मुली आजही इतक्या असुरक्षित का?
मुली आजही इतक्या असुरक्षित का? या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलय. याचं कारण म्हणजे, मालेगावात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून, ओळख पटू नये किंवा त्या मुलीने कुणाला सांगू नये याकरता तिचा चेहरा दगडाने ठेचून आरोपीने तिची निर्घुण हत्या केली. ज्या वयात चांगला -वाईट स्पर्शही कळत नाही त्या वयात आरोपीने तिच्या शरीराचे लचके तोडले. या घटनेमुळे गावातील लोक संतप्त झाले आहेत. बऱ्याच भागातून निषेध मोर्चे आणि आंदोलने होताना दिसत आहेत. ही घटना ज्यावेळी मी ऐकली त्यावेळी मन सुन्न झाले. खरंच मुलगा मुलगी एकसमान असे आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी खरं मुलीच आयुष्य सुरक्षित असेल का? असा प्रश्न कदाचित त्या जन्म देणाऱ्या आई वडिलांच्या मनात येत असेल असेच वाटते.
मुलगा आणि मुलगी असे म्हणताना त्या दोघांमध्ये शरीराने फक्त फरक असतो. पण दोघांनाही स्वतःचा आयुष्य आनंदाने जगण्याचा अधिकार असतो, स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची धडपड दोघांमध्येही असते. आणि तरीही शरीरातील असणाऱ्या फरकामुळे अशा घटना घडतात, ज्यामुळे संपूर्ण आयुष्याचा खेळ एका क्षणार्धात बदलून जातो. एक तीन वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत बसली होती आणि चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपीने तिला बोलावून नेले. एका निर्जन स्थळी तिच्यावर अत्याचार केला आणि एका टॉवर पाशी तिचा मृतदेह टाकून दिला. ज्यावेळी मुलीची आई स्वयंपाक घरात काम करत असताना, मुलीचा आवाज का येत नाही म्हणून बाहेर आली. तर मुलगी खेळत असताना असणारी खेळणी तशीच पडली होती पण मुलगी तिथं नव्हती. मग मुलगी सापडत नाही ही घटना गावात समजली. गावातील प्रत्येक जण तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागली. पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवली, रात्रीपर्यंत शोध चालू होता. पण गावकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या हाती काही लागत नव्हतं. नंतरच्या काही वेळेमध्ये एका टॉवर पाशी एक मृतदेह आढळून आला आणि तो त्याची चिमूरडीचाच होता. ही घटना समजताच, गावामध्ये आई-वडिलांच्या, गावकऱ्यांच्या डोळ्यांना अश्रूचा बांध फुटला आणि इतकी निर्घुण हत्या कोणी केली असेल हाच प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होता. पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला पकडलं, आरोपी हा त्यांच्या गावातलाच होता आणि त्याने गुन्हा कबूलही केला. पण त्या आरोपीची चौकशी करत असताना त्याने जे काही खुलासे केले त्या कारणाने ने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकले.
आरोपीने सांगितलेल्या माहितीनुसार, त्याचे त्या मुलीच्या वडिलांशी एका महिन्यापूर्वी भांडण झाले होते, मारहाणी पर्यंत भांडण गेले होते आणि याचाच राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली . हा खुलासा केल्यानंतर मन आणखीनच सुन्न झाले. विकृत मानसिकता कोणत्या थराला जाऊ शकते याचाच विचार सध्या करावा लागतोय. या सगळ्या गोष्टींमध्ये त्या चिमुकलीचा काय दोष होता? खूप काही तिलाही बघायचं होतं, जगाचा आणि तिचा अजून संपर्कही आला नव्हता. या एवढ्या जीवाला किती यातना झाल्या असतील याचा आपण या क्षणी विचारही करू शकत नाही.
अशा अत्याचाराच्या बऱ्याच घटना आज घडताना दिसतात. अशी घटना घडली की, ज्या ठिकाणी ती घटना घडली,त्या गावापासून टीव्ही, मीडियाच्या माध्यमातून देशभर आक्रोश व्यक्त होताना दिसतो. जाळपोळ, आंदोलने, मूक मोर्चा निघतात पण ती घटना लोकांचा विस्मृतीत जात नाही तोपर्यंतच. त्यानंतर ज्या कुटुंबातील ती मुलगी होती त्यांनाच त्या घटनेची वेदना आणि आरोपीला शिक्षा कधी होईल याची काळजी लागलेली दिसते. अशी घटना घडली की प्रत्येक बाईच्या आणि आईच्या मनात कालवाकालव झाल्याशिवाय राहत नाही. आरोपीला आमच्या हातात द्या अशी मागणी करणारे संतप्त गावकरी आणि त्या गावकऱ्यांना कायद्याच्या चौकटी बाहेर जाता येत नसल्याचे सांगत फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून, आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली जाईल असे आश्वासन दिले जात आहे. पण जेव्हा मुलीच्या न्यायाचा विचार करतो,त्यावेळी त्या मुलीवर नराधमाने अत्याचार काही क्षणांमध्ये केला. तिचं हसत खेळत आयुष्य क्षणार्धात संपवलं, मग आरोपीला शिक्षा देण्यासाठी वाट बघावी लागते हीच या घटनेची शोकांतिका वाटते. पण अशा अनेक घटना सातत्याने घडताना दिसतात. आणि काही दिवसांत या सगळ्याचा आपल्याला देखील विसर पडताना दिसतो.
पण या सगळ्यांचा विचार करताना मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो. प्रत्येक मुलीने झाशीची राणी बनायला हवे, असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात अशा घटना घडताना दिसल्यावर स्वतःलाही काही वेळेस असुरक्षित वाटायला लागतं. एक लहान मुलगी जी भातुकलीचा खेळ मांडून बसली होती.पण काही क्षणात आपल्या आयुष्यातच खेळ होणार आहे आणि यापुढे कुठलाच खेळ आपल्याला खेळता येणार नाही, याची त्या चिमुकलीला थोडीशीही कल्पना नसेल. नराधमाने काही क्षणांत तिच्या आयुष्याची, तिच्या स्वप्नांची राख रांगोळी केली आणि ती या जगातून कायमची निघून गेली. पण एखाद्या देव दुतासारखी सर्व पालकांचे डोळे उघडून गेली. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, आपल्या कामाच्या व्यापात आपले आपल्या मुलांकडे किती लक्ष आहे यावर विचार करण्यास आज भाग पडले आहे. लहान मुले खेळत असताना त्यांच्यापाशी वडीलधाऱ्या व्यक्ती जवळ असाव्यात का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
तीन वर्षाच्या मुली सोबत घडलेली ही घटना आणि तिच्यावर झालेल्या अत्याचार हा खरे तर समाज मनावर झालेला अत्याचार आहे. तीन वर्षे ही मुलगी ज्या घरात खेळली बागडली, तिच्या घरामध्ये असणाऱ्या वस्तू, तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं वावरणं या प्रत्येक गोष्टीची आठवण तिच्या कुटुंबीयांना कधीही स्वस्थ बसू देणार नाही. एवढ्या लहान वयापासून चिमुकल्याना आता कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचं नाही हे प्रत्येक आई-वडिलांनी शिकवायची वेळ आली आहे. लहान लेकरांच्या बोलण्याला बालिश न समजता, वेळ देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे व स्व संरक्षणाचे धडे देण्याचा विचार केला पाहिजे याच गोष्टी ही घटना सांगून जाते. आपल्या आसपास घटना घडत नाही, तोपर्यंत त्याची दाहकता लक्षात येत नाही. मुलगी आपली असो किंवा दुसऱ्याची, ती आहे म्हणून जग आहे याचा कुणाला कधीही विसर पडता कामा नये. पण बदल्यासाठी ,हव्यासापोटी त्या कळ्यांना कुस्करण्याचा अधिकार कोणी दिला या नराधमांना? हा प्रश्न समाजातील प्रत्येकाने विचारायला हवा. या आणि अशाच घटनांमुळे मुलींना बाहेर शिकण्यासाठी पाठवण्याचे धाडस पालकांना करावेसे वाटत नाही, मुलींमध्ये काहीतरी बनण्याची जिद्द असतानाही. यासारख्या घटना होऊ नयेत यासाठी काय करावे, काय केले पाहिजे याचा विचार करताना मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबरच मुलांवरही तेवढेच संस्कार करणे गरजेचे आहे. मोबाईलचा वाढता वापर आणि मोबाईलवर मुले नक्की काय बघतात हे पाहणे देखील पालकांचे कर्तव्य आहे. मन निर्मळ असण्याकरता लहानपणापासूनच मुलांच्या मनावर संस्कार केले पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारची विकृत मानसिकता तयार होणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
मी एवढी असुरक्षित का? या प्रश्नाचे उत्तर कधी आणि कशाप्रकारे भेटेल माहिती नाही. त्यामुळे आरोपीला एवढी कठोर शिक्षा मिळावी की ती शिक्षा पाहून असे कृत्य करण्याचा विचार मनात येणाऱ्याला दहशत बसेल. त्यामुळे या घटनेनंतर तर चिमुकल्यांना एकट्यांना न सोडता त्यांच्यासोबत राहूया आणि या चिमुकलिला न्याय मिळावा अशी अपेक्षा करूया.

Comments
Post a Comment