Skip to main content

"६५ वर्षांच्या आजी कराडात रिक्षा कशा काय चालवतात? नांदगावच्या मंगल आजी "

        

                        ६५ वर्षांच्या आजी कराडात रिक्षा कशा काय चालवतात? 



                                    ' मंगल आबा आवळे ' आजी

         

       आपण आजूबाजूला कितीतरी व्यक्ती बघत असतो, त्यांचे अनुभव ऐकत असतो, आणि प्रत्येक वेळेस यातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आपल्या आसपासची प्रत्येक गोष्ट पुस्तकातून न मिळणारे ज्ञान देऊन जाते. पुस्तकाचं वाचन अनेकजण करतात पण त्याचप्रमाणे आसपासच्या माणसांनाही आपण कधीतरी वाचतो का? मला जेव्हा काही वेळ मिळतो त्यावेळी मी अनेक प्रेरणादायी व्यक्तींचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करते. यातूनच एके दिवशी 65 वर्षांच्या रिक्षा चालवणाऱ्या आजींशी मला गप्पा मारता आल्या आणि त्यातून मला जी प्रेरणा मिळाली त्याविषयीचा हा लेख आहे.

       मला सगळ्यात जास्त पुस्तक वाचायला आवडते आणि त्यातूनही अधून मधून मोबाईल पण चेक करत असते, कशासाठी तर अपडेट राहण्यासाठी, तसेच पुस्तक वाचताना कधीतरी झोप येत आहे असे वाटले तर. त्यादिवशी पण तसाच काहीसा  अनुभव येत होता मग मी  मोबाईल हातामध्ये घेतला आणि काही व्हिडिओ बघत बसले. बघता बघता एका व्हिडिओ पाशी आल्यावर मी अचानक थांबले कारण तो व्हिडिओ होता एका 65 वर्षांच्या आजीचा ,ज्या या वयातही रिक्षा चालवतात. मला त्या आजीचं खूपच कौतुक वाटलं कारण एवढ वय  झाल असताना त्या रिक्षा चालवण्याच धाडस करत होत्या, हेच त्यातलं वेगळेपण होतं. मग त्यानंतर मी थोडीशी चौकशी करून त्या आजींचा नंबर मिळवला आणि त्यांची परमिशन घेऊन त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, त्या जेथे रिक्षा घेऊन थांबलेल्या  असतात तेथे गेले. आणि त्यांचा प्रवास मी जशी अपेक्षा केलेली त्याहीपेक्षा संघर्षमय त्याचप्रमाणे प्रेरणादायी वाटला. 

        त्या आजींचे नाव  'मंगल आबा आवळे ' भिकवडी हे त्यांचे माहेर आणि नांदगाव हे सासर. त्यांच्याकडून बोलताना जी माहिती मिळाली त्यानुसार, त्यांच्या  लहानपणी घरची परिस्थिती खूपच गरिबीची होती आणि त्यातच 72 सालचा दुष्काळ. या दोन्ही गोष्टीमुळे त्या जास्त शाळा शिकू शकल्या नाहीत. घरची गरीब  परिस्थिती आणि दुष्काळ या दोन्ही गोष्टीमुळे फक्त सहा महिने त्या  शाळेत गेल्या आणि त्यानंतर अनुभवाच्या शाळेतच त्या शिकू लागल्या ,कष्ट करू लागल्या. परिस्थितीत कशी असली तरी कष्ट करून पोट भरण्याची धडपडता लहानपणापासूनच करत होत्या. आजची परिस्थिती आणि त्यांच्या काळातली परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे परंतु ;त्या काळातील लोकांच्या मनात असणारी  जिद्द खूप काही शिकवते. कष्ट करण्याची जिद्द, जगण्याचा एक आत्मविश्वास जो त्या लोकांकडे होता, तो आपल्यासारख्या सध्याच्या तरुण पिढीतही फारच कमी दिसून येतो.म्हणूनच अशावेळी अशा लोकांच आयुष्य जाणून घेऊन त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची गरज निर्माण होते. पूर्वीच्या प्रथेप्रमाणेच अठरा वर्षांच्या वयात त्यांचे लग्न झाले आणि त्या नांदगावात आल्या. लग्नानंतर ही घरच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नव्हता, माहेरी असणारी गरीब परिस्थिती ,सासरी ही तशीच होती. दुसऱ्याच्या रानात भांगलून,रोजगार करून स्वतः चार मुलांचा आणि नवऱ्याचा त्या सांभाळ करायच्या. माहेरी दिवस कष्टात गेले पण सासरी आल्यावरही हातातील खुरपे सुटायला तयार नव्हते, तरीही आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी त्यांचे धडपड चालत होती. नवऱ्याला व्यसन असल्यामुळे चाळीस वर्षे वय झाल्यानंतर तो त्यांच्या आयुष्यातून निघून गेला. पण या सगळ्या परिस्थितीत सासू सासऱ्यांचा त्यांना वेळोवेळी आधार मिळत होता. त्यातूनच त्या प्रत्येक गोष्ट जिद्दीने करत होत्या. त्यातूनच त्या, येणारा प्रत्येक दिवस पुढे ढकलत. घरची  बेताची परिस्थिती असतानाही आपल्या मुलींचे लग्न त्यांनी लवकरच लावून दिले आणि पुढे मुलाचेही लग्न झाले. पण एवढे दिवस संसार करत असताना त्यांचे असणारे  घर चार माणसे घरात राहू शकतील असं नव्हते. 

           मग त्यांच्या मुलाने कर्ज काढून चांगले घर बांधले आणि कर्जावरच एक रिक्षाही घेतली. घरच्या परिस्थितीमुळे सगळीच मुले अत्यंत समजदार स्वभावाची होती .त्यामुळे जास्त शिकत न बसता, मुलगा एसटी बस ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. पण एकट्याने हे सगळं कर्ज फेडणे अवघड जात होते. कर्जावर घेतलेली रिक्षा घरासमोर तशीच पडून होती. मुलगा बस ड्रायव्हर म्हणून काम करताना त्याला रिक्षा चालवणे जमत नव्हते. आजीही तशाच बसून होत्या. एका दिवशी त्यांच्या मनात विचार आला, असे घरात रिकामे बसून राहण्यापेक्षा मुलाच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आणि दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी आपणच मुलाकडून रिक्षा चालवायला शिकावे. त्यांनी लगेच तो विचार आपल्या मुलापाशी बोलून दाखवला. आईच्या प्रमाणेच जिद्दी असणारा मुलगा, क्षणाचाही विचार न करता आपल्या आईला रिक्षा चालवायला शिकवायला तयार झाला. सुरुवातीला मुलाच्या हातावर हात ठेवून, त्याच्या पायावर पाय ठेवून ब्रेक मारायचा कसा, गाडी सुरू कशी होते या सगळ्या गोष्टी त्यांनी समजावून घेतल्या. आजी  मनव,नांदगाव ,शिरंबे या गावांमध्ये जास्त गर्दी असत नाही, अशाच रस्त्यावर  त्या रिक्षा चालवू लागल्या. आणि अवघ्या तीन दिवसात त्या रिक्षा चालवायला शिकल्यासुद्धा. सुरुवातीला त्यांना भीती वाटत होती परंतु; मुलाने त्यांना आत्मविश्वास दिला आणि तू तुझ्या मार्गाने निघालीस तर काही काळजी करण्याची गरज नसते असेही त्याने सांगितले. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने वाहने चालवत असतो त्याच्यामुळे आपण आपल्या वाहनावर लक्ष ठेवले तर कोणताही धोका होत नाही. अशा पद्धतीचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे वाहतुकीचे असणारे सर्व नियम सुद्धा आजींनी आपल्या मुलाकडून आत्मसात करून घेतले. 

            त्या रिक्षा चालवायला शिकल्या असल्या तरी, सुरुवातीला आपल्या मुलाला मागे बसवून त्या रिक्षा चालवत असत. एके दिवशी मुलाचा डबा घरी विसरला आणि आईने तो डबा कराड बस डेपोला आणून द्यावा असे सांगितले. मग त्यावेळी आजी एकट्या रिक्षा घेऊन बाहेर पडल्या, रस्त्यावर गर्दी असतानाही त्या डबा घेऊन डेपोला पोहोचल्या. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांना आत्मविश्वास आला. मग त्या जवळपास असणाऱ्या रस्त्यावर रिक्षा चालवण्याचा सराव करू लागल्या. सुरुवातीला तर खूप गमतीदार प्रसंग त्यांना येत असत. कारण बरेचदा रिक्षा कोण चालवणार असा प्रश्न अनेक जण त्यांना विचारत. मग जेव्हा काही मुलींना घेऊन त्या जाऊ लागल्या त्यावेळी मात्र आजी रिक्षा चालवतात हे सगळ्यांना समजले. प्रत्येक रिक्षावाल्याची जागा ठरलेली असायची पण सुरुवातीला हे माहीत नसल्यामुळे आजी त्या ठिकाणी जायच्या आणि तेथे असणारी पॅसेंजर आपल्या रिक्षात बसवायचा. अनेक चांगल्या लोकांनी ही गोष्ट त्यांना समजावून सांगितली आणि मग मात्र त्यांनी एक रूट फिक्स केला, कॉलेज ते बनवडी असा तो रूट आहे. सकाळी साडेनऊ ते सहा त्या रिक्षा चालवतात आणि दिवसाला पाचशे ते सहाशे रुपये कमावतात. आरटीओ साहेबांनी त्यांना बोलावून ड्रायव्हिंग लायसन्स मिळवून दिले. 

         आपल्या मुलाच्या संसाराला हातभार लावावा आणि घरात बसून राहण्यापेक्षा काही तर करावे हा विचारच आजींना सगळ्यांपेक्षा वेगळा बनवतो. 65 वर्षांच्या या आजीने दाखवून दिले आहे की माणसाच्या मनात काहीतरी करण्याची इच्छा असेल तर तो कोणत्याही वयात, कधीही,काहीही करू शकतो आणि कोणतीही गोष्ट शिकू शकतो. त्यांचा आयुष्यच प्रेरणा देणारे आहे. कारण आपण आजही कोणती गोष्ट करायला निघालो की, अनेक कारणे सांगत असतो पण वयाचाही विचार न करता रिक्षा चालवणाऱ्या आजी नक्कीच काहीतरी नवीन शिकवतात. आजही त्या रूटला तुम्ही गेला तर त्या आजी तुम्हाला रिक्षा चालवताना दिसतील. 

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...