील चेन काढून घेण्याचा प्रयत्न करू लागले. अरूनिमाने ती देण्यास नकार दिला आणि त्यांच्याशी ती एकटी प्रतिकार करू लागली. रेल्वेमध्ये बघणाऱ्यांची गर्दी होती पण तिची मदत करायला कोणीही पुढे आले नाही. आणि अरुणिमा मात्र एकटीच चार पाच जणांशी लढत होती. ती चेन द्यायला तयार होत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी अरुणिमाला धावत्या रेल्वेतून फेकून दिली. अरूनिमाचे नशीब यापेक्षाही खूप वाईट होते, तिला बाहेर फेकत असताना दुसऱ्या बाजूने रेल्वे आली होती. त्यावेळी ती त्या रेल्वेवर आदळली आणि खाली पडली.दोन्ही रेल्वे काही वेळाने निघून गेल्या, काही वेळानंतर हात टेकून अरुणिमा उठण्याचा प्रयत्न करू लागली, तेव्हा तिच्या लक्षात आले की, तिचा एक पाय रुळाखाली सापडून पायाचा तुकडा पडला होता. या प्रसंगाचे वर्णन करताना अरुणिमा हे वाक्य उच्चारते, ते वाक्य म्हणजे, ' माझ्या पायाचा तुकडा पडल्याचा तो आवाज होता ,त्या वेदनेमुळे फुटलेली माझी आर्त किंकाळी कुणालाच ऐकू गेली नाही.' ती ओरडून मदत मागण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची हाक रात्रभर कोणालाच ऐकू येत नव्हती. आणि त्या ट्रॅक वरती असणारे काही उंदीर मात्र, त्या तुटलेल्या तिच्या पायाचे लचके तोडत होते. या प्रसंगाची आपण कल्पनाही करू शकत नाही ,पण अरुणिमा प्रत्यक्षात ते सोसत होती,भोगत होती.सकाळी कुणीतरी तिला पाहिले तेव्हा तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता.त्या व्यक्तीने गावातील इतर लोकांना बोलवून आणले आणि बरेली येथील एका हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिची अवस्था अत्यंत वाईट होती. एक पाय पूर्णपणे तुटला होता तर दुसऱ्या पायाच्या हाडांचा पूर्ण चुरा झाला होता. डॉक्टरांनी तिची अवस्था पाहिली आणि गँगरीन होण्याची शक्यता आहे असे वर्तवले. हॉस्पिटल गावातील असल्यामुळे अद्ययावत सोयी- सुविधा पण तेथे उपलब्ध नव्हत्या. परंतु ऑपरेशन लवकरात लवकर करणे सुद्धा आवश्यक होते.त्या ठिकाणी असणारी साधनसामग्री ही कमी होती ,त्याचप्रमाणे खूप रक्त वाया गेल्यामुळे रक्त देणे महत्त्वाचे होते. अशावेळी मदत करायला कोणी तयार होत नाही,परंतु अरुणिमाच्या बाबतीत मात्र उलट घडले. त्याच हॉस्पिटलमध्ये असणारे डॉक्टर बी.सी. यादव यांनी तिला रक्त दिले आणि पुढे जाऊन हॉस्पिटलमधील अजून एक जण तिला रक्त द्यायला तयार झाले. ऑपरेशन करण्यासाठी त्यांना ते आवश्यक होते ,आणि ते लवकरात लवकर होणेही गरजेचे होते पण भुल देण्याची तेथे सुविधा नव्हती. अरुणिमा म्हणते की, रात्रभर एवढ्या वेदना सोसल्या आणि आताही मी त्या वेदना सोसायला तयार आहे. ऑपरेशन करायचे ठरवले गेले आणि भूल न देता अशा प्रकारचे ऑपरेशन त्यांनी प्रथमच केले होते, त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन झाल्यानंतर अरुणिमाचे खूप कौतुक केले. अशा प्रकारचे ऑपरेशन यापूर्वी कधीही झाले नव्हते. ही परिस्थिती वर्णन करताना अरुणिमा म्हणते की, 'एक अगदी परका माणूस मला जगवण्यासाठी धडपडत होता' यावरून आपल्या लक्षात येते की, कोणत्या परिस्थितीमधून ती जात होती. आणि तिची मानसिक अवस्था ही कशा प्रकारची असेल याची कल्पना आपण करू शकत नाही.ही घटना तिच्या घरच्यांना ज्यावेळी समजते, त्यावेळी तिची आई, तिची बहीण, बहिणीचा नवरा, आणि भाऊ हे तिला बघण्यासाठी येत होते तेव्हा त्यांना वाटत असते की अरुणिमा जिवंत असणार नाही. परंतु; ज्या वेळेस ते तिला हॉस्पिटलच्या बेडवरती पाहतात, त्यावेळी मात्र ते सुरुवातीला स्वतः खचतात कारण एक हॉलीबॉल चॅम्पियन असणारी अरुणिमा आता पायाशिवाय काहीच करू शकणार नव्हती. आणि अशी अरुणिमा पाहणे त्यांच्यासाठी खूप वेगळी घटना होती. अशा अवस्थेमधून तिचे जगणे म्हणजेच तिला रोज मरताना पाहणे. तसेच त्या ठिकाणी असणारे उपचार अद्ययावत असावे असे वाटत होते परंतु एका गावातील हॉस्पिटलमध्ये ते उपचार होणारे नव्हते. आणि त्यातच ते मध्यमवर्गीय असल्यामुळे,त्यांच्याजवळ पैशांची कमतरता होती. त्यामुळे तिच्या बहिणीचा नवरा ज्यांना सर्वजण ' साहेब ' असे म्हणत. त्यांनी पत्रकार परिषद बोलवली आणि पत्रकार परिषदेमध्ये सर्वांना समजले की ती एक राष्ट्रीय खेळाडू होती. आणि तिच्यासोबत अशा प्रकारची घटना घडलेली आहे हे लक्षात आल्यानंतर सर्व लोकांची तिच्याकडे येण्यासाठी धडपड चालू केली. आणि त्यामधूनच तिला जास्तीत जास्त चांगले उपचार मिळावेत म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसत होते. तिच्याशी बोलत असताना पत्रकारांनी विचारले की, तुम्हाला काय बदल अपेक्षित आहेत? किंवा तुम्हाला या घटनेमधून काय सांगायचे आहे ? त्यावेळी अरुणिमा असे सांगते की, 'रेल्वेत काय किंवा रस्त्यावर काय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनाने आता तरी गांभीर्याने घ्यायला हवा. ' आणि या सर्व होणाऱ्या चर्चेमधून आणि मोठमोठ्या लोकांनी तिला येऊन भेटण्याच्या माध्यमातून दिल्लीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिची रवानगी करण्यात येते आणि अतिशय योग्य उपचार आता तिच्यावर होऊ लागतात. पण या प्रसिद्धींच्या जंजाळात अनेक चुकीच्या अफवाही पसरू लागलेल्या तीच्या कानावर येतात. त्यामध्ये अरुणिमा जवळ तिकीट नव्हते आणि त्यामुळे तिने ट्रेनमधून उडी मारली, ती आत्महत्या करायला गेली होती, त्याचप्रमाणे अनेक वाईट आणि चुकीच्या अफवा तिच्याबद्दल पसरवल्या जात होत्या. एका मध्यमवर्ग कुटुंबातील अरुणिमा प्रत्येकाला, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ होती. आणि खरी परिस्थिती पटवून देण्यास ती असमर्थ होती, कारण एक तर ती एवढी प्रसिद्ध खेळाडू पण तिने तिचा पाय गमावलेला होता आणि या सगळ्यांमधून ती मानसिक दृष्ट्या पूर्णतः खचलेली होती. अशा परिस्थितीमध्ये तिच्या बहिणीचा नवरा म्हणजे साहेबांनी तिला विचारले की,' तू एव्हरेस्ट चढून जाशील का?' विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर दोन्हीही अकल्पित होते.
त्यावेळी तिची अवस्था अशी होती की,तिच्या एका पायामध्ये रॉड बसवलेला होता आणि दुसरा पाय पूर्णपणे कृत्रिम होता. अशा परिस्थितीत कृत्रिम पायाची सवय होण्याकरता, डॉक्टरांच्या मतानुसार एक-दोन वर्षांचा कालावधी जावा लागतो.आणि अशावेळी एव्हरेस्ट चढून जाण्याची कल्पना जरी करत असल्याचे कोणाला सांगितले असते तर सर्वांनी तिला वेड्यात काढले असते. त्यामुळे कुणालाही न सांगता ती हॉस्पिटलमधून घरी जाण्याऐवजी गिर्यारोहक 'बचेंद्री पाल ' यांच्याकडे गेली. तिच्या मोठ्या बहिणीचे पती ' साहेब' , त्यांना सोबत घेऊन ती त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली. ऑपरेशन केलेल्या जखमाही अजून नीट सुकल्या नव्हत्या.आणि अशा परिस्थितीमध्ये एव्हरेस्ट शिखर चढून जाण्याची योजना ऐकून 'बचेंद्री पाल ' म्हणाल्या की,'तू एव्हरेस्ट आताच जिंकला आहेस आता फक्त जगाला ते दाखवून द्यायचं बाकी आहे.' पण या गोष्टीची नुसती कल्पना करून चालणार नव्हते तर ती हे करू शकते हे अरुणिमाला सिद्ध करून दाखवावे लागणार होते. त्याकरता तिला एक आव्हान देण्यात आले आणि ते आव्हान तिने स्वीकारले. तिला सुरुवातीला बेस कॅम्प पर्यंत पोहोचायचे होते.तिथे जाण्याकरता इतरांना दोन ते तीन मिनिटे लागायची पण त्यासाठी अरुणिमाला एक ते दोन तास लागत असत. आणि या सर्वांवर मात करून, सराव करून तिने आपला वेग वाढवला. तिचे कष्ट बघून 'बचेंद्री पाल ' मॅडम यांनी अरुणिमाला प्रशिक्षण देण्याचे ठरवले. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग सुरू झाले. सराव करत करत सर्वांच्या मागे राहणारी अरुणिमा, काही दिवसांमध्येच सर्वांच्या पुढे जाऊन थांबत असे. आणि हा बदल तिच्यामध्ये विश्वास निर्माण करणारा होता. सुरुवातीला सर्वजण तिला सावकाश ये म्हणून सांगायचे पण ज्यावेळी ती सर्वांच्या अगोदर जाऊन तिथे थांबायची , त्यावेळी मात्र प्रत्येक जण आश्चर्याने तिच्याकडे पाहत असायचे. कृत्रिम पाय बसवला असताना, त्या पायाने चालण्याची सवय होण्यासाठी, जिथे एक ते दीड वर्षांचा कालावधी जावा लागतो, त्या ठिकाणी अरुणिमा काही दिवसांतच एव्हरेस्ट शिखर सर करण्याची तयारी करीत होती.
काही दिवसांमध्येच तिच्या कष्टांना साथ आणि सोबत मिळाली. आणि एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी तिला स्पॉन्सरशिप मिळाली होती. हे शिखर सर करत असताना सोबत मुख्य शेर्पा असतो आणि यामध्ये अरूनिमा विकलांग असल्याने तिच्यासोबत कोणीही जायला तयार नव्हते. कारण तिच्यासोबत कोणताही धोका झाला किंवा तिला ते सर करणे जमले नाही तर शेर्पाचाही जीव जाणार होता. त्यामुळे 'बचेंद्री पाल ' आणि अरुणिमा यांच्या बऱ्याच वेळा सांगण्यातून 'निमा कंचा ' हा मुख्य शेर्पा तिच्यासोबत जाण्यासाठी तयार झाला. मुख्यतः एव्हरेस्ट शिखर सर करत असताना चार टप्पे असतात. त्यामधील चौथा टप्पा हा डेथ झोन म्हणून ओळखला जातो. अरुणिमा सुरुवातीपासून तिसऱ्या टप्प्यापर्यंत आपल्या आत्मविश्वासाच्या साह्याने गेली होती. आता चौथा टप्पा पार करायचा होता, चौथ्या टप्प्यात आल्यावर अरुणिमाला समजले की, तिचा ऑक्सिजन संपत आलेला होता. आणि त्यावेळी शेर्पा तिला माघारी फिरण्याची विनंती करू लागला. रात्रीच्या वेळी जिथे जिथे टॉर्च पडेल त्या ठिकाणी प्रेतेच दिसत होती.जे स्वप्न तिने पाहिले होते, ते पूर्ण करण्यासाठीच या लोकांनी जीव गमावला होता. आणि हे दृश्य तिच्या अंगावर काटा आणणारे होते. हे सर्व पाहत असताना तिच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती, पण दुसऱ्या बाजूला तिच्या मनाने निर्धार केला की,या लोकांना जे स्वप्न पूर्ण करायचे होते, ते स्वप्न मी पूर्ण करून दाखवणार आहे. दुसऱ्या बाजूला शेवटच्या टप्प्यात येऊन माघारी फिरणे, तिच्या दृष्टीने परवडणारे नव्हते.कारण तिला मिळालेली ही पहिली आणि शेवटची संधी होती.आणि ती संधी मिळवण्यासाठी तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ऑक्सिजन संपत आलेला आहे, हे माहिती असूनही तिने तो धोका पत्करला. आणि एव्हरेस्टचा तो शेवटचा टप्पा पार करत - करत शेवटी ती एव्हरेस्ट शिखरावर जाऊन पोहोचली. तिला असे वाटले की, आपण आता माघारी जात असताना जिवंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे तिने आपल्याजवळ असणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये आपण एव्हरेस्ट सर केल्याचे दृश्य टिपण्यास आपल्या मुख्य शेर्पा याला सांगितले. तिचे म्हणणे असे होते की, मी जरी जिवंत पोहोचली नाही, तरी माझा हा व्हिडिओ बघून अनेक लोकांना प्रेरणा मिळेल. तिची असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून मुख्य शेर्पा ला आता वाटले की, आपण तिच्यासोबत थांबावे आणि तो थांबला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे एव्हरेस्ट शिखर उतरणे कारण उतरतानाच बऱ्याच लोकांचा मृत्यू होत असतो.तिथे तिने २१ मे,२०१३ रोजी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. जे डॉक्टर सांगत होते की, दोन वर्ष कृत्रिम पायाचा सराव होण्यासाठी जातात त्याच्या विरुद्ध तिने सिद्ध करून दाखवले की, जर मनाची इच्छाशक्ती असेल तर व्यक्ती काहीही, कधीही करू शकते,कोणत्याही परिस्थितीमध्ये करू शकते. परतत असताना तिला असे जाणवले की, तिचे हात निळे पडू लागलेले होते. आणि आता पाय कापावा लागलेला असताना, हातही कापायला लागेल अशी काहीशी भीती तिच्या मनामध्ये आली. तिच्या डोळ्यातून त्या परिस्थितीमध्ये अश्रू येत होते. ऑक्सिजन संपला होता आणि आता मरण अटळ आहे हे तिला दिसत होते. पण एखाद्याची इच्छाशक्ती असेल ना, तर त्यामध्ये मार्गही सापडतोच.आणि अशाच परिस्थितीमध्ये एक गिर्यारोहक तिथून जात असताना, त्याच्याजवळ दोन ऑक्सिजन सिलेंडर होते आणि वजन जास्त होत असल्याने त्याने एक ऑक्सीजन सिलेंडर तिथेच टाकून दिला. शेर्पा ने लगेच तो अर्धा सिलेंडर ऑक्सिजन संपलेल्या सिलेंडर पाईपला जोडला. आणि तिला उठण्यासाठी विनवू लागला. काही वेळाने ती उठली आणि तिला असे वाटले की आपण इथपर्यंत आलो आहे म्हणजे आपण खालीही जाऊ शकतो. आणि या विचारातूनच तिने खाली उतरायला सुरुवात केली. ते करत असताना, एका ठिकाणी तिचा कृत्रिम पाय तिच्या शरीरापासून अलग झाला. परंतु; तरीही अशा परिस्थितीमध्ये न घाबरता, ती काही वेळाने एका ठिकाणी थांबली, पुन्हा कृत्रिम पाय व्यवस्थित बसवून घेऊ लागली. ही घटना म्हणजे संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी, आश्चर्यचकित करणारी अशीच होती. कारण यामधून असे समजते की, व्यक्तीच्या मनाने एखादी गोष्ट करायची ठरवली की ती होतच असते. मनाने विकलांग तो खऱ्या अर्थाने विकलांग असतो आणि शरीराने विकलांग असूनही इच्छाशक्तीच्या बळावर असामान्य कर्तृत्व गाजवण्याचे सामर्थ्य काही व्यक्तींकडे असते. इच्छाशक्ती प्रबळ होऊन योग्य असा मार्ग सापडत असतो. आणि त्याचे जिवंत, आदर्श, प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे उदाहरण म्हणजेच 'अरुणिमा सिन्हा '. त्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यालाही किंवा वाचकांनाही अशीच काहीतरी करण्याची नवीन ऊर्जा मिळते. आणि संकटतूनही पुढे जाण्याची प्रेरणा गवसते.त्यामुळे हे पुस्तक वाचणे खूपच प्रेरणादायी आहे.
Comments
Post a Comment