"आई समजून घेताना..... लेखक - उत्तम कांबळे "
'आई ' हा शब्द सर्वव्यापी आहे, या शब्दापुढे आभाळही ठेंगणे वाटते. आईच्या पोटात नऊ महिने, नऊ दिवस राहून, या नव्या जगात प्रवेश करण्यापासून प्रत्येक जण आपल्या आईला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच "आई समजून घेताना...."हे "उत्तम कांबळे " यांचे पुस्तक वाचण्याचा मोह मला आवरला नाही. सुरुवातीच्या प्रकरणापासून, ते पुस्तक संपेपर्यंत हे पुस्तक हातावेगळे ठेवूच नये, असे मला वाटत होते. आणि त्यामुळेच हे पुस्तक वाचल्यानंतर ,माझ्या मनाला मिळालेली प्रेरणा,मला बराच वेळ माझ्या आईला, माझ्या पुढे उभा करीत होती. हे पुस्तक लेखक "उत्तम कांबळे " आणि त्यांची आई "आक्का " यांच्या नात्यातील अनुभव वाचकांपुढे ठेवत असले तरी त्यांची आई मनाच्या कोपऱ्यात एक स्थान करून, कधी बसते हे देखील समजत नाही. आणि त्यामुळेच या पुस्तकाचा गाभा असणाऱ्या लेखकाच्या आई आपल्याला, आपल्या जवळच्या कोणीतरी आहे असे वाटायला लागते.
या पुस्तकाची सुरुवात होते ती,लेखक ज्या ठिकाणी काम करत असतात त्या ठिकाणापासून. त्यांची आई आणि ते यांच्यामधील अनेक अनुभव लेखक या पुस्तकाचे निमित्ताने वाचकांपुढे ठेवतात.त्यांच्या दोघांच्या मध्ये झालेल्या संवादातून ,संभाषणातून बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की, लेखकांना ज्यावेळी सकारात्मक उत्तराची अपेक्षा असायची, त्यावेळी त्यांची आई त्यांना वेगळे उत्तर द्यायची. त्यावेळी लेखकांना खूप त्रास होत असे. पण आईच्या आयुष्याचा उलगडा ज्यावेळी ते करत जातात, त्यावेळी आईला समजावून घेणं किती अवघड आहे हे पण त्यांना समजल्याच लक्षात येतं. लेखकाच्या आई , त्यांना लेखक "आक्का " असे म्हणत असतात, या त्यांच्याजवळ राहिलेल्या असतात. परंतु ;त्याठिकाणी राहत असताना आपल्या एका मुलाची परिस्थिती पाहताना त्यांना आनंद होत असतो पण त्याचप्रमाणे आपल्या इतर मुलांची परिस्थिती गरिबीची आहे याबद्दल खंतही वाटत राहते. आणि या संमिश्र भावणेमुळे, लेखकाने आपल्या मुलाला जास्त किमतीची पॅन्ट जरी आणली तरी, लेखकाची आई त्यांना म्हणायची, "कशाला भारी घ्यायची एवढी? माझी गावाकडची नातवंड बघ, किती साधी राहतात. त्यांचा बाप तुझ्यासारखा मिळवता नाही ना!" यातून कितीही मोठा झाला तरी आपल्या भावंडांना विसरू नकोस आणि त्यांचीही परिस्थिती समजावून घेऊन, त्यांनाही अडीअडचणींना मदत करायला पाहिजे असा सल्ला देणारी ही आई खूप सुंदर काही शिकवून जाते.
आपल्या आईचे वेगळे वेगळेपण सांगत असताना, लेखक अनेक अनुभव या पुस्तकामध्ये लिहितात. त्यामध्ये ते असं सांगतात की, इतर मुलांच्या आई प्रमाणे, त्यांची आई त्यांना कधी गोंजारात बसली नाही,कारण तेवढा वेळही नव्हता तिच्याकडे .पोटाला भाकरी मिळवण्यासाठी धडपडणारी आई काही वेळेस कडक वागायची परंतु; त्यापाठीमागे असणारा हेतू शुद्ध असायचा. लेखकाच्या आईच्या बोलण्यात जरी नकारात्मकतेचा सूर असला तरी, प्रत्येक शब्दातून विचार करायला भाग पाडणारी आई, वास्तवाचे भान अलगद देऊन जायची. आणि लेखक लहानपणी, मोठा होऊन, शिकून चांगली नोकरी करून आईला सुखात समाधानात ठेवण्याचे ठरवतात ;पण हा विचार त्यांच्या मनामध्ये येतो तो, आईच्या दोन शब्दातूनच. त्यांची आई ,त्यांना नेहमी सांगायची, "शेणातला किडा काय शेणात राहत नाही" आणि ह्या वाक्यावरूनच खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या आयुष्याची योग्य दिशा सापडल्याच लक्षात येतं. यातूनच आपला मुलगा पुढे गेला पाहिजे, त्याने यशस्वी झाले पाहिजे असा विचार बाळगणारी आई कायम स्मरणात राहते. लेखक हायस्कूलमध्ये बोर्डिंगला असताना, खोटे कारण सांगून, त्यांनी शाळेमध्ये पैसे पाहिजेत असे पोस्टकार्ड पाठवून लिहिले होते. त्यावेळी वाटखर्चीचे पैसे वाचवून, वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर पायी चालत येऊन, आपल्या मुलाला दहा रुपये देणारी आई आपण विसरू शकत नाही. दुसरा एक प्रसंग,लेखकांच्या आईच्या स्वभावातील चांगुलपणा सांगून जातो. लेखकांचे आजोबा म्हणजेच 'आक्काचे वडील' , त्यांनी आपल्या सर्व मुलींची लग्न चांगल्या घरात करून दिली होती. पण लेखकाचे वडील आणि त्यांच्या आई यांचा संसार चांगला चालला नव्हता.बऱ्याच वेळा आजोबांना असे वाटायचे की, आपल्यामुळे तिच्या आयुष्यात कष्ट आले आहे. लेखकाच्या आई नेहमी आपल्या वडीलांपाशी आपले मन मोकळं करायच्या , काही वेळा आपली व्यथा सांगताना रडतही असतं.आणि त्यावेळी पासून, त्यांच्या आजोबांनी पण केला होता की, "जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ;तोपर्यंत मी तुझ्या सासरी पाऊल ठेवणार नाही" आणि त्यांनी हा शब्द शेवटपर्यंत पाळला देखील होता. परंतु आपल्या लेकीची आठवण झाल्यानंतर, लेकीच्या घरापासून दीड- दोन किलोमीटर अंतरावर, वडील वाट बघत थांबायचे. वाटेचा वाटसरू दिसला की, त्याला निरोप द्यायचे की," ईलंदाला सांगा की, तुझा बाप तुला भेटायला आलाय. " आणि असा निरोप आल्यानंतर, कशाचाही विचार न करता, आपल्या वडिलांना भेटण्यासाठी धावत जाणारी आई ममतेची अनमोल शिकवण देऊन जाते. आणि यातून लेखकाच्या आईचा, वडीलांप्रती जपलेला एक हळवा कोपरा याठिकाणी पाहायला मिळतो.
पुढे वय झाल्यामुळे, तब्येतीच्या तक्रारी वाढत असतात आणि त्यामुळे लेखक आपल्या आईला आपल्याकडे राहण्यासाठी बोलावतात. इथे आल्यानंतर बऱ्याचदा लेखकाचे मित्र, त्यांच्या आईला घरी बोलावत असत आणि परतताना त्यांना साड्या घेत. मग लेखकाच्या आई त्या साड्या घेऊन घरी येत. हे मात्र लेखकाला आवडत नसे. मग हे सतत चालत असल्यामुळे लेखक आपल्या आईला विचारतात की, 'आपलं एवढं सगळं चांगलं असताना, तू त्यांनी दिलेल्या साड्या कशाला घरी घेऊन येतेस? नको ,असे का म्हणत नाहीस.' त्यावेळी त्यांच्या आई असं सांगते की, 'या साड्या मी माझ्यासाठी आणत नाही, तर या चांगल्या असणाऱ्या साड्या, तुझ्या बहिणींना त्या माहेरी आल्यानंतर मी देते आणि सांगते की, त्या साड्या तुमच्या भावानेच घेऊन दिल्या आहेत ". हे उत्तर ऐकल्यानंतर,लेखकाला काय बोलायचं हे समजत नाही. म्हणूनच या पुस्तकाचं नाव लेखकाने लिहिले आहे, "आई समजून घेताना...". आणि या पुस्तकात असे बरेचसे प्रसंग आहेत, ज्यामध्ये लेखकाने,त्यांची आई आणि यांच्यामध्ये होत असलेले वाद याबद्दल लिहिले आहे. परंतु; या वादामध्ये आईकडून येणाऱ बोलणं म्हणजे, अनुभवरुपी तत्त्वज्ञानच आहे, असे पुस्तक वाचत असताना वाटतं. यानंतर या पुस्तकात एका प्रसंगाचे वर्णन आहे त्यात एका डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर, लेखकाच्या आईना टी बी झाल्याचं लक्षात येतं. त्यावेळी लेखक त्यांना काही सांगत नाहीत. डॉक्टरनाही सांगतात की, तुम्ही सांगू नका. परंतु त्यांच्या आईना ते कळत. कळत- नकळत हे लक्षात आल्यामुळे, लेखकाने आपल्या आईसाठी तिच्या खोलीमध्ये टीव्ही ठेवलेला असतो परंतु; टीव्ही पाहण्यासाठी आपली नातवंडे या ठिकाणी येतील आणि आपल्यामुळे त्यांना काही होऊ नये यासाठी टीव्ही दुसऱ्या खोलीत ठेवायला सांगणारी आई, लेखकाला सुरुवातीला खूप त्रासिक वाटते.परंतु ;त्या पाठीमागचे कारण त्यांना सुरुवातीला समजत नाही. त्याचप्रमाणे गावाकडे, घर असतानाही माळावर स्वतंत्र घर बांधून राहणारी आई ,स्वयंपाक घरात न येणारी आई, अप्रत्यक्षपणे आपल्यामुळे किंवा आपल्या आजारामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेताना दिसते. यातून लेखकाच्या आईचे, स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी विचार करण्याची भावना हे पुस्तक वाचत असताना लक्षात येते. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे, स्वतःची भूक पाण्यावर भागवत असतानाही आयुष्य जगत असतानाचे एक व्यापक तत्त्वज्ञान त्या आपल्या मुलाला देताना दिसतात. आपल्याही आयुष्यात अशा अनेक व्यक्ती भेटत असतात, ज्यांना समजून घेणे खूप किचकट स्वरूपाच वाटतं. आणि अशाच प्रकारे, एक आई- मुलाचं अनोखे नातं हे पुस्तक वाचत असताना जाणवतं. लेखकाच्या आईच्या बोलण्यामागे नेहमी, जो नकारात्मक सूर असतो तो खऱ्या अर्थाने नकारात्मक नसून, प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवणारा आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण लेखकाला जसं वाटत असतं, तसं प्रत्यक्षात त्यांच्या आईच्या मनात काहीच नसतं. पण पिढी -पिढी मधील अंतर आणि विचारांतील अंतर त्याच्यामुळे लेखक सांगतात की, मी माझ्या आईला समजून घेऊ शकलो की नाही यात शंका आहे.
लेखकांच्या आईचा हळवेपणा सांगत असताना, पुस्तकाच्या शेवटी लेखक एक प्रसंग सांगतात, त्यामध्ये त्यांच्या आईच्या भावाचा मुलगा, एका अपघातात मरण पावलेला असतो. आपल्या आईचे वय झाल्यामुळे ही गोष्ट तिला सहन होणार नाही, असे लेखकाला वाटते आणि त्यामुळे फक्त तो आजारी आहे अशी गोष्ट सांगून त्यांच्या गावी ते सर्वजण आलेले असतात. पण ज्यावेळी गाडी घराकडे वळते, त्यावेळी खरी गोष्ट न सांगताही त्यांच्या आईला समजते. आणि आपण आपल्या मुलाकडे गेलो नसतो तर हा प्रसंग घडला नसता अशी खंत उगाचच त्यांना वाटू लागते. यातून स्वतःचा विचार करण्यापेक्षा, दुसऱ्याचा विचार करणारी आणि या प्रसंगामधून भावाला आधार देत असतानाच धाय मोकलून रडणारी लेखकांची आई खूप वेगळी भासते. आज शाळेमध्ये फादर्स डे, मदर्स डे सेलिब्रेट होत असतात, परंतु यामध्ये खऱ्या अर्थाने आपण आपल्या आई वडिलांना समजून घेतो, का नाही याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि हे पुस्तक आपल्याला हा नवा, वेगळा विचार करायला भाग पाडते. त्यामुळे एक वाचक म्हणून हे पुस्तक वाचणे म्हणजे आपणच आपल्या आईला काही काळासाठी आठवण्यासारखेच आहे. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा.
या पुस्तकातील मला आवडलेली वाक्ये :
१) "तुझ्या लहानपणी आपण दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार -पाच रुपये मिळायचे. इथ तुझा पोरगा तर दहा रुपयांचा एकच घास करतो. तुला मागच दिवस कसं नाही आठवत..."
२) " भाकरी मिळवण्याचा तिच्या प्रयत्नामुळे आम्ही बऱ्याच वेळेला तिच्यापासून दूर फेकलो जायचो.पहाटे चार वाजता ती उठायची. सहापर्यंत स्वयंपाक करून रोजगाराला बाहेर पडायची.संध्याकाळी परतायची ती डोक्यावर जळणाचा भारा घेऊन."
३) "माझे सगळे नातेवाईक - तिला सांगायचे, 'तुझा पोरगा खूप मोठा आहे. त्याच्या घरात गेल्यावर नीट वागत जा. खूप मोठे लोक येतात त्याच्याकडे. सर्वांशी नीट बोलत जा. आक्काला यापैकी काहीच पटायचं नाही. मी माझ्या लेकराच्या घरात जाते.कुणा मोठ्या माणसाच्या नाही, असाच काहीसा तिचा खुलासा असायचा. तो सांगतो त्याप्रमाणे आपण वागलो की आपल्यातील आई संपेल आणि एक वस्तू शिल्लक राहील याची कदाचित तिला धास्ती वाटत असावी ,असा माझा अंदाज होता. खरा की खोटा मला नाही सांगता येणार."
४) "तुला तुझ्या आईत हे बदल कशासाठी घडवायचे आहेत? नव्या संस्कृतीच्या नावाखाली तू तुझी मूळ आई तर बदलत नाहीस? हे आधुनिकतेचे ओझे तिला सहन होईल की नाही याचा विचार कधी करत नाहीस? जणू तू काही नवीन आई च घडवायला निघाला आहेस काय?"
५) "तू नको घाबरू. रात्रंदिवस कष्ट करेन पण तुला जगवेन. वाघीण आहे मी. कधी हरायची नाही. दिवसभर रोजगार करेन पण तुम्हाला जगवेन. काही काही पोरांना बाप नाही भावत.आपण लक्ष नाही द्यायचं. मी झाडाला झिंज्या बांधून संसार करेन. स्वतः उपाशी राहीन. तुला शिकवीन. तू खूप शिक. तुझा तू चांगला जग. माझं काय? या मुडद्द्याबरोबर दिवस ढकलायचं. तुझं चांगलं झालेल बघून मरायच एक दिवस."
६) "तू आता समाजाबाहेर पडलास. तुझ्या आणि आमच्या चालल्यात खूप अंतर आहे.कधीतरी समाजालाही समजून घे. तो सावकाश का चालतो याचाही विचार कर."
७) "भाकरी ऐवजी भूक पचवायचे असंख्य मार्ग तिच्याकडं होते. कुठून तिन हे जमा केलं होतं माहित नाही."
८) " आक्का म्हणाली, "उतम्या, आता एक गोष्ट लक्षात ठेव. माणसान मरनासाठी खायचं नसतं. जगण्यासाठी खायचं असतं. जास्त खायची इच्छा झाली की पाणी प्यायचं. जेवणाच्या अगोदर पाणी प्याव.जेवता जेवता पाणी प्यावं म्हणजे अन्न जास्त लागत नाही."
प्रियांका मदने - मंडले
Comments
Post a Comment