प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक बऱ्या- वाईट घटना घडत असतात आणि त्यातूनच त्या व्यक्तीची जडर-घडण होऊन एक आदर्श मूर्ती बनत असते. या ओळींप्रमाणेच एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कर्तृत्व निर्माण करणारे डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र 'आमचा बाप आणि आम्ही' अतिशय प्रेरणादायी आहे. हे पुस्तक वाचताना कित्येक वेळा डोळ्यांच्या कडा पाणवतात. तर कित्येकदा आपण ठरवले तर, आपण काहीही करू शकतो असा आत्मविश्वास वाचकांच्या मनामध्ये निर्माण करतात. हे फक्त आत्मचरित्र नसून त्यांनी स्वतःबरोबर, त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्याचा अत्यंत सुंदरपणे घेतलेला आढावा किंवा एक सुंदर आरसा आहे असे म्हणायला हरकत नाही.
या पुस्तकाची सुरुवात होते ती, लेखकाने आपल्या आजीविषयी दिलेल्या माहितीमधून. नरेंद्र जाधव यांची आजी राहीबाई जिला सर्वजण राहीआई असे म्हणत असत. स्वतःच्या आईला ते बाई म्हणत ;परंतु आजीला मात्र आई म्हणत असत. ही त्यांची आजी लेखकाचा जन्म होण्याच्या अगोदर पासूनच डोळ्यांनी पूर्णपणे अंध झालेली होती. तरीही ती प्रत्येकाला स्पर्शाने ओळखत असायची. तिचे तोंड मात्र सतत सुरू असायचे, असा उल्लेख लेखक करतात. परंतु लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या आधाराशिवाय लेखकाचे वडील दामू आणि आत्या नाजुका यांचा सांभाळ करणारी ही आजी मनातून जात नाही. गावातून मुंबईकडे आपल्या दोन्ही मुलांना तळपत्या उन्हातून नेणारी ही आजी खऱ्या अर्थाने प्रगतीच्या सर्व संधी निर्माण करत असल्याचे लेखक सांगतात. त्यानंतर येतात ते लेखकाचे वडील, ज्यांना वडील म्हणलेले कधी आवडायचे नाही तर 'बाप' या शब्दाचा त्यांना खूप अभिमान होता. लेखक आणि त्यांची सर्व भावंडे त्यांना दादा म्हणत असत. मध्यम वर्ण, काळा ओबडधोबड चेहरा, धोतर, पांढरा सदरा,खाकी कोट आणि काळी टोपी असा त्यांचा रोजचा पेहराव असायचा असे लेखक त्यांचे वर्णन करतात. लहानपणापासून लेखक वडिलांचे खूप लाडके होते. त्यामुळे वडील रागावले की, त्यांची समजूत काढण्याचे काम लेखकांना करावे लागत असे.एखादी व्यक्ती घडण्यामागे एक प्रेरणा असते आणि लेखकांच्या घडण्यामागे ती व्यक्ती म्हणजे त्यांचे वडील असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
त्यामध्ये लेखकाचे मोठे भाऊ त्यांना मोठेपणी कोण होणार असे विचारतात. त्यावेळी लेखक प्रामाणिकपणे, ' मी मोठे झाल्यानंतर लेखक होणार असल्याचे सांगतात'. त्यांचा भाऊ त्या उत्तराने समाधानी होत नाही. परंतु वडील सांगतात, 'तुला जे बनायचं आहे, तेच बन. परंतु तू जे करशील त्याच्यात टापला जायला पाहिजे'. या शब्दांमधूनच नरेंद्र जाधव यांचे विचार बनत जाताना पाहायला मिळतात.त्यांच्या वडिलांच्या आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असणारे प्रेम आणि त्यांच्या चळवळीच्या मनावर उमटलेला ठसा मुलांना मोठे बनवतो.'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देवासारखेच मानले होते हे पण समजते.बीपीटीच्या रेल्वे विभागात काम करत असताना मुलांच्या घडवण्यामध्ये पूर्णपणे झोकून देणारे , थोरला मुलगा कलेक्टर झाल्यानंतर 'मी कलेक्टर चा बाप हाये' असे म्हणणारे आणि लेखक अमेरिकेला शिक्षणासाठी जात आहे हे समजल्यावर, 'गावाचे येस सांबळण्यात माझ्या बापजाद्यांच आयुष्य गेलं. आता माझा पोरगा सगळ्या देशाची येस वलांडून शिक्षणासाठी अमेरिकेला जातोय. मला सगळं मिळालं.' असे म्हणणारे लेखकाचे वडील मनात घर करून जातात. त्यानंतर लेखक आपल्या आईबद्दल लिहितात. त्यामध्ये ते सांगतात की ,त्यांच्या आईकडे त्यांच्या वडिलांसारखी प्रतिभा नव्हती पण नवऱ्याला संपूर्णपणे साथ देणे आपले कर्तव्य आहे, हे ती मनोमन जाणत होती.पुढे वडिलांच्या जाण्यानंतर त्यांना बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कडून पेन्शन मिळायची. आणि मनीऑर्डर आल्यानंतर त्या पोस्टमनला त्या आठ आणे बक्षीस देत असत.असे करताना पाहून लेखकाना एकदा असे वाटते की, ही रक्कम खूपच कमी आहे म्हणून ते त्याला दहा रुपये देतात. त्यावेळी तो पोस्टमन म्हणतो की, आजीबाईंकडून पावली मिळाल्यावर जी खुशी होते, ती तुमच्या या दहा रुपयांमध्ये होत नाही. स्वभावाचे वेगळेपण त्यांच्या आईमध्ये सुद्धा होते. पुढे नवऱ्याच्या जाण्यानंतर कावळ्यांना प्रेमाने खाऊ घालणारी , कावळ्यांशी बोलणारी ही माय एक प्रेमळ, भोळी मूर्ती म्हणून लक्षात राहते.
हे आत्मचरित्र चरित्र पुढे वाचत असताना लेखकांचे वडील दादा स्वतःच्या आयुष्याबद्दलचे कथन करताना दिसतात. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ओझर गावातून ते मुंबईला कसे आले याबद्दल ते सांगतात.पुढे मुंबईला गेल्यावर आई गवत विकायचे काम करायची आणि एके दिवशी स्टेशनवर एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर ओझे दिले व घरापर्यंत ते सामान पोहोचवण्यासाठी सांगितले. ते सामान पोहोचवल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना दोन आणे दिले आणि ती त्यांच्या आयुष्यातील पहिली कमाई होती. पुढे त्यांनी पेपर विकण्याचे काही काळासाठी काम केले. पेपर विकण्याच्या या कामामधूनच एका युरोपियन साहेबाबरोबर त्यांची ओळख झाली. तो युरोपियन साहेब त्यांना त्यांच्या मुलीशी खेळायला बोलवतो. पुढे तर रोज त्यांच्या घरामध्ये खेळायला जाण्यातून त्यांना इंग्रजी भाषा येऊ लागते.आणि त्यामुळेच सुरुवातीला लेखकासोबत बोलत असताना ते इंग्रजी शब्द का वापरत आहेत त्याची सुसंगती या ठिकाणी आपल्याला समजते. त्या युरोपियन साहेबांच्या कुटुंबाच्या संपर्कात आल्यामुळेच 34 वर्ष ते केबिनमन ची नोकरी करू शकल्याचे ते सांगतात. काही कारणास्तव युरोपियन साहेब विलायतेत निघून जातो आणि त्यावेळी ती नोकरी सुटते आणि तिथून पुढे बऱ्याच नोकऱ्या ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जाय पी रेल्वे मध्ये बिगारी म्हणून त्यांना कामावर घेतले जाते परंतु रेल्वेच्या संपात नोकरी सुटते. यावेळी त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो. परंतु ते आत्महत्या करत नाहीत आणि मी 1937 ला ते बी. पी.. टी रेल्वेत काम करू लागतात आणि तेथूनच मग प्रगतीची सर्व दारे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी उघडली जातात. मुलांना घडवण्यामध्ये एका वडिलांचा संघर्ष आणि जिद्द या ठिकाणी आपल्याला पहायला भेटते. पुढे लेखक वडाळ्याच्या वस्तीतील भावविश्व साकारतात. सदाशिव पठाडे, रामचंद्र मोरे, मंजुळाबाई पगारे, दौलत नाना अशा त्या चाळीतील गुंड समजल्या जाणाऱ्या लोकांचाही ते उल्लेख करतात.गुंडगिरी ही समाज विघातक वृत्तीवरून ठरावी, कार्यक्षेत्रावरून नव्हे,वाईट धंद्यामुळे नव्हे असा युक्तिवाद लेखक करताना आपल्याला पाहायला मिळतात.
पुढे जेडी जाधव ते कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवास वर्णन करताना डॉक्टर बाबासाहेबांच्या दर्शनाचा उल्लेख ते करतात आणि कॉलेजला असताना मंत्री 'यशवंतराव चव्हाण' यांच्या भाषणातील एक वाक्य ते नमूद करतात,'सिव्हिलायझेशन इज व्हॉट वि हॅव अँड कल्चर इज व्हाट वुई आर'. आईचा त्याग आणि वडिलांचा मुलांना शिकवण्याचा निश्चय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्यांच्या यशामागे असल्याचाही ते उल्लेख करतात. पुढे त्यांचे भाऊ सुधाकर जाधव, दिनेश जाधव यांचे कथन आहे. तसेच नरेंद्र जाधव आपले आत्मकथन सादर करताना, 'ज्वलंत इच्छाशक्ती असेल, योग्य संधी उपलब्ध असतील आणि त्याला कठोर प्रयत्नांची जोड असेल तर शेकडो दलितांना माझ्यापेक्षाही चांगल्या कार्यसिद्धी प्राप्त करता येऊ शकतील' असा आत्मविश्वास देतात. सुरुवातीला त्यांनी बी.एस्सी. केले आणि त्यानंतर प्रा. वि.मा. दांडेकर आणि प्रा.रथ यांनी लिहिलेल्या, 'पावर्टी इन इंडिया' हा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. त्यावेळी त्यांनी ठरवले की अर्थशास्त्रात एम.ए. करायचे.त्यासाठी मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यामध्ये पहिल्या वर्षी त्यांनी स्टेट बँकेची परीक्षा दिली होती आणि त्यातून प्रोबेशनरी अधिकारी म्हणून निवड झाल्याचे त्यांना समजले.नोकरी करत असताना एम.ए.चा अभ्यास अर्धवट राहू नये म्हणून त्यांचे प्राध्यापक ब्रह्मानंद यांनी स्टेट बँकेने सुरुवातीला एक वर्ष तरी मुंबईत किंवा मुंबई जवळ नेमणूक दिलीच पाहिजे असे सांगितले.त्यामुळेच त्यांनाही एम.ए. पूर्ण करता आले आणि पण स्टेट बँकेत भरीव कामगिरी करू शकले नाहीत.
रिझर्व बँकेच्या अर्थशास्त्र विभागासाठी 'रिसर्च ऑफिसर' या पदाची जाहिरात पाहून त्यांनी अर्ज केला. त्याकरता त्यांची निवड झाली.भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे उच्च शिक्षणासाठी त्यांना नॅशनल स्कॉलरशिप मिळाली होती. 1981 च्या ऑगस्टमध्ये ते अमेरिकेला रवाना झाले. जातीयतेच्या सर्व बंधनांना झुगारून त्याने डॉक्टरेट पदवी मिळवली. आणि त्यांनी नंतर मागे वळून पाहिलेच नाही.जातीय विषमतेचा अनुभव त्यांना भारताबाहेर अमेरिकेतही आला होता पण एके ठिकाणी पुस्तकाचे उल्लेख करतात, अडथळे येतातच, नाही असे नाही पण सगळे व्यवस्थित बघून होणार असेल तर मग त्यात आव्हान काय राहिले. या वाक्यातूनच एक आत्मविश्वासाची बीजे त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या वडिलांकडून किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणे पाठीमागून कसे रुचले होते हे पण लक्षात येते.
आणि त्यानंतर या पुस्तकात लेखकांच्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव यांचे मनोगत आहे. शेवटी त्यांची मुलगी अपूर्वा जाधव हे आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या मनोगतामध्ये पुस्तकाची शेवटी ती लिहिते की, 'माझ्या पूर्वजांनी दलितत्त्वाचे ओझे वागवले, ते हीन-दीन जीवन जगले, त्यांच्याच त्यागावर,अविश्रांत धडपडीवर मी उभी आहे. माणुसकी हा धर्म मानणारी मी भारतीय वंशाची ग्लोबल सिटीझन आहे. डॉ. बाबासाहेबांनी माझ्या हाती धगधगती मशाल दिलेली आहे. तिने मी सारा आसमंत उजळून टाकणार आहे.'
अशा प्रकारे चार पिढ्यांची वास्तव कहाणी आपणा वाचकांपुढे ठेवण्याचा लेखकाने केलेला उत्कृष्ट प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. आणि तरुण पिढीने हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.कारण हे पुस्तक वाचल्यानंतर एक प्रेरणा, एक आत्मविश्वास आपल्याला मिळतो. तो नक्कीच आपल्याला काहीतरी चांगले करण्यासाठी उपयुक्त असा ठरेल यात शंका नाही.
Comments
Post a Comment