महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री,त्यानंतर देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवणारे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र 'कृष्णाकाठ ' म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील १९१२ ते १९४६ पर्यंतच्या कालखंडाचा अतिशय सर्वोत्तम असा घेतलेला आढावा आहे, असे म्हणता येईल. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक प्रकारचे सर्वोत्तम अनुभव ग्रहण करणे आहे. सुरुवातीपासूनच हे पुस्तक उत्कृष्ट तर आहे,परंतु ते तीन कालखंडामध्ये विभागलेले आहे.पहिल्या भागामध्ये 'यशवंतराव चव्हाण ' यांची जी जडणघडण झालेली होती, त्याबद्दलचे विचार मांडलेले आहेत. दुसऱ्या भागामध्ये वैचारिक आंदोलन आणि तिसऱ्या भागामध्ये राजकारणामध्ये त्यांचा झालेला प्रवेश यांचे वर्णन केलेले आहे. कोणतीही व्यक्ती सहजासहजी मोठी होत नाही तर त्यापाठीमागे अपार कष्ट, अनुभव त्याचप्रमाणे संगत महत्त्वाची असते, या गोष्टीची जाणीव हे पुस्तक वाचताना होते.
या पुस्तकाची सुरुवात होते ती, प्रसिद्ध कवी श्री गोविंदाग्रजांची प्रख्यात कविता ' कृष्णाकाठी कुंडल' या कवितेतील ओळींच्या आठवणीतून. त्यामध्ये यशवंतराव यांचे असणारे आजोळ 'देवराष्ट्रे ' आणि कृष्णाकाठ या दोन्हींमधला प्रेममय सहसंबंधाचा पाठपुरावा या कवितेच्या ओळींमधून पाहायला मिळतो. ते या पुस्तकामध्ये सुरुवातीला सांगतात की, त्यांना कृष्णाकाठ का जवळचा वाटतो. तसेच त्या भागाबद्दल असणारी आपुलकी, त्या भागातील लोकांबद्दल वाटणारा जिव्हाळा स्पष्ट करतात. 'देवराष्ट्र ' या लहानशा गावची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगायला ते अजिबात विसरत नाहीत. त्यामध्ये ते सांगतात की, सात वाहनाच्या राज्यानंतर महाराष्ट्रात अनेक लहान-मोठ्या राज्यांचा उदय झाला, त्यापैकी एक देवराष्ट्र होय. या राज्याची राजधानी 'कौडिण्यापूर ' म्हणजे आजचे कुंडल . कृष्णाकाठाबद्दल असणारी ओढ सुरुवातीपासून पुस्तकातील प्रत्येक वाक्यामधून समजते. यशवंतराव चव्हाण यांनी लहानपणी घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद पुढील राजकारणी आयुष्यामध्ये कसे उपयोगी पडले, हे सांगितले आहे. सनगर,धनगर, मुसलमान, रामोशी यांचा शेजार त्यांच्या आयुष्यातले एक विशेष ठेवा असल्याचे ते नमूद करतात.
त्यांची जडणघडण होत असताना, लहानपणीच्या प्रत्येक गोष्टीचा ते उल्लेख करतात. त्यामध्ये ते त्यांच्या शाळेचा संदर्भ देतात, जिथून त्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला. तेथे त्यांना शिकवणारे पहिले शिक्षक 'बंडू गोवंडे ' यांची आठवण खूप प्रेमळ शिक्षक म्हणून करतात.सामान्य छोट्या शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेले यशवंतराव पुढे मुख्यमंत्री झाल्यावर ही सामान्य माणसाच्या व्यथा समजून घेताना दिसतात ते त्यामुळेच.खूप लहान वयात वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेले यशवंतराव,आपल्या आईला नेहमी आदर्श मानतात. वडिलांच्या जाण्यानंतर त्यांच्या जागी त्यांचे थोरले बंधू 'ज्ञानदेव ' यांना बेलीफ म्हणून नोकरीवर घेतले जाते. त्यामुळे त्या इंग्रज अधिकाऱ्याने माणुसकीची वागणूक दिली, त्याबद्दल यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या आई नेहमीच कृतज्ञ राहताना दिसतात. त्यामध्ये ते लहान असताना देवराष्ट्रला आल्यानंतर रामोशी गल्लीतील मुलांबरोबर ते डोंगरावर गेले होते. त्यावेळेस सोनहिरा या ओढ्यामध्ये पोहण्यासाठी ते उतरले. पण ओढ्याला पाणी जास्त आले आणि आपण पाण्यात बुडणार असे लक्षात आल्यानंतर त्या मित्रांनी ओढ्यात उड्या टाकून त्यांना वाचवले होते. त्याला ते 'माझा पुनर्जन्म झाला ' असे म्हणतात. सामाजिकतेची जाणीव लहानपणापासून त्यांच्यात कशी निर्माण झाली हे अशा छोट्या छोट्या प्रसंगातून समजते. आईच्या प्राणाची साक्ष म्हणून त्यांचे नाव 'यशवंत ' ठेवले आहे, हे समजल्यापासून आई हा त्यांचा प्राण झाल्याचे ते सांगतात. आईबद्दल सांगताना ते आपल्या आईचा समंजसपणा आणि ओव्या म्हणण्याची लकब यांचा उल्लेख खूप सुंदर शब्दांमध्ये व्यक्त करतात.
पुढे यशवंतराव कराड या ठिकाणी आपल्या आई सोबत राहायला येतात. आणि कराड या शहरामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिकतेच्या मानसिकतेला एक प्रकारची प्रेरणा मिळाल्याचे लक्षात येते.त्यामध्ये अनेक उत्सवांचे आयोजन करत असताना लोकांशी बोलणे- चालणे होई आणि त्यातूनच त्यांचे अनुभव प्रगल्भ होताना दिसतात. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक लोक त्यावेळी प्रयत्न करत होते आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा एक देशभक्ती, देशप्रेम होते. आणि शाळेमध्ये असताना सुद्धा देशप्रेमाची भावना त्यांच्या नसानसात भिनलेली अनेक अनुभवातून जाणवते.पुढे सामाजिक कार्य करत- करत ते निवडणुकीमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करताना दिसतात. त्याचप्रमाणे लहानपणापासून लेखनाची आवड असल्यामुळे ते काव्यलेखन करत असल्याचेही समजते. त्यांनी काही काळ वार्ताहर म्हणूनही काम केले होते हे पण लक्षात येते.पुढे शिवजयंती उत्सवात कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. पुढे असे अनेक प्रसंग जेलमध्ये जाण्याचे आले असतील, परंतु सुरुवातीला ज्यावेळी अटक झाली, ती घटना त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अशीच घटना होती. त्याचप्रमाणे या आत्मचरित्रात लहानपणी आपल्या आई सोबत पंढरपूरला गेल्याची घटना नमूद करतात. आणि ते असे सांगतात की, 'पुढे अनेक वेळा पंढरपूरला गेलो असेन, परंतु सुरुवातीला आई सोबत पंढरपूरला जाताना त्यावेळी घेतलेले ते दर्शन विसरता न येण्यासारखे होते '.विठ्ठल दर्शनाच्या श्रद्धेबद्दल विचारल्यावर ते सांगतात की,' मी कुठल्याही एका दगडाच्या मूर्तीत ईश्र्वर आहे असे कधीच मानत नाही'. या त्यांच्या अशा विचारांमधूनच त्यांच्या बौद्धिक प्रगल्भतेची जाणीव वाचकांना होते. ते शाळेत असतानाचा एक प्रसंग वर्णन करतात, तो असा होता की, त्यामध्ये त्यांच्या शाळेमध्ये शेनोलीकर म्हणून एक शिक्षक होते. त्यांनी वर्गात मुलांना प्रश्न विचारला, 'तुम्हाला प्रत्येकाला काय व्हायच, ते तुम्ही एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून द्या'. प्रत्येकाने आपापले मत कागदाच्या चिठ्ठीवर लिहून दिले. त्यामध्ये कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी शिक्षक, कोणी व्यावसायिक अशी उत्तरे लिहिली होती. परंतु त्यावेळी 'मी यशवंतराव चव्हाण होणार ' असे लिहिणाऱ्या यशवंतरावांचे विचार त्यांना एक वेगळे व्यक्तिमत्व बनवते याची जाणीव इथे होते. माणूस हा विचारातून घडत असतो आणि त्याच्या अवतीभवती असणारी माणसे,त्याच्या अवतीभवती असणारे वातावरण त्याला एक यशस्वी, सुसंस्कृत नागरीक बनवत असते.यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत लहानपणापासूनच्या छोट्या- छोट्या प्रसंगातून समजते की, ही व्यक्ती मोठेपणी नक्की काहीतरी वेगळी होणार आहे,आणि झालेही तसेच. लहानपणापासून त्यांना बोलण्याची खूप आवड होती.कार्यकर्ता म्हणून काम करत असताना, अनेक छोट्या-छोट्या सभांमधून बोलण्याचा ते प्रयत्न करत असल्याचेही ते सांगतात. गांधीजींचा त्यांच्या आयुष्यावर पडलेला प्रभावी बऱ्याच घटनांमधून आपल्या लक्षात येतो. शिक्षण आणि चळवळीमध्ये भाग घेणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी, त्यामध्ये मध्य साधण्याचे कौशल्य यशवंतरावांना उमगल्याचे जाणवते.
भारत पारतंत्र्यातून मुक्त होण्यापाठीमागे कितीतरी लोकांचा त्याग होता हे भूमिगत असताना कशा प्रकारचे जीवन जगावे लागते, हे वाचत असताना जाणवते. आंदोलन, कार्यकर्ता आणि शिक्षण यांच्या सोबतच वेणूताई यांच्याशी त्यांचे लग्न होते.पण देशसेवेचे व्रत हाती घेतल्यामुळे आणि या सर्व चळवळीत सहभागी होत असल्यामुळे, आपल्या कुटुंबालाही त्यांना वेळ देता येत नव्हता, याची जाणीव प्रत्येक ठिकाणी आपल्याला होते. पुढे वाचनाचे महत्त्व सांगताना ते एका प्रसंगाचे वर्णन करतात त्यामध्ये ते असे म्हणतात की, तुरुंगात असताना त्यांनी जेवढ्या पुस्तकांचे वाचन केले, तेवढे वाचन त्यांनी पुन्हा कधीच केले नसल्याचा ते उल्लेख करतात.म्हणजेच वेळेचा योग्य उपयोग कसा करावा, हे यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकले पाहिजे.शेड्युल कास्टना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची योजना ब्रिटिश सरकारने जाहीर केल्यानंतर मतभेदाचे वातावरण निर्माण झाले होते, आणि त्या साध्या घटनेचे वैचारिकरित्या केलेले वर्णन किंवा अनुभव कथन आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. ते असे सांगतात की, त्यांनी जेलमध्ये काढलेले एक वर्ष त्यांच्या मताने विद्यापीठीय जीवन होते. कारण तेथील एका वर्षाचा उपयोग त्यांनी खूप ज्ञान मिळवण्यासाठी केलेला होता.साक्षरता वर्ग चालवण्यासाठी त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केलेले होते.पुढे ते असे सांगतात की, ' श्यामची आई ' हे पुस्तक वाचत असताना त्यांचे डोळे कितीतरी वेळा पाणावले होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक वाक्यातून,आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक प्रकारची दिशा मिळते.एक सामान्यातला सामान्य व्यक्ती सुद्धा मोठ्या पदापर्यंत जात असतो परंतु त्याच्या पाठीमागचा संघर्ष आपल्याला माहित व्हावा, यासाठीच आत्मचरित्र वाचणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे पुस्तक वाचत असताना समजते की, खऱ्या अर्थाने माणूस मोठा झाल्यानंतर त्याची प्रतिभा दिसते,परंतु ती प्रतिभा, ते व्यक्तिमत्व घडवण्यापाठीमागे कितीतरी लोकांचा त्याग असतो. प्रत्येक घटकांचा प्रभाव एखाद्या व्यक्तीमत्त्वावरती होत असतो.परंतु कोणते चांगले आणि कोणते वाईट याच्यातून जो चांगल्या मार्गाला जातो, त्याचेच आयुष्य यशवंतराव चव्हाण यांच्या इतके उत्तुंग होत असते. यशवंतराव चव्हाण यांची सुरुवातीपासूनची स्वतंत्र निर्णय क्षमता, उत्तम वकृत्व, दुसऱ्याला समजून घेण्याची हातोटी, सामानाच्या सामान्य कुटुंबातून आल्यामुळे सामान्य लोकांच्या समस्या समजावून घेण्याची तळमळ त्यांना राजकारणामध्ये एक हळवे आणि अतिशय लोकप्रिय राजकारणी व्यक्तिमत्व बनवून जाते.आपल्या माणसाची, आपली कथा समजून घ्यायची असेल तर यशवंतराव चव्हाणांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र वाचणे एक सुंदर असा अनुभव आहे. आणि ते प्रत्येकाने वाचायला हवे कारण हे पुस्तक तरुण वर्गातील मुलांना एक नव प्रेरणा देऊन जाईल यात शंका नाही.
खुप छान सारांश लेख लिहलाय,अभिनंदन
ReplyDelete