' समिधा' हे 'साधनाताई आमटे' यांचे आत्मचरित्र माझ्या वाचनात आले. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे,एका स्त्रीचा हात असतो, हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो पण याची प्रत्यक्ष प्रचिती हे आत्मचरित्र वाचताना आली. स्त्रीच्या आयुष्याची जिवंत गुंफण लेखिका या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवतात.
बाबा आमटे आणि त्यांचे कार्य आपल्याला सर्वदूर माहित आहे पण या धगधगत्या मशालीला सांभाळण्याचे काम मात्र साधनाताई यांनी केले होते. या पुस्तकाची सुरुवात होते ही ती, साधनाताई यांच्या बालपणीच्या आठवणीतून. त्यामध्ये त्या, त्यांच्या घरातील सनातनी, जुन्या रूढी-परंपरा आणि त्याचा त्यांच्या मनावर त्यावेळी होत असणाऱ्या संस्कारांचा उल्लेख करतात. तरीही दुसऱ्यावर अन्याय झाल्यावर कळवळणारे मन, बाबा आमटेंच्या सहवासात असतानाही बऱ्याच प्रसंगातून दिसून येते. बाबा आमटेंच्या आयुष्यात, सहचारीणी म्हणून जात असतानाचे प्रसंग खूपच आश्चर्यकारक असेच आहेत. लग्न न करण्याचा घेतलेला निर्णय 'इंदू घुले ' म्हणजेच 'साधनाताई आमटे' यांना पाहताच विरघळून जातो आणि प्रथम भेटीतील बाबांच्या साधू वेशावर त्याही भाळतात. आणि त्यातूनच विधात्याने घडवून आणलेल्या, या निर्वाज्य नात्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. घरच्यांचा विरोध असतानाही, त्या बाबांशी लग्न करण्याचे ठरवतात. दोघांच्या स्वभावातील फरक असतानाही, त्यांच्यातील जन्मोजन्मीचे घट्ट नाते या पुस्तकाच्या पुस्तकाच्या माध्यमातून आणि अनेक प्रसंगातून आपल्याला समजते. लेखिका दोघांच्या स्वभावातील फरक सांगताना एके ठिकाणी लिहितात की, ' बाबांची वृत्ती लोकसंग्रहाची, तर मी अगदीच एकलकोंडी. बाबांचे बोलणे धबधब्यासारखे, आमचे आपले थेंबे थेंबे तळे साचे. बाबा स्वप्नाच्या दुनियेतील मुसाफिर, तर मी वास्तवाला घट्ट धरून बसणारी.' दोघांच्या स्वभावातील असणारे अंतर फक्त आणि फक्त एका अतुट प्रेमाच्या बंधामुळे जाणवतही नाही. साधनाताई लहान असल्यापासून गरिबांशी आपुलकीने वागायच्या आणि पुढे बाबा आमटे यांच्याशी लग्न झाल्यावर तर त्या, रुढी आणि परंपरा यांच्या बंधनातून मुक्त झाल्याचे पहावयास मिळते.
बाबा आमटे यांचे लग्न झाल्यानंतर, ज्यावेळी ब्राह्मणत्त्व कटाक्षाने पाळले जात होते, त्यावेळी हरिजन स्त्रियांना, त्यांच्यामध्ये जाऊन त्या हळदी- कुंकू लावतात. आणि ही घटना नक्कीच प्रेरणा देऊन जाते. त्यावेळी आपल्या नवऱ्याला कुठल्याही परिस्थितीत साथ द्यायलाच हवी, याची जाणीव आपल्याला या पुस्तकातून समजते. कुष्ठरोग्यांसाठी काम करण्याचे ठरवल्यानंतर,प्रत्येक पावला सोबत साथ देणाऱ्या लेखिका आणि त्यांचे आयुष्य चिंतनाला जागा करून देतात. बाबा आमटे यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय म्हणजे संघर्षमय जीवनाची सुरुवात होती आणि त्या निर्णयापाठीमागे काहीही तक्रार न करता चालण्याचे धारिष्ट साधनाताईंनी दाखवल्याचे पुस्तक वाचताना आपल्याला समजते. बाबा आमटेंचे समाजकार्य चाललेले असताना,पाठीमागे आपल्या मुलांची काळजी घेत असताना आलेल्या अडचणींना सामोरे जाण्याची जिद्द त्यांच्यापाशी होती. त्यामध्ये ज्यावेळी विकास आमटे यांचा जन्म होतो आणि परिस्थिती अतिशय बिकट असते, जातिभेद पाळत नसल्यामुळे कुणी नातेवाईक जवळ करत नव्हते पण तरी अशा परिस्थितीत त्यांनी बाबांना आश्वासक साथ दिली. आनंदवन आणि तेथील परिस्थिती पाहता कामाचा व्याप खूपच होता तरीही त्या कायम सोबत असायच्या,प्रत्येक वेळी.
एका वादळासोबत अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. एक जंगल, ज्या जंगलामध्ये वाटही दिसत नव्हती, त्या ठिकाणी आनंदवनची निर्मिती करणे ही गोष्ट सहज साध्य नक्कीच नव्हती. आणि यशाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ मिळाली,ती साधनाताईंच्या भक्कम पाठिंब्याची. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचा उचललेला ध्यास जगावेगळा होता पण त्या पाठीमागे त्यागाची समर्पक भूमिका होती. निस्वार्थीपणे काम करत असताना, स्वार्थीपणाचा लवलेशही मनाला होणार नाही याची काळजी घेतली ती, साधनाताईंनी. समाजकार्याला वाहून घेतलेल्या व्यक्तीबरोबर संसारात थाटण्याचे साधनाताईंनी ठरवले, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला असेच म्हणावे लागेल. महारोगी सेवा समिती, आनंदवन, गोकुळ या सर्व उभारणीमध्ये अप्रत्यक्षपणे सहकार्य साधनाताईंचे होते याची कल्पना हे आत्मचरित्र वाचत असताना येते. आनंदवन निर्माण होत असताना,सुरुवातीला तेथे दाट जंगल होते आणि अशा जंगलामध्ये एक झोपडी बांधून आपल्या कार्याची सुरुवात करणारे हे जोडपे आदर्शवतच. आणि त्यावेळी या कार्यासाठी जे लोक काम करत असायचे, त्यांचा स्वयंपाक साधनाताई स्वतः करायचा. दुधासाठी ज्या गाई पाळल्या होत्या, त्यांची धार त्या विनातक्रार काढत असत. या कामात तरबेज झाल्यानंतर त्यांना अण्णासाहेब सहस्त्रबुद्ध्यांनी 'आनंदवनची गौळण' ही उपाधी दिल्याचा या पुस्तकात उल्लेख आहे. साप, विंचू, कोल्हे, घोरपड, अजगर, रानडुकरे , वाघ, लांडगे यांच्या सहवासात, आपल्या मुलांना सोबत घेऊन राहणाऱ्या साधनाताई आमटे आयुष्यातील आनंदाची परिसिमा बदलताना दिसतात.
आयुष्याचा जोडीदार जर साथ देणारा असेल, तरच आनंदवन सारखे प्रकल्प उभे राहतात, दुसऱ्यांच्या मुलांनाही मायेने कवटळण्याचे धारिष्ट असेल तरच गोकुळ सारखे मायेने ओथंबलेले घर उभे राहते, सुरुवातीपासूनच आरामदायी आणि सुखासह जीवनापासून खूप दूर असतानाही संस्कारक्षम नितीमत्तेतून हेमलकसा उभे राहते. या सगळ्यांचे यशस्वी अधिक्रमण करत असताना मुख्यतः साधनाताई आमटे थकल्या नाहीत, खचल्या नाहीत आणि म्हणूनच बाबा आमटे यांनी कल्पिलेले कार्य पूर्णत्वास गेले. त्यामुळेच या आत्मचरित्राचे शीर्षकही 'समिधा हे आहे. एका समाजसेवकाबरोबर थाटलेल्या संसारामध्ये त्यांनी पुढे नर्मदा बचाव आंदोलन, भारत जोडो आंदोलन यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांनी भोगलेले दुःख, त्यांनी जगलेले आयुष्य वाचताना अकल्पनीय वाटते परंतु; या सर्वातून पार होत असतानाही, त्यांनी त्यांच्यातील साधेपणाला मोठेपणाचा, गर्वाचा स्पर्शही होऊन दिला नाही. त्यांचा साधेपणा या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरुनच समजतो. ज्या गोष्टी बोलायला, विचार करायला अवघड वाटतात, त्या अवघड गोष्टींना सोपे करून, अनेक दुःखी जीवांना आनंद देणारे आनंदवन उभारण्यासाठी बाबा आमटे यांनी जेवढे कष्ट घेतले , तसेच कष्ट साधनाताईंनी आपला संसार, आपली मुले सांभाळण्यासाठी घेतले होते. आजारी असताना एकमेकांपासून दूर दवाखान्यात असताना, साधनाताईंनी लिहिलेली पत्रे अतिशय बोलकी आहेत. ती वाचत असतानाच त्यांच्यामधील लेखिका जन्म घेते. आणि त्यातूनच त्यांनी भोगलेल्या अनेक अनुभवातून, त्यांचे हे आत्मचरित्र आपल्यासारख्या वाचकांपुढे उभे राहते. त्यामुळे आपल्याला स्त्रित्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी हे पुस्तक वाचणे जीवनाला नवीन प्रेरणा देऊन जाते.
प्रियांका मदने - मंडले
Comments
Post a Comment