बसमधील प्रवास.....ते आजोबा...
बस मधील प्रवास आणि प्रवासात अनुभवलेले काही क्षण हे नेहमीच खूप वेगळे असतात. आणि त्याविषयी मी आज लिहिणार आहे. मी सध्या एका कॉलेज मध्ये 'इंग्लिश' हा विषय शिकवते. हे कॉलेज माझ्या गावापासून वीसेक किलोमीटरवर आहे. त्यामुळे मला बसनेच यावे आणि जावे लागते. हा बसचा प्रवास तसा काही माझ्यासाठी नवीन नाही. कारण कॉलेजची दोन वर्षे मी ' सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज' कराड या ठिकाणी होते. बी. ए. चे शिक्षण घेत असताना बसचाच प्रवास असायचा, पण त्यावेळी लग्न झालेले नव्हते आणि त्यामुळे मम्मीने केलेला डबा घ्यायचा, स्वतःचे आटोपायचे आणि बस स्टॉप वर जायचे. पण आता स्वतः च डबा बनवून घेऊन बस पकडावी लागते. आणि ही एक तारेवरचीच कसरत असते.तसे पाहिले तर ,कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी ७:१५ ची बस पकडावी लागते आणि काही कारणामुळे ही बस चुकली , तर मग ८:०० वाजेपर्यंत दुसऱ्या बसची वाट पहावी लागते. थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी असणारी ७:१५ ची बस चुकली तर त्या ठिकाणी थांबणे अवघड होऊन जाते.
एवढ्या सकाळी बस पकडण्यासाठी फक्त मीच असते असे नाही, तर त्यामध्ये काहीजण नोकरीवर जाणारी असतात, काहीजण पुणे, सातारा, स्वारगेट या ठिकाणी जाण्यासाठी थांबलेले असतात, त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनाही कॉलेजला जायचं असते आणि त्यामुळे ते बसची वाट पाहत असतात. तसे पाहता आयुष्यात कुणाची इतकी काळजी केली नसेल, वाट पाहिली नसेल, विचार केला नसेल असा विचार बस स्टॉप वर पोहोचण्याआधी माझ्या मनात चाललेला असतो. बस स्टॉपवर आल्यानंतर सुरुवातीलाच बसमध्ये गर्दी असेल तर बस थांबत नाही आणि त्यामुळे गर्दी असेल की नाही असाही विचार मनात दररोज येत असतो. जेव्हा बस मध्ये जाऊन एखाद्या ठिकाणी उभी राहते आणि जागा असेल तर एखाद्या सीटवर बसायला मिळते, तेव्हाच जीव भांड्यात पडतो. सकाळच्या या बस मध्ये बरेच प्रवासी सीटवर झोपलेले असतात त्यामुळे 'थोडेसे आत सरकता का?' हा प्रश्न विचारायची संधीच नसते. त्यामुळे 'उभे राहायला तरी जागा मिळाली!' असे स्वतःच्या मनाला समजावीत रोजचा प्रवास चाललेला असतो. ही झाली कॉलेजपर्यंत पोहोचण्याची कहाणी, पण खरी गंमत कॉलेज सुटल्यावर असते.
आमचे कॉलेज १:०० ला सुटते आणि त्यामुळे १५ मिनिटांमध्ये मी कराड बस स्टॉप वरती असते. आता जाण्यासाठी पुन्हा बसची वाट बघायची. यावेळेस मात्र बस स्टँड वर खूप गर्दी असते. मला रेठरे बुद्रुक या गावी जाण्यासाठी शेनोली स्टेशन या स्टॉपला उतरावे लागते. आणि त्यासाठी तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ, शेणोली यापैकी कोणतीही एक बस पकडावी लागते. आणि या ठिकाणी जाणाऱ्या बसला खूप गर्दी असते. सुरुवातीला तर या गर्दीला बघूनच खूप भीती वाटते. मग बस येईपर्यंत आजूबाजूला निरीक्षण करत बसायला मला आवडते, कारण अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी दिसत असतात. त्यावेळी मनात विचार येतो की, खरंच का एवढ्या लोकांना महत्त्वाची कामे असतील! या विचाराबरोबरच एखादा लहान मुलगा दिसला की, मला माझ्या मुलाची 'प्रिन्सची ' आठवण येते,' तो काय करत असेल?' 'झोपला असेल काय?', 'रडत नसेल ना!' , 'आज त्याला काय खायला घेऊन जायचे?' असे, असंख्य प्रश्न मनात येत असतात आणि मनातल्या मनातच या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना अचानक बस येते. त्यावेळी बस मध्ये जागा पकडण्यासाठी होणारी चेंगरा - चेंगरी बघतानाच अंगावर काटा येतो. आणि या गर्दीला बघून मागे थांबले तर बस पाच मिनिटाच्या आत बस पूर्ण भरते आणि असे चुकून असे झाले ,तर मग दुसऱ्या बाजूला वाट पाहण्यामध्ये एक तास तरी जाणार हे निश्चित. आणि पुन्हा दुसऱ्या बसला एवढीच गर्दी असते. त्यामुळे मग अशा गर्दीमधूनच जाण्याचा निर्णय होतो . खूप कमी वेळेस बसायला जागा मिळते, शक्यतो जातानाचा प्रवास हा उभा राहूनच करावा लागतो. दररोज बस मध्ये जागा पकडण्यासाठी एकमेकांना दुसऱ्याच्या पुढे जायचे असते आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ढकला - ढकली असते की, त्यामध्ये कोणी - कोणाचा किंचितही विचार करीत नाही. काही वेळेला लहान मुले या गर्दीत सापडलेली असतात आणि लहान मुले गुदमरून रडायला लागली तरीही कोणी थांबायला तयार नसते. तसेच पुन्हा म्हाताऱ्या माणसाचा हात - पाय सापडला तरीही कोणी तिकडे लक्ष देत नाही. या गर्दीमध्येच कुणाची तरी बॅग खाली पडते आणि कोणीही उचलून द्यायला तयार नसते. मला बस मध्ये बसायला जागा मिळाली पाहिजे याच भावनेतून चाललेली स्पर्धा पाहून मन सुन्न, निराश, नाराज होते.
मी बऱ्याच वेळेला पाहिले आहे की या प्रवासामध्ये वृद्ध लोक जास्त असतात आणि अशीच म्हातारी माणसे या गर्दीमध्ये सापडली की, शाळा - कॉलेजला जाणारे विद्यार्थी, ज्यांना घरी जायची खूप गडबड असते ,ती ताकदीच्या जोरावर या म्हाताऱ्या माणसांना बस मध्ये त्यांच्या अगोदर जायला देत नाहीत. आणि पुन्हा चुकून जरी यांना आत प्रवेश मिळाला, तर कुणी 'तुम्ही बसा इथे, आजी - आजोबा' असे म्हणताना कोणीही दिसत नाही. आणि मग हाफ तिकीट असल्यामुळे आधार कार्ड ची मागणी करत, काही कंडक्टरही आपण त्यांच्यावर उपकार करत असल्यासारखेच भासवतात, त्यावेळी अशा कंडक्टरचा खूप राग येतो.
बसच्या या प्रवासात कितीतरी प्रसंग प्रकर्षाने आठवतात. त्यामधील एक प्रसंग म्हणजे 'एक आजोबा' एके दिवशी याच गर्दीमध्ये बसमध्ये चढले. आणि नेहमीप्रमाणे त्या दिवशी खूप गर्दी होती. मी पण त्या गर्दीमध्ये उभे होते, कंडक्टर प्रत्येकाचे तिकीट काढत होते. तिकीट काढत - काढत ते आजोबांजवळ आले आणि त्यांना तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड मागितले. तेव्हा समजले की त्या आजोबांना थोडे कमी दिसत होते. आणि ते एकटेच आलेले होते.कंडक्टरही त्यांना तुमच्या सोबत कोणी आलेले नाही का असे विचारत होते आणि त्यावेळी त्यांचे नाही हे उत्तर ऐकताना काळजात धस्स झाले. खरंच आजची पिढी बदलते आहे, पिढीमधील अंतरामुळे विचारांमध्ये, वागण्यामध्येही फरक पडत आहे. हे जरी आपण मान्य करत असलो तरी एवढा फरक रुचण्यासारखा अजिबात नाही. एक म्हातारा माणूस आहे, ज्याला थोड्या फार प्रमाणात दिसते, ज्याला चालताही नीट येत नाही, तो एकटाच कुठल्या प्रवासाला निघाला असेल असा विचार माझ्या मनात एकदम चमकून गेला. आपण म्हणतो त्याप्रमाणे आजच्या पिढीची मानसिकता विचारसरणी समाजाला पूरक नक्कीच नाही. समजा त्या आजोबांचा बसमधील हादऱ्याने तोल गेला आणि ते जाऊन पडले असते किंवा गर्दीमध्ये जोराचा धक्का लागला असता किंवा आणखी काहीतरी झाले असते तर त्याला जबाबदार कोण? जे आई - वडील आपलं संपूर्ण तारुण्य मुलांना वाढवण्यात, त्यांना शिकवण्यात खर्च घालतात आणि ज्यावेळी त्यांना मुलांची खरी गरज असते त्यावेळी त्यांना एकटे सोडणे कितपत योग्य आहे. हा प्रश्न आजच्या तरुण पिढीने आपल्या मनाला नक्कीच विचारायला पाहिजे. म्हातारपणा मध्ये आई-वडिलांना आपण चांगल्या प्रकारे सांभाळू शकत नसेल, तर आपल्या आयुष्याला खरंच कोणताही अर्थ राहणार नाही.
असेच विचार मनामध्ये चालू असताना शेनीली स्टेशन स्टॉपला बस येऊन थांबली आणि या गर्दीतूनच वाट काढत मी बाहेर येऊन सुटकेचा निःश्वास घेतला. पण कितीतरी वेळ माझ्या डोळ्यासमोरून ते आजोबा जायलाच तयार नव्हते.

Comments
Post a Comment