डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील काही निवडक घटना त्यांच्या शब्दात "माझी आत्मकथा " या पुस्तकामध्ये... पुस्तकाचा थोडक्यात सारांश
डॉ. बाबसाहेब आंबेडकर लिखित पुस्तक, " माझी आत्मकथा" याचे मुखपृष्ठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे "माझी आत्मकथा " हे पुस्तक खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला, दीन-दलितांचे कैवारी बनत असतानाचा प्रवास त्यांनी त्यांच्या शब्दांत सांगितला आहे. त्यांचे शब्दच वाचकांना प्रेरणा देऊन जातात. कोणतीही व्यक्ती यशाच्या शिखरावर जात असताना,तिथे पोहोचताना, त्यांना किती गोष्टींचा त्याग करावा लागतो, कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याची आपल्याला कल्पना करता येत नाही. आत्मकथेच्या रूपातील हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणापासून ते रमाबाईंच्या त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या प्रसंगापर्यंत, दलितांचा उद्धारक होण्याचा त्यांचा प्रवास, त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि निवडक मनाला भिडणाऱ्या घटना या पुस्तकात पाहायला मिळतात. आणि हे पुस्तक वाचत असताना त्यांचा विषयी असणारा अभिमान द्वीगुणीत होतो याबद्दल कोणतीही शंका नाही.
सुरुवातीला त्यांच्या आजोबांचे लहान बंधू चौदा-पंधरा वर्षांचे असताना साधूंच्या झुंडी सोबत निघून जातात. आणि २४ वर्षांनी परत येतात, घरी परत आल्यानंतर सर्वजण त्यांना राहण्याची विनंती करतात पण ते राहण्यासाठी तयार होत नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा वीस वर्षांनी आपल्या भावाची भेट घेण्यासाठी ते येतात व अखेरच्या दिवसातही घरातल्यांनी राहण्याचा आग्रह केल्यानंतरही ते राहण्याचे नाकारतात. पण जाण्याच्या वेळेस,' आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उतार उद्धार करील' असे सांगतात आणि त्यानंतर ते कधीच परत येत नाहीत. आणि तिसऱ्या पिढीतील उद्धारक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते स्वतःच आहेत असे नकळत वाटून जाते, याचा उल्लेख सुरुवातीला केलेला आहे. त्यानंतर त्यांच्या जन्माची आणि बालपणाचीही माहिती मिळते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई मरते आणि त्यामुळे सर्व भावंडे आंबेडकरांना वाईट समजू लागतात. आईच्या झाल्यानंतर त्यांची आत्या अतिशय प्रेमाने त्यांची काळजी घेतात. याच प्रेमापोटी शाळेत न जाता कुठलेही काम करायला ते जाऊ लागतात, यावेळी मात्र त्यांचे वडील आपल्या मुलाला सावलीतले काम करण्याविषयी सांगतात.
वडील फौजी असल्यामुळे आणि कडक शिस्तीचे असल्याने लहानपणापासून काही ठराविक गोष्टी त्यांना कराव्या आणि ऐकाव्या लागत होत्या. अस्पृश्य असल्यामुळे लहानपणापासूनच काही अनुभव त्यांना येत होते आणि त्यांच्या मनावर परिणाम करत होते. ते शाळेत जात असताना त्यांना संस्कृत विषयाचा अभ्यास करायचा होता पण शिक्षकाने अस्पृश्याच्या मुलाला संस्कृत विषय शिकवणार नसल्याचे सांगितले, मग त्यांनी पर्शियन भाषेचा अभ्यास केला. पण यामध्ये एखादी भाषा शिकण्यासाठी जात आडवी येते, असा अनुभव त्यांना लहानपणीच शाळेमध्ये आला. घरातील वातावरण सुशिक्षित असल्याने आणि वडिलांचे त्यांच्याकडे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष असल्यामुळे त्यांनी पुढे सांगितले कायापालट केला असेच म्हणावे लागेल. या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे आंबेडकरांच्या वडिलांना गणिते सोडवण्याचा खूप नाद होता त्याचप्रमाणे इंग्रजी विषयामध्ये सुद्धा खूप आवड होती. त्यामुळे लहान वयातही तर्खडकरांची तीन पुस्तके त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठ करायला सांगितली होती, त्यामुळेच आंबेडकर पुढे म्हणतात की, 'मी जे काही इंग्रजी चांगले बोलतो ते त्यामुळे शक्य झाले आहे असे वाटते.' दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीपासूनच साहित्य वाचनाची, लेखनाची खूप आवड होती. शाळेत असताना अभ्यासाची पुस्तके न वाचता ते अवांतर पुस्तके वाचत असायचे आणि हे आवड पुढे वाढतच गेली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची, गरिबीची असतानाही, आंबेडकरांनी कोणत्याही पुस्तकाची मागणी केली की, त्यांचे वडील काहीही करून ते पुस्तक त्यांना वाचायला आणून देत. यातून एका वडिलांचा आपल्या मुलाच्या यशात असणारा वाटाही लक्षात येतो. पुस्तकाचे महत्व लहानपणापासूनच त्यांना जाणून लागले होते, त्यामुळे वाचनाची एक विलक्षण आवड त्यांच्यामध्ये विकसित होत गेली. वाचताना त्यांची एका एकाग्रता एवढी होती की, कोणत्या पानावरती काय संदर्भ आहे हे आंबेडकर अचूक सांगत होते. वडिलांच्या संस्कारामुळे आणि घरातील सुशिक्षित वातावरणामुळे बऱ्याच चांगल्या गोष्टी लहानपणापासूनच त्यांच्या मनावर बिंबल्या होत्या याची वर्णनही या पुस्तकात आंबेडकरांनी केले आहे. आंबेडकर बी.ए. ला असताना, सकाळचा अभ्यास लक्षात राहतो म्हणून त्यांना पहाटे दोन ला उठवण्यासाठी रात्रभर जागे राहणारे वडील कायम लक्षात राहतात.
अस्पृश्य समजला जाणाऱ्या लोकांवर कशा पद्धतीचा अन्याय, अत्याचार होतोय याची जाणीव त्यांना वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर, ज्यावेळी ते सर्वजण राहायला साताऱ्याला आले त्यावेळेस पहिल्यांदा झाली. वडील तलाव बांधण्याचे काम करणाऱ्या मजुरांना पैसे वाटण्याचे काम करीत होते आणि वडिलांना भेटण्यासाठी निघाल्यावर ते सर्वजण महार असल्याचे समजल्यावर कोणीही गाडीवर त्यांना सोडण्यासाठी तयार होत नव्हता. एक गाडीवान तयार झाला पण तो गाडी चालवणार नसल्याची त्याने अट घातली आणि पुढे आंबेडकरांनी गाडी स्वतः चालवली. त्या गाडीवानाने एका नाल्याजवळ त्यांना जेवायला सांगितले आणि पुढे पाणी प्यायला मिळणार नाही असेही सांगितले. त्यावेळेस त्यांना जेवल्यानंतर अस्वच्छ पाणी प्यायला लागले. या पहिला प्रसंगातून अस्पृश्यांचे दुःख आणि हाल - अपेष्टांची जाणीव आंबेडकरांना तीव्रतेने झाली. या त्यांच्या आत्मकथनात, त्यांचे आडनाव आंबावडेकर असे होते परंतु एका ब्राह्मण शिक्षकांनी ते बदलून आंबेडकर केल्याचाही उल्लेख आहे. त्या शिक्षकांच्या त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमाचीही प्रचिती यावेळेस येते. पुढील बी.ए. पास झाल्यानंतर, बडोद्याला नोकरीसाठी गेल्यावर ११ दिवसात त्यांच्या वडिलांची तब्येत खालावते आणि आपल्या मुलाला डोळे भरून पाहून, प्रेमाने अंगावरून हात फिरवून ते प्राण सोडतात. शिक्षण घेतल्यानंतर समाजात वावरत असताना स्पृश्य लोकांवर अस्पृश्य लोक किती अन्याय, अत्याचार करत होते याची जाणीव त्यांना क्षणोक्षणी होत होती. अस्पृश्यांना स्पृश्य लोकांवर सावली पडू नये म्हणून वळसा घालून जावे लागत होते, रस्त्यावर थुंकू नये यासाठी गळ्यात गाडगे अडकवावे लागत होते, ते अस्पृश्य आहेत हे ओळखता यावे यासाठी हातात काळा दोरा बांधावा लागत होता. यांच्या हक्कांसाठी पुढे आंबेडकरांनी लढा दिला त्याचेही वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे.अनेक सत्याग्रह केले, राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये अस्पृश्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविला,अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आणि हक्काची जाणीव करून दिली.
भारतीय राज्यघटना तयार करताना अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्याचा विचारही त्यांनी केला. एखाद्या जनावराप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या लोकांना स्वातंत्र्याची, प्रगतीची दारे उघडी करून दिली. हा लढा चालू असताना महात्मा गांधीजीशी अनेकदा वादविवाद झाल्याचेही आंबेडकर यात सांगतात. त्यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली, भारतीय राज्यघटना तयार केली, आपल्या शिक्षणाचा दलितांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज यांची स्थापना केली कारण शिक्षणाशिवाय बदल होणार नाही याची त्यांना जाणीव होती. कुणी काहीही सांगितले तरीही आपल्या स्वतःच्या बुद्धीला पटल्याशिवाय, ती गोष्ट मान्य करू नये असे सांगत अनेकवेळा आपल्या बांधवांना नेहमी मार्गदर्शन केले. पुढे बौद्ध धर्माशिवाय देशाची, समाजाची, व्यक्तीची प्रगती होणार नाही यासाठी आपल्या बांधवांना सोबत घेऊन धर्मांतरही केले. या पुस्तकात गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले यांना गुरू मानल्याचे आणि विद्या, विनयशीलता आणि शिलसंवर्धन यांना उपास्य दैवते मानल्याचेही सांगितले आहे. आपली पत्नी रमाबाई यांचा त्याग, त्यांचे प्रेम त्यांची सोबत यामुळेच त्यांना आपल्या बांधवांना न्याय देता आला असा संदर्भ या पुस्तकात आहे. तसेच रमाबाईंच्या जाण्यानंतर आणि दुखणे वाढू लागले आहे असं जाणवल्या नंतर एका ब्राह्मण नर्स शी त्यांनी दुसरा विवाह केला. आपल्या बांधवांसाठी लढायचे आहे आणि तब्येतीची काळजी घ्यायला कुणीतरी पाहिजे यासाठीच त्यांनी लग्न केले. अशा प्रकारे असंख्य घटना , अनुभव, त्यांची भाषणे, बौद्ध धर्माचा त्यांनी केलेला स्वीकार आणि प्रसार, त्यांनी आपल्या समाजबांधवांना दिलेला संदेश, त्याची विनम्रता, प्रेमळ स्वभाव यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शब्दांतून या पुस्तकात व्यक्त केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचायला हवे.
प्रियांका मदने

Comments
Post a Comment