Skip to main content

गावाकडची ओढ समजण्यासाठी लेखक 'गोपाल नीलकंठ दांडेकर ' यांचे 'माचीवरला बुधा ' हे पुस्तक नक्की वाचा . Short summary in marathi

                   लेखक 'गोपाल नीलकंठ दांडेकर ' यांचे 'माचीवरला बुधा ' या पुस्तकाचा सारांश 


                                                       गावाकडील एक संकलित छायाचित्र

      गाव आणि शहरातील जीवन यामध्ये खूप फरक असतो. आणि मुंबईसारख्या शहराचा विचार करत असताना तर त्यामध्ये खूपच अंतर जाणवते. ज्यावेळी या पुस्तकाचे शीर्षक वाचले 'माचीवरला बुधा ' त्यावेळी मनात प्रश्न आला की, नक्की या पुस्तकामध्ये काय असेल. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत  'बुधा ' या पात्राने जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी देत एक वेगळे नाते निर्माण केले . लहानपणापासून मुंबई दिवस काढलेला 'बुधा ' यावेळी म्हातारपणी आपल्या गावाकडे जाण्याचे  ठरवतो आणि गावाकडे पोहोचण्याच्या  अगोदर असंख्य प्रश्न तो स्वतःच्या मनाला विचारताना दिसतो. हे पुस्तक वाचत असताना समजते की,'माची ' हे बुधाच्या गावाचे नाव आहे.

     बुधाचे 'माची ' हे गाव, त्या गावाशी  त्याची एक वेगळी नाळ जोडली असल्याचे जाणवते. तो ज्यावेळी गावात येतो, त्यावेळी सुरुवातीला दिसणारे डोंगर श्रीवर्धन, टेमलाईचा पठार, मनरांजेण  या गोष्टीची जिथल्या तिथे आहेत का असे  प्रश्न देखील तो गावाकडे येत असताना त्याच्या मनात चाललेले असतात. तो गावाकडे डोंगरातून जाणाऱ्या रस्त्याने जाताना येणाऱ्या जाणाऱ्यांना पण सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत का याबद्दल विचारत असतो. म्हणजे त्याला गावाकडच्या गोष्टी आणि त्याचं त्यामध्ये गुंतलेलं मन याविषयी त्याला पडलेल्या या प्रश्नातूनच याठिकाणी जाणवते. बुधा बरीच वर्षे मुंबईत राहून त्याने गोदीत त्याचप्रमाणे भायखळा स्टेशनवर हमाल म्हणून काम केलेले असते. अनेक वर्षे कष्टाची कामे करून शरीर थकून गेलेले असते. एका डोळ्यात फुल पडलेले असते आणि पहिल्यासारखं डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे कामही कमी होते. त्याचा असणारा मुलगा भिवा ही गिरणीत कामाला लागलेला असतो, त्याचे लग्नही झालेले असते. त्यामुळे मुलाचीही आता कोणतीही  काळजी राहिलेली नसते. डोळ्यांना दिसत नसल्यामुळे घरात  थांबणे, नुसते बसून राहणे त्याला नकोसे झालेले असते. आणि त्यामुळे मनाशी ठरवून तो आपल्या मुलाला, '  माझं मन या ठिकाणी अजिबात रमत नसल्याचे  आणि दिवसभर मोकळा बसून दिवस जात नाही त्यामुळे माचीला मी जाणार असल्याचे सांगतो'. त्याची सूनही समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण बुधाचा  गावाकडे जाण्याचा निर्णय पक्का झालेला असतो. सुन आणि चाळीतले सर्वजण पुरणपोळीचा स्वयंपाक करून बुधाला निरोप देतात.

         पुढे गावात आल्यानंतरही अनेक जण बुधाला अचानक कसे आलात याबद्दल विचारतात.  परत मुंबईला कधी जाणार असे विचारल्यानंतर आता मी या ठिकाणीच राहणार असल्याचे तो  सांगतो आणि टेमलाईच्या पठारावर भात पेरून पडीक असलेली शेती पुन्हा सुरू करणार असल्याचे सांगतो. तो गावाकडे येत असताना निसर्गाचे ,निसर्गातील वृक्षांचे केलेले निरीक्षण आणि वर्णन वाचकाला बुधाच्या माची या गावात घेऊन जाते. बुधा स्वतःला डोंगरी संबोधतो आणि शहरात राहणं मनातून बरं वाटत नसल्याचाही उल्लेख करतो. ज्या मातीत जन्माला आलोय, त्या मातीतच आपला शेवट झाला पाहिजे असे ठरवून बुधा गावाकडे परत आलेला  असतो. बुधा गावातील  त्याच्या घरातून आवश्यक असणारे साहित्य घेऊन टेमलाईच्या पठारावर राहायला जातो. रहायला झोपडीवजा घर तयार करून त्या ठिकाणीच रहायला सुरुवात करतो. एकटाच शांत निसर्गाच्या सामन्यात प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीचा आनंद तो घेताना दिसतो . तो भात पेरून घेतो, त्यानंतर भात काढतो आणि कष्टातील आनंदाची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येत नसल्याचे तो  काही वाक्यातून आपल्याला शिकवून जातो. पठारावर असणारी झाडी, त्या ठिकाणचे सौंदर्य, पक्षी, प्राणी ,निसर्गातील शांतता आणि या सगळ्या वातावरणात एकटा राहत असलेला बुधा, त्याच्या प्रत्येक दिवसात घडणाऱ्या असंख्य गोष्टी त्याचे  आयुष्य आनंदमय करताना दिसतात. त्यामुळे बुधा शहरात राहत असताना त्याचा दिवस जात नव्हता पण गावाकडे मात्र त्याला दिवस संपल्याचेही लक्षात येत नसल्याचे जाणवते. 

        तो त्या पठारावर राहत असताना अनेक गोष्टी घडत असतात. पण रोजच्या घटनांमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या विमानाची वाट बघणे त्याला खूप आवडत असते. त्याचप्रमाणे खारुताई, तिची पिल्ले, रोज दारापाशी येणाऱ्या चिमण्या आणि त्या सर्वांना तो रोज काही ना काही खायला देत असल्याने सतत एका ठराविक  वेळी झोपडीपाशी येत असल्याचे दिसते. बुधाला त्यांची सवय झाली होती आणि त्यांनाही बुधाची सवय झाली होती. पुढे पुढे काही दिवसांनी सोबत असावी म्हणून बुधाने गावातून एक कुत्रेही आणि एक बकरी आणली. त्यांच्या पोटाची काळजी घेणे हेच  बुधाचे एक महत्त्वाचे काम होऊन बसले होते. पुढे त्याने आणलेल्या बकरीला दोन पिल्ले होतात आणि त्याचा कामाचा व्याप आणखीनच वाढताना दिसतो. त्याचे सर्व काम करून झाल्यावर उरलेल्या वेळेमध्ये निसर्गामधील प्रत्येक गोष्टीचा तो आनंद घेत असतो,प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करत असतो आणि त्यातून मिळणारा आनंद खूप काही शिकवून जातो. बदलणाऱ्या प्रत्येक ऋतूनुसार बुधा देखील स्वतःमध्ये बदल करत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्ट नित्य नियमाने करण्याची त्याची सवय खूप वेगळा विचार करायला भाग पाडते. तो  प्रत्येक गोष्ट ठरल्याप्रमाणे करत असतो आणि अगदी आनंदात त्या पठारावर त्याच आयुष्य चालेलल असतं. पुढे काही दिवसांनी त्याचा मुलगा भिवा त्याच्या वडिलांना न्यायला येतो. बायको काहीतरी कामानिमित्त बाहेर जात असते आणि त्यावेळी पाठीमागे घराला राखण म्हणून आपल्या सासऱ्यांना आणा म्हणून तिने सांगितलेले असते. आणि त्याच करता तो वडिलांना न्यायला आलेला असतो. सुरुवातीला बऱ्याचशा गोष्टी मुलगा आपल्या वडिलांना सांगत असतो आणि पठारावरच्या अनेक गमती जमती वडील मुलाला सांगत असतात. पण ज्यावेळी निघण्याचा दिवस येतो त्यावेळी मात्र बुधा  पुन्हा शहराकडे जायला नकार देतो आणि तो  या ठिकाणीच राहणार असल्याचे मुलाला सांगतो. 

        पठारावरील प्रत्येक दिवस एक वेगळी कहाणी घेऊन येत असते आणि बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. एके दिवशी त्यांनी आणलेल्या कुत्र्याला बिबट्या फाडून टाकतो. भुताला त्या कुत्र्याची खूप सवय झाली असती. आणि ही घटना घडल्यानंतर खूप काहीतरी मोठं हरवल्यासारखं त्याला जाणवू लागते. या घटनेनंतर काही दिवसांनी एक म्हातारी म्हैस त्याच्या झोपडीच्या दारापाशी येऊन थांबते. ती खूप म्हातारी झालेली असते, त्यामुळे तिचा फारसा उपयोग होत नसल्याने तिच्या मालकाने बहुतेक तिला सोडले असेल असा अंदाज बुधा बांधतो. त्या  म्हैशीचीही  तो  खूप काळजी घेतो. पुढे एका रात्री ती म्हैस दर्डीखाली अडकलेली असते. तिच्या ओरडण्याचा आवाज बुधाला येतो. दिवसही पावसाळ्याचे असतात, त्यामुळे प्रत्येक दगडावर शेवाळ साठलेले असते. तो  त्या म्हैशीला  वाचवण्यासाठी तिच्यापाशी जातो पण शेवाळलेल्या दगडातून घसरत खाली जातो. अंगाला खूप खरचटलेले असते आणि त्यातच तो बेशुद्ध होऊन  पडलेला असतो. शुद्धीवर आल्यानंतर रक्ताळलेल्या शरीराने तो  झोपडीत येऊन बसतो. पण दुसऱ्या दिवशी उठण्याची ताकदही त्याच्या शरीरात राहत नाही. अंगातून प्राण निघून गेल्यासारखे त्याला वाटू लागते . तशाच झोपलेल्या  अवस्थेत तो  त्या ठिकाणी एकटाच पडून राहतो. दुसऱ्या दिवशी खारी, त्यांची पिल्ले, बकरी सर्वजण भुकेसाठी ओरडत असतात; पण त्यांना खाऊ घालणारा त्यांचा मालक शांत झोपलेला असतो आणि त्याच्या शरीराला मुंग्या लागलेल्या असतात. 

       अशाप्रकारे बुधाची गावाकडची ओढ आणि या कादंबरीचा शेवट आपल्याला एका वृद्ध माणसाच्या भावविश्वात नक्कीच घेऊन जातो. प्रत्येक माणसाची काहीतरी स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांसाठी तो जगत असतो. पण एक वय झाल्यानंतर, त्याच्यासोबत कोणी नसताना आपली  स्वप्न , आपलं आयुष्य जगणं यामध्ये किती धाडस असतं हे या पुस्तकाच्या वाचनाच्या निमित्ताने लक्षात येते. त्याच्यासोबत त्याचं कुटुंब असतं तर तो आनंदी जीवन तर जगला  असता पण त्याचबरोबर तो जिवंत राहिला असता याची खंतही शेवटी वाटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही कादंबरी जरी काल्पनिक असली तरी वास्तवाशी जोडून ठेवणारी आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...