२७ जून १८८० मध्ये, उत्तर अल्बामामधल्या 'टस्कंबीया ' या छोट्याशा गावात लेखिकेचा जन्म झाला. सुरुवातीला प्रकाशाशी असणारे नाते, एका आजाराने संपुष्टात आले.एके दिवशी आलेल्या तापामुळे दृष्टी गेली, ऐकू यायचे बंद झाले आणि वाचाही गेली. ज्या गोष्टींशिवाय जगण्याची कल्पनाच आपण करू शकत नाही, ती गोष्ट त्यांच्यासोबत घडली. त्यांना पुढे काय घडणार आहे याची कल्पनाही नसेल. हा आजार झाल्यानंतर, प्रत्येक दिवशी हेलन केलर आपल्या आईजवळ मांडीवर बसलेल्या असत. दोन डोळ्यांनी आपण पूर्ण जग बघू शकतो, कानांनी प्रत्येक आवाज ऐकू शकतो आणि प्रत्येक गोष्टीकडे बघत- बघत, जवळच्या व्यक्तींना ऐकत -ऐकत आपण बोलायला शिकतो. तरीही मूक, अंध, बधिर असे तिहेरी अपंगत्व नशिबात आलेल्या लेखिकेची जीवनकहानी वाचताना, त्यांचे शब्द आशेचा किरण देऊन जातात. सुरुवातीला या अपंगत्वाशी जुळवून घेताना त्यांची खूपदा चिडचिड व्हायची; कारण व्यक्त होण्याचे माध्यम होते, ते म्हणजे मोडक्या- तोडक्या खाणखुणा. त्यामुळे काही गोष्टी समोरच्या व्यक्तीला समजत नसत. पण घरच्यांचा असणारा पाठिंबा त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणताना पाहायला मिळतो. त्यामुळेच त्यांच्या या आत्मचरित्रात त्या लिहितात की, 'माझ्या ठार अंधाऱ्या दिवसातही मी आनंदी राहू शकले, ते केवळ आईच्या प्रेमळ समजूतदारपणामुळेच.' ज्या -ज्या गोष्टीमुळे हेलन केलर आनंदी होतील, ती प्रत्येक गोष्ट घरातील प्रत्येक जण करत असल्याचे हे पुस्तक वाचताना समजते. दिवसांमागून दिवस जात होते , तसे मनामध्ये प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची त्यांची उत्कंठा वाढत होती आणि खानाखुणा अपुऱ्या पडत आहेत असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या गावाच्या आसपासही त्या काळात अंध, मूकबधिर मुलांसाठी शाळा नव्हती. पण हेलन केलर यांच्या आईने डिकंसनने 'लॉरा ब्रिजमनवर' लिहिलेला लेख वाचला होता. त्यातून त्यांना हे समजले होते की, त्या मूक आणि अंध असूनही त्यांनी शिक्षण घेतलं होतं. हा लेख वाचून त्यांच्या आईच्या मनामध्ये आशेचा किरण निर्माण झाला.हेलन केलर सहा वर्ष वयाच्या असताना बाल्टीमोर मधील डॉ. चिसहोम या नावाजलेल्या डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यावेळी त्या डॉक्टरांनी त्यांच्या वडिलांना, त्यांना घेऊन डॉ. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. आणि तिथूनच लेखिकेच्या अंधकारमय जीवनातून प्रकाशाकडे जाण्याचा एक अदृश्य दरवाजा उघडला.डॉ. अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी 'परकिंस इन्स्टिट्यूशन' चे संचालक अनाग्नोस यांना पत्र लिहून हेलन केलेर यांना शिकवण्यासाठी शिक्षक आहेत का, याची माहिती विचारायला सांगितली.आणि मीस सुलीव्हॅन त्यांना शिकवण्यासाठी आल्या. आणि लेखिकेसाठी जादूची आणि आनंदाची कांडी घेऊनच, त्यांच्या आयुष्यामध्ये त्या आलेल्या होत्या असं म्हणायला हरकत नाही.
हेलन केलर यांच्या आयुष्यात,त्या आल्यापासून त्या शब्दांचे खेळ शिकल्या, स्पर्शांच्या संवेदनातून निसर्गातील प्रत्येक गोष्टीशी एकरूप व्हायला शिकल्या, विचार करायला शिकल्या, छापील पुस्तकं वाचायला शिकल्या. त्यांच्या गुरुमुळे, त्यांचे पूर्ण आयुष्य बदललं. प्रत्येक गोष्टी मधून निर्मळ आनंद कसा मिळवायचा याबद्दलही त्यांना बऱ्याचशा गोष्टी समजल्या. त्यांचे शिक्षण हे अत्यंत आनंददायी स्वरूपाचे होते; कारण त्यांच्या शिक्षिका, ज्या स्वतः पाच वर्षाच्या असताना, त्यांची दृष्टी थोडीशी कमी झाली होती आणि त्यामुळे त्या अंधशाळा शिकल्या होत्या आणि त्यांनी त्या शाळेत शिकविलेले होते. त्यामुळे त्यांचा अनुभव हेलन केलर यांच्या आयुष्यामध्ये खूपच महत्त्वाचा होता. शिकवत असताना त्या अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवत असत. आणि निसर्ग सानिध्यात नेऊन त्यांनी हेलन केलर यांना प्रत्येक गोष्ट शिकवली. एक उत्कृष्ट शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याला कशाप्रकारे घडवते ,हे या आत्मचरित्राच्या माध्यमातून समजते.
हेलन केलर यांना शिकवण्यासाठी आलेल्या मिस सुलीव्हॅन त्यांचे आयुष्य बदलून टाकतात. बोस्टन येथील अंधशाळेत आल्यानंतर ,अंध मुले - मुली वास्तव स्वीकारून आनंदी आणि समाधानी जीवन जगताना त्या पाहतात. तिथले दिवस त्यांना नवीन ऊर्जा देतात, म्हणून त्या बोस्टनला प्रेमळ हृदयनगरी असे संबोधतात. पुढे त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांना ऐकू येत नसल्यामुळे बोलता येत नाही. मग तेव्हापासून त्या बोलण्यासाठी प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे मिस सुलीव्हॅन यांच्या कंठाला हात लावून, त्या काय बोलत आहेत हे समजून घेण्यासाठी त्या धडपडत राहतात. त्यांची धडपड पाहून वाचकांना एक नवीन प्रेरणादायी दृष्टिकोन सापडताना दिसतो. सुरुवातीला त्या बोटांचा हालचाली, हात वारे ,खानाखुणा करून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत. आणि पुढे त्यांनी बोलण्यातून संवाद साधण्यासाठी सराव केला. हा सराव केल्यानंतर त्या घरातील लोकांशी बोलतात, त्यावेळी सर्वजण आनंदून गेल्याचा त्या पुस्तकात उल्लेख करतात.
पुढे लिखाणाकडे वळताना, त्यांनी कथा लिहिलेली होती. पण ती दुसऱ्याच कुणाची तरी असे समजले. आणि त्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दिसतात.केंब्रिज स्कूलमधील शिक्षण, रेडक्लिफ कॉलेजमधील दिवस आणि त्यावेळी त्यांना भेडसावणाऱ्या असंख्य समस्या, त्याचप्रमाणे अनेक भाषा शिकण्यासाठी त्यांची चाललेली धडपड आणि आयुष्यामधील त्यांच्या कुटुंबीयांचे आणि गुरूंचे स्थान बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. आयुष्यात अपंगत्वाला बाजूला सारून, अनेक संकटावर मात करून आणि चैतन्यमय जीवनाचा आदर्श हे पुस्तक देऊन जाते. पुढे त्या अपंगत्वावर मात करून त्या अनेक ठिकाणी प्रेरणादायी व्याख्याने देतात.अंधशाळेमध्ये शिकवतात , पत्रकार म्हणून काम करतात, साहित्य क्षेत्रामध्ये पण उत्तुंग कामगिरी करतात. या सर्व गोष्टींमधून एकच समजतं की इच्छाशक्ती असेल आणि कुटुंबांचा प्रेरणादायी आधार असेल, तर एखादी व्यक्ती कोणतीही गोष्ट करू शकते.हे या पुस्तकातून समजते. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक वाचनप्रेमिने नक्की वाचायला हवे.
Comments
Post a Comment