Skip to main content

"उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंची दाहकता परिस्थितीनुसार जाणवते का? "

        


            समाजात वावरताना श्रीमंत गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आढळतात. तिन्ही वर्गातील व्यक्तींच्या आयुष्यात खूप फरक असतो आणि प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. एखादी कोणतीही गोष्ट समोर ठेवली आणि प्रत्येक व्यक्ती त्याकडे कशा पद्धतीने बघते हे जर पाहिले तर, खूप मोठ्या प्रमाणावर फरक दिसून येतो. आता हा फरक बघायचं असेल तर बदलणाऱ्या ऋतूंमध्ये,प्रत्येकाच्या आयुष्यात कशाप्रकारे बदल होतो, हे आपण आजच्या लेखामध्ये बघणार आहोत. 

    सुरुवातीला तर बघूया, उन्हाळा. गरीब लोक आणि श्रीमंत लोक यांच्यासाठी उन्हाळ्यातील अनुभव वेगवेगळे असतात. ज्यावेळी उन्हाळा येतो, तो कडक ऊन घेऊन येतो. वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढते आणि त्या ऋतू नुसार राहणीमानात बदल जाणवू लागतो. पण प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की बदल दिसतो का? किंवा तो कसा असतो? गरीबी असणाऱ्या लोकांसाठी उन्हाळा म्हणजे सूर्यप्रकाशाला आपला सोबती बनवल्या सारखे असते. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे, काम केल्याशिवाय, रात्रीची चूल पेटणार नाही याची त्यांना जाणीव असते. उन्हाळा आला आणि तापमान जास्त वाढले की, कोणतेही महत्त्वाचे काम असले तरीही आपण सहसा घराबाहेर पडत नाही. पण दुसरीकडे अशा वातावरणातही ते लोक कामासाठी, मजुरीसाठी, पोटासाठी बाहेर पडतात. सकाळपासून अगदी अंधार होईपर्यंत त्यांचे काम चालू असते. उन्हामध्ये काम करत असल्यामुळे घामाच्या धारा लागलेल्या असतात पण काम करण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय त्यांच्याकडे नसतो. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू असेल तर, लहान- लहान लेकरांना घेऊन काम करणारे सर्वजण उन्हातच धडपडत असतात. तहान लागली तरीही थंड पाणी पिण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. कुठून तरी पाण्याचा घोट मिळाला तरी आपली तहान शमवून आपल्या कामाला ते सुरुवात करतात. जास्त उन्हामुळे आपल्या जीवाला काहीतरी होईल, ऊन जास्त लागते आहे म्हणून काम करायचे नाही असे ठरविले तर घरच्यांना उपाशी झोपावे लागेल हीच काळजी त्यांना लागलेली असते. दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करणारे, घराचे बांधकाम करणारे गवंडी आणि विक्रेते तसेच गरिबीत आयुष्य जगणारे बरेच जण आपली स्वतःची काळजी न करता उन्हामध्येच काम करताना दिसतात. एवढं कष्ट करून आपल्या झोपडीवजा घरी गेल्यानंतर थंड पाणी प्यावे असे वाटले तरीही, थंड पाणी त्यांना प्यायला देखील मिळत नाही. मोठ्या प्रमाणात उकाडा असला तरीही पंखा आणि कुलर नसल्याने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर करत झोप लागल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. काही वेळा उन्हात सतत काम केल्यामुळे उष्माघाताचा धोकाही त्यांना संभवतो आणि पैसे नसल्याने योग्य ते उपचार त्यांना मिळत नाहीत. ऊसतोड कामगार म्हणून काम करणारे अनेक जण ऊन जास्त लागते या कारणासाठी ऊसतोड थांबवत नाहीत. काही दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणी न मिळाल्याने आणि उन्हाचा चटका बसल्याने अनेक जण दगावल्याच्या घटनाही वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. 

       आणि दुसरीकडे श्रीमंतांसाठी हा ऋतू वेगळाच अनुभव घेऊन येतो. बाहेर कितीही ऊन असले तरी एसी असणाऱ्या, कुलर, फॅन असणाऱ्या खोलीमध्ये असणाऱ्या या लोकांना उन्हाचा दाह अजिबात जाणवत नाही. त्याचप्रमाणे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी थंड पेये आणि विविध फळे ते खात असतात. उन्हाळा म्हणजे सुट्टी आणि सुट्टीच्याच दिवसात अनेक थंड हवामानाच्या ठिकाणी फिरून यायचे मनसूबे हे लोक आखताना दिसतात. वेगवेगळी लोशन्स, डोक्यावर टोपी आणि फिरण्याची ठिकाणे या सगळ्यामुळे त्यांचा उन्हाळा आल्हाददायक असतो.

      आता दुसरा ऋतू म्हणजे पावसाळा आणि गरिबीत आयुष्य जगणाऱ्या लोकांसाठी उपासमारीचा काळ. पावसाळ्यात या लोकांचे आयुष्य विस्कळीत होऊन जाते. पाऊस सतत चालू असला की कामावर जाता येत नाही आणि काम नसल्यामुळे पोटाची आग कशी शमवायची याची काळजी त्यांच्या मागे लागलेली दिसते. घरे व्यवस्थित  नसतील तर, गळणाऱ्या प्रत्येक जागी भांडी ठेवून पाऊस थांबण्याची वाट बघत त्यांना रात्र काढावी लागते. पावसामुळे सगळीकडे चिखल झालेला असतो, त्यातच अशा वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा सामनाही त्यांना करावा लागतो. गरिबीत आयुष्यात जगणाऱ्यांसाठी पावसाळा अश्रू घेऊन येतो. श्रीमंत लोकांना कोणत्याच गोष्टीचा सामना करावा लागत नसल्यामुळे, पावसाळा सुरू झाला की गरमागरम भजी तळण्याचा वास दरवळू लागतो आणि चहा पीत-पीत पावसाचा आनंद ते घेत असतात. त्यातूनच उबदार घरात बसूनच पाऊस पडतानाचे क्षण कॅमेरात कैद करून त्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकत असतात. 

      हिवाळा म्हणजे कडाक्याची थंडी. आणि या थंडीचा अनुभव सगळ्यात जास्त कुणाला येत असेल तर तो रस्त्यावर झोपणाऱ्या आणि घर नसणाऱ्या लोकांना. थंडीत आपल्या शरीराला उबदार ठेवता येतील असे स्वेटर  त्यांच्यापाशी नसतात, मग हातमोजे आणि पायमोजे यासारख्या गोष्टी लांबच. थंडी सहन न झाल्यामुळे पक्षाघात किंवा ब्रेनस्ट्रोकचा अनेकांना सामना करावा लागतो. थंडी वाढली की, कधी सकाळ होते आणि  सूर्याची किरणे आपल्या अंगावर पडून, शरीरातील थंडी कमी होतेय याची  ते वाट बघत असतात. श्रीमंत व्यक्ती शक्य असेल तेवढे सर्व उबदार कपडे पांघरतात. घर चांगल्या प्रकारे बंदिस्त असल्याने, बाहेर असणारी थंडी उबदार घरांतील  खोल्यांमध्ये जाणवत नाही. थंड वातावरणात गरम गरम पदार्थ यांचा आस्वाद घेऊन या हिवाळ्यातही ते  आनंदी जीवन जगतात. 

    गरिबी आणि श्रीमंती या दोन्हीच्या मध्ये असणारा मध्यमवर्गीय. येणाऱ्या प्रत्येक  ऋतूमध्ये मध्यमवर्गीय व्यक्ती ना जास्त होरपळतात आणि नाही जास्त आनंदी राहतात. खरे पाहिले तर उन्हाळा आला, पावसाळा आला किंवा हिवाळा आला तर, मलाही ऊन लागते, पाऊस लागतोय आणि थंडी वाजते हे  म्हणताना असणाऱ्या परिस्थितीनुसार  ऋतूची तीव्रता कमी -जास्त प्रमाणात जाणवते, असेच या ठिकाणी म्हणता येईल. फाटक्या कपड्यात वावरणाऱ्या व्यक्ती आणि ऋतूनुसार कपड्यांचे येणारे फॅशन्स यातूनच बरं असं काही समजून जातं. गरिबांसाठी प्रत्येक ऋतू एक परीक्षा असते, त्यांना एक लढा द्यावा लागतो, स्वतःच्या अस्तित्वासाठी. आणि दुसरीकडे श्रीमंतांसाठी प्रत्येक ऋतू, एक त्यांच्या आठवणी जपण्यासाठीचा  ठेवा असतो. गरिबी आणि श्रीमंती ही  बऱ्याचदा कष्टावर आणि नशिबावर अवलंबून असते, तरीही त्यांच्या अनुभवात बराच फरक असतो हे कुणालाही नाकारता येणार नाही.

     

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...