Skip to main content

पुस्तकाचा सारांश -' शंकरराव खरात ' यांचे एक सुप्रसिध्द आत्मचरित्र ' तराळ - अंतराळ '

               'शंकरराव खरात' हे मराठी लेखक, कादंबरीकार आणि सुप्रसिद्ध इतिहासकारही होते. त्याचप्रमाणे ते आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख लेखक होते. सांगली जिल्ह्यातील 'आटपाडी' या खेडेगावात जन्माला आलेले हे व्यक्तिमत्व. त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी वाचकांसमोर 'तराळ अंतराळ' हे आत्मचरित्र ठेवले. त्यांचे हे आत्मचरित्र म्हणजे वास्तवाचे एक सुंदर दर्शन आहे. आत्मचरित्र वाचणे म्हणजे जीवनाला एक नवीन दिशा देण्याचे काम करीत असते आणि हे पुस्तकही आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देऊन जाते. 
              या पुस्तकाची सुरुवात होते ती, शिक्षणाचे महत्त्व लेखकाच्या मनात निर्माण  करणाऱ्या एका प्रसंगामधून. त्यामध्ये लेखकाची मावस बहीण गेल्याची बातमी एका पत्रातून आलेली असते आणि ते पत्र वाचून घेण्यासाठी मास्तरांच्या घरातील लाकडे फोडण्याचा प्रसंग मन हेलावून टाकतो. पुढे पावसाळ्यात प्रत्येक ठिकाणी गळणाऱ्या छतातून,  पोटासाठी राबणाऱ्या माणसांना स्वतःचं घर  व्यवस्थित करायला वेळ मिळत नसल्याचे जाणवते. त्यातील लेखकांनी,'दोष होता गरिबाच्या पोटी  झालेल्या जन्माला. रोजच्या पोटासाठी मर-मर मरायचं, जगण्यातच मरायचं' ही वाक्य विचार करायला भाग पाडतात. लहानपणी छोट्याशा घरात मांडलेला संसार, दर पावसाळ्यात भिजताना लेखक बघायचे. लेखक  महार जातीत जन्माला आलेले होते, त्याचे वर्णन करताना, झाडलोट करण्यासाठी होत असणाऱ्या भांडणाचाही ते उल्लेख करतात. बलुतेदारी असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावात राहत असतानाचे अनेक अनुभव लेखक सांगतात. पुढे शिक्षणासाठी लेखकांना गाव सोडून बाहेर जावे लागते पण इतर सर्वजण गावकीच्या चक्रात सापडलेली असतात. गावाबद्दलची ओढ कायम असताना गावातील ओढ्यावर जाती - जातींचे पानवठे आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर  चालणाऱ्या चळवळीतून स्वतंत्र झरा काढण्याचे तरुणांनी केलेले धाडसी काम उत्कृष्ट असेच आहे,  हे आपणाला हे पुस्तक वाचताना समजते. 
               लहान असताना गावातील जत्रेमध्ये वडिलांससोबत फिरत असतानाच्या आठवणी खूपच हृदयस्पर्शी अशाच आहेत. लेखकांच्या वडिलांना 'लाकडं -फोड्या रामा महार' असे गावातील लोक म्हणत असत. काही मोठ्या लोकांच्या घरातील लाकडे फोडल्यानंतर त्या घरातील स्त्री काहीतरी भाकरी तुकडा द्यायची. आणि ते मिळण्याच्या आशेने  लहानपणी लेखकही वडिलांच्या बरोबर जात असायचे. हे सांगत असताना, एकदा एका ब्राह्मणाच्या घरी लग्न होते आणि हे माहित झाल्यानंतर सासरी गेलेल्या मुलीलाही गोडधोड खायला मिळेल या आशेने गावी बोलवणारे लेखकाचे आई-वडील डोळ्यांसमोरून जात नाहीत. गरिबी आणि जातीयतेच्या रूढी-परंपरा यात गुरफटलेला समाज हे पुस्तक वाचत असताना, या सर्वांचा विचार करायला भाग पाडते. ब्राह्मणाच्या घरी असलेले लग्न झाल्यानंतर जेवणाच्या पंगती उठतात आणि त्या पत्रावळीतील उरलेले अन्न घरी घेऊन येणारे वडील आणि त्यातील चांगले चांगले लाडू बाहेर बाजूला काढणारी आई ,त्याचबरोबर भुकेल्या पोटी ते उष्टे अन्न  खात असतानाचा प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी उभे राहते. 'माणसाचं मन आणि माणसाची जीभ  माणसाला  कधी कुठल्या मार्गाने नेऊन कुठे पोहोचल्याचा पत्ता नसतो' असे लेखक एका ठिकाणी लिहितात ते उगाच नाही. शेरडा- करडाकडे रानात चरायला घेऊन जाणारे लेखक , शाळेत पहिल्यांदा जातात त्याचेही या ठिकाणी खूप सुंदर वर्णन केले आहे. त्यावेळी वाण्या,बामनांच्या रांगेत बसल्यानंतर खाली बसण्यासाठी मुलांनी केलेल्या दंगा, उन्हाळ्यातही गरम जमिनीवर बसून घेतलेले शिक्षण त्यांच्या चटक्यांची जाणीव करून देतात. आयुष्यात कोणीही सहजासहजी मोठा होत नाही तर त्या पाठीमागे अपार कष्ट, संघर्ष असतो हे वाचकांनाही आत्मचरित्र वाचत असताना समजते. 
              लेखकांचे वडील ज्यांना 'लाकडं- फोड्या रामा' म्हणून सर्व गाव ओळखायचे त्यांनाही शिक्षणाबद्दल वाटत असणारा आदर प्रेरणा देऊन जातो.  'तराळकी 'म्हणजे महार वतनाची कामे गावात करणे आणि ती आपल्यालाच मिळावी म्हणून भावकीत चाललेली भांडणे या ठिकाणी दिसतात. प्रत्येक वेळी जातीचा विचार करणारे गावकरी, ज्यावेळी विहिरीतील प्रेत वर काढायचे काम मात्र लेखकांच्या वडिलांना सांगतात आणि त्यावेळी जातीचा विचार करत नाहीत. तरीही महार लोक गावकीचं काम करतात आणि त्यासाठी आपापसात का भांडतात ? हा प्रश्न लेखकांच्या मनाला भेडसावताना दिसतो. त्याचप्रमाणे पूर्वी  ज्या परंपरा होत्या, त्यामध्ये प्रेताला जाळण्यासाठी लाकडे फोडून दिल्याबद्दल,  नवे शर्ट, सदरे मिळायचे आणि चौथ्या वर्गात जाईपर्यंत लेखक सांगतात की, असेच मढ्याच्या अंगावरच्या मिळणाऱ्या नव्या कपड्याचे शर्ट, सदरे  ते घालत होते. दुसरी प्रथा या ठिकाणी समजते ती म्हणजे,मेलेल्या  जनावरांचे  मांस खाणे. त्यामध्ये एका वाण्याची म्हैस रोगाने मेलेली असते आणि तिच्या मांसाच्या तुकड्यासाठी भावकित लागलेली भांडणे, त्यांची शोकांतिका म्हणून उभी राहते. 'माणसाची जात माणसाला कुठल्या अवस्थेत नेते, कुठल्या अवस्थेत कसे जगायला भाग पडते', ही लेखकांनी या आत्मचरित्रात चरित्रात लिहिलेली वाक्ये. 
           हे आत्मचरित्र वाचताना, लेखकाची बहिण शेवंता, तिच्या लग्नानंतरच्या त्रासामुळे नियम अमान्य करतात आणि त्यावेळी वाळीत टाकल्यानंतर लेखकाच्या  मनाची अवस्था प्रत्येक गोष्टीचा विचार करायला भाग पाडते.  पुढे शालेय जीवनात पैशाची चणचण असताना हाडके विकून पैसे मिळवताना , एकदा माणसाची हाडे जनावरांची म्हणून घेऊन जातात आणि तो हाडे विकत घेणारा माणूस,  जिथून आणली तिथे ती हाडे नेऊन टाकायला सांगतो हा प्रसंगही खूप गमतीदार तर आहेच पण गरीब परिस्थिती कशी असते याची जाणीव करून देणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात लेखक येतात. आणि त्यांच्यात अमुलाग्र बदल होतो. जनता पत्रक गावात आल्यामुळे बदल होतो आणि  रुढी - परंपरा बदलताना दिसतात. पुढे उच्च शिक्षण घेऊन लेखक वकील होतात आणि गरीब लोकांची मदत करताना पाहायला मिळतात. या विचारातून आणि बदलातून लेखक ज्यावेळी  मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होतात त्यावेळी त्यांनी भोगलेल्या सर्व कष्टाचे चीज झाल्याचे दिसते. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या संकटातून सावरत असताना, काही वेळेस नैराश्य येत असेल तर 'शंकरराव खरात' यांचे असणारे हे 'तराळ- अंतराळ' आत्मचरित्र वाचून प्रेरणा नक्की मिळेल यात शंका नाही.

                                                                                  प्रियांका मदने मंडले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...