"पहिल्या प्रेमाला अनन्य साधारण महत्त्व देणाऱ्यांनी 'वि.स. खांडेकर' यांची कादंबरी "पहिलं प्रेम" नक्की वाचायला हवी."
'प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं' या ओळी बऱ्याच वाचकांनी बऱ्याच वेळा वाचल्या- ऐकल्या असतील. ज्यावेळी एखादी मुलगी किंवा मुलगा तारुण्यात प्रवेश करतो, त्यावेळी त्या वयामुळे एकमेकांना एकमेकांविषयी आकर्षण वाटू लागते. आणि त्याच्याच पुढे जाऊन त्याचे रूपांतर बऱ्याचदा प्रेमात होताना पहावयास मिळते. पण पुढे ज्याला पहिले प्रेम म्हटलं जातं ते टिकतच असं नाही. मग काही दिवसांमध्ये त्या दोघांमध्ये भांडणे होऊ लागतात,वाद होतात आणि ते टोकाला जाऊन पहिल्या प्रेमाचे रूपांतर घटस्फोटात होते. आजूबाजूला निरीक्षण करताना अशी बरीचशी उदाहरणे ऐकायला मिळतात. हे मी एवढ्यासाठी सांगत आहे कारण, वि.स.खांडेकर यांची 'पहिले प्रेम' ही कादंबरी प्रेमाचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला भाग पाडते. मला देखील सुरुवातीला कादंबरीत पहिल्या प्रेमाची उत्कटता आणि त्याचे गोड गायले असतील असे वाटत होते, त्यामुळे ही कादंबरी वाचताना नवीन काहीतरी शिकायला मिळालं असंच वाटलं.
कादंबरीची कथा एका व्यक्तीला पहिल्या प्रेमाबद्दल, ज्या गोष्टी वेगवेगळ्या व्यक्तींच्या अनुभवांतून, त्याच्या स्वतःच्या असणाऱ्या अनुभवातून जाणवतात त्याच समजावून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात दिसून येतो. वकील असणारा एक व्यक्ती या सर्व अनुभवांना वाचकांसमोर ठेवत आहे. या कादंबरीची सुरुवात होते ती, एका वादळी पावसाच्या सुरुवातीने. तो पावसाचे निरीक्षण करत आहे आणि पाऊस थांबावं यासाठी विनवणी करत आहे. कारण रविवार असल्यामुळे, तो वकील झाला आणि त्यासाठी ज्यांनी मदत केली होती त्या बाबासाहेबांशी चर्चा करण्याचे त्यादिवशी ठरलेले असते. आणि पावसामुळे ही भेट रद्द होऊ नये यासाठीच त्याची खटपट चाललेली असते. आणि पावसामुळे ही भेट रद्द होते कि काय हा विचार चालू असताना, त्याचवेळी वर्तमानपत्रातील एक बातमी त्याचे लक्ष वेधून घेते. ती बातमी असते करुणा आणि मनोहरचा लग्नाची. आता या दोन व्यक्ती कोण आहेत याची माहिती जो या कादंबरीची कथा सांगतो आहे, त्या वकिलाकडूनच समजते. देवदत्त आपल्याला प्रत्येक व्यक्तींची माहिती देत असतो. त्यातच तो सांगतो की, देवदत्तची पहिली प्रेयसी करुणा हिच्या लग्नाची ती बातमी असते. या बातमीने त्याच्या प्रेमाच्या पूर्वीच्या आठवणी जाग्या होतात. त्याच्या मतानुसार, करुणाने त्याला नाकारून मनोहर सारख्या ड्रॉईंग मास्तराशी लग्न करावे हे त्याच्या मनाला पटलेले नव्हते. कारण तो त्याच्या पहिल्या प्रेमाची माहिती वाचकांना देतो त्यावेळी त्याचे आणि करुणाचे एक वेगळे प्रेम या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेमाची सुरुवात खूप वेगळी असते परंतु लग्नाबद्दल विचारल्यानंतर मात्र करुणा त्याला 'मी आता लग्नाविषयी विचार करत नसल्याचे सांगते'. या गोष्टीमुळे त्यावेळी त्याला खूप दुःख झालेले असते. पण आता बऱ्याच वर्षांनी वर्तमानपत्रातील लग्नाची बातमी वाचल्यानंतर त्याच्या मनाला पुन्हा दुःख होते. त्याविषयीची माहिती तो बाबासाहेब ,एक प्रसिद्ध वकील आणि वकिलीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून त्याच्या आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान असणाऱ्या व्यक्तीला सांगतो. त्यावेळी बाबासाहेब देखील त्याला त्यांच्या पहिल्या प्रेमाविषयी सांगतात.
बाबासाहेब सांगतात की, त्यांच्या घरी स्वयंपाक करायला एक बाई येत होत्या. आणि असेच एके दिवशी तिची मुलगी त्यांच्या घरी येते. त्यांचे बोलणे चालू होते, बाबासाहेब एकदा आजारी पडलेले असताना ती मुलगी त्यांची खूप सेवा करते. बाबासाहेबांना तेव्हापासून तिच्याविषयी प्रेम वाटायला लागते. पण ही गोष्ट लग्नापर्यंत जाण्या अगोदरच तिचे लग्न झालेले असते. बाबासाहेब सांगतात की, ती मुलगी मिळाली नाही पण तरी त्यांचा संसार त्यांच्या बायकोमुळे सुखाचा झाला. पुढे एका ठिकाणी बाबासाहेबांची त्या मुलीची भेट होते पण ती इतकी बारीक झालेली असते की, मुलगी त्यांना ओळखते पण ते त्या मुलीला ओळखू शकत नाहीत. त्यामुळे पहिल्या प्रेमाला आपण विसरू शकत नाही ही संकल्पना त्यांना चुकीचे वाटते. त्यामुळे कथानक सांगणारा देवदत्त याविषयी विचार करू लागतं. तो विचार करत असताना, त्यालाही असे जाणवते की, त्याचेही करुणेशी लग्न न होता अरुणाशी झाले आणि आता त्यांना एक मुलगा आहे. त्याला आता अरुणेची, त्याच्या बायकोची इतकी सवय झाली होती की, तो क्षणभरही त्या दोघांशिवाय राहू शकत नव्हता. वर्तमानपत्रातील बातमी वाचेपर्यंत त्याला करुणेची आठवण देखील येत नव्हती. त्यानंतरच्या काही दिवसांनी करुणेचे पत्र त्याला येते आणि त्यामध्ये परिस्थितीनुसार व्यक्ती एकमेकांच्या जवळ येत असतात आणि त्यातूनच त्यांचे प्रेम फुलत जाते असं तिने त्यात लिहिलेले असते. याबद्दल तो प्रत्येक वेळी विचार करत असतो. तो स्वतः वकील असल्याने त्याच्याकडे अनेक खटले येत असतात. त्यामधील अनेक उदाहरणे त्याला आठवायला लागतात. आणि प्रेम विवाह अनेक प्रेमविवाह करणारी जोडपी काही दिवसानंतर घटस्फोटासाठी त्याच्याकडे येत असल्याचे तो सांगतो. त्यानंतर त्याच्याकडे अजून एक केस आलेली असते, त्यामध्ये बायको आपल्या नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळून गेलेली असते. तो प्रियकरही तिला पुढे त्रास देऊ लागतो. आणि पुन्हा तिचाच पहिला नवरा आपल्या बायकोला शोधण्यासाठी सकाळी त्याच्याकडे आलेला असतो.
त्याला पुन्हा या प्रसंगातही, एका नवऱ्याचे बायकोवर असणारे प्रेम दिसून येते. तो प्रवास करत असतानाही तीच बाई संशयासद माणसापाशी त्याला दिसते पण त्याला ते ओळखता येत नाही. पुढे तिचा शोध घेण्यासाठी तो एका गावात जातो. त्या गावामध्ये बाबासाहेबांनी त्याला त्यांच्या पहिल्या प्रेमाविषयी सांगितले असते, ती मुलगी त्याच गावात असल्याचे समजते. महिलेचा शोध घेण्यापेक्षा बाबासाहेबांच्या या प्रियसीला बघण्याची उत्सुकता त्याला लागते. तो त्या घरामध्ये जातो, तेव्हा त्याला एक जोडपं दिसते. त्यातील बायको असणारी स्त्री आजाराने आणि वयाने खूप थकलेली जाणवते. त्यानंतर दोघांशी गप्पा मारत असताना त्यांच्या प्रभाकर या मुलाविषयी ते त्याला सांगतात. आणि त्याचे बरेच दिवस पत्र न आल्यामुळे त्याचा शोध घेण्याबद्दल विनंती करतात. त्या जोडप्याचे निरीक्षण करतानाही त्याला त्या दोघातील, खास करून नवऱ्याचे बायको वरती असणारे प्रेम दिसून येते. कारण आजारी असताना ती ज्या वेळेस स्वयंपाक करण्याचे बोलते, त्यावेळी तो तिला करू देत नाही आणि तिच्या उशाशी बसून काळजी घेताना दिसतो. या ठिकाणी देखील पहिले प्रेम मिळालं नाही तरी त्यांचा संसार सुखाचा झालेला असतो. पुढे त्यांनी विनवणी केल्यानंतर तो प्रभाकरचा शोध घेण्याचे ठरवतो. तो प्रभाकर राहत असणाऱ्या ठिकाणी जातो, त्यावेळी त्याला प्रभाकरने लिहिलेला एक कागद सापडतो. त्यामध्ये त्याला त्याचे पहिले प्रेम मिळाल्यामुळे तो आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिलेले असते. त्यामुळे त्याला खूप धक्का बसतो. त्यानंतर तो त्याची सर्व पत्रे वाचायला सुरुवात करतो. त्यावेळी असे लक्षात येते की, कॉलेज जीवनामध्ये प्रभाकरचे त्याच्याच कॉलेजमधील सुलाभावर प्रेम झालेले असते. या प्रेमाची गोष्ट खूप वेगळी असते. प्रभाकर आणि सुलभा दोघे कॉलेजमधील अभ्यासाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यातूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात होते. पुढे हे प्रेम त्याला मिळत नाही आणि सुलभाचे लग्न होते तेही दुसऱ्याशी. या प्रसंगानंतर काही झाले तरी तो तिला विसरू शकणार नसल्याचे त्याने अनेक पत्रामध्ये लिहिलेले असते. या घटनेनंतर पुन्हा पहिल्या प्रेमाविषयी त्याला विचार करावासा वाटतो.
त्याचा तपास चालू असतानाच , एके दिवशी प्रभाकरचे आई-वडील त्याच्यापाशी येतात. आणि त्यामध्ये प्रभाकरने तो आत्महत्या न करता, त्याने एका मुलीशी लग्न करण्याचे ठरल्याबद्दल त्याने पाठवलेल्या पत्रात लिहिलेले असते. प्रभाकरचे आई- वडील त्याला ते पत्र दाखवतात. या गोष्टीमुळे सर्वांनाच खूप आनंद होतो. या सगळ्या प्रसंगांमधून प्रेमाविषयी विचार करणाऱ्या, कथा सांगणाऱ्या देवदत्तला पहिल्या प्रेम प्रेमाविषयी असणारी उत्करता निभावल्या जाणाऱ्या प्रेमातच असते असे क्षणोक्षणी जाणवते. फक्त शारीरिक आकर्षणाने होणारे प्रेम आणि त्यानंतर खऱ्या आयुष्यात क्षणोक्षणी साथ देणारे प्रेम यामध्ये शेवटपर्यंत साथ देणारे ,पहिले प्रेम असल्याचे हे पुस्तक वाचत असताना जाणवते. पहिल्या प्रेमाची अनेक वर्णने आपण या अगोदर वाचली आहेत पण वि. स. खांडेकरांची पहिल प्रेम कादंबरी वाचत असताना, प्रेमाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी भाग पाडते . एखाद्या काव्याप्रमाणे, कादंबरीप्रमाणे, चित्रपटाप्रमाणे बघायला गेलो तर सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात. पण प्रेम या संकल्पनेला वास्तवाच्या चौकटीतून पाहिले ,तर मात्र या कादंबरीतील अनुभवानुसार जन्माला आलेले प्रेमातील सत्य आणि वास्तव या ठिकाणी नक्कीच समजते. तरुण वयात प्रेम न मिळाल्याने आत्महत्या करणारे अनेक तरुण-तरुणी दिसतात काहीजण तेच प्रेम ओरबाडून मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा तरुण तरुणींसाठ हे पुस्तक नक्कीच वेगळा विचार करायला लावणारे आहे.

Comments
Post a Comment