फकिरा कादंबरी सारांश
"अण्णा भाऊ साठे " लिखित कादंबरी ' फकिरा ' मुखपृष्ठ
'लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ' लिखित कादंबरी 'फकीरा ' ज्या कादंबरीने अनेक वाचकांना वाचनाची आवड निर्माण केली, तीच ही कादंबरी आणि तेच हे सुप्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण म्हणजे वास्तव दर्शन आणि त्यांच्या आयुष्यात ज्या व्यक्ती आल्या त्याविषयीचे वर्णन. फकीरा ही व्यक्तिरेखा देखील त्यांच्या आप्तांपैकी आहे,हे आपण ही कादंबरी वाचत असताना लक्षात घ्यायला हवे. अण्णाभाऊ साठे एका ठिकाणी असे म्हणतात की, 'मी ज्यांच्या विषयी लिहितो ती माझी माणसं असतात.' त्यामुळे फकीरा ही कादंबरी असली तरीही यातील काल्पनिकता आणि वास्तविक घटना यामध्ये खूप जवळचा संबंध पहावयास मिळतो. फकीरा वाचताना त्यातील मुख्य व्यक्तिरेखा फकीरा अगदी डोळ्यांसमोर उभी राहते. यातूनच एका लेखकाच्या लेखणीत किती सामर्थ्य असते हेच या ठिकाणी, हे पुस्तक वाचताना लक्षात येते. पुस्तकाच्या सुरुवातीला हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण करण्याचा लेखकाच्या मनाचा मोठेपणा कौतुकास्पदच आहे. महाराष्ट्रातील प्रथमच राज्य सरकारने प्रथम पारितोषिक देऊन गौरविलेली हीच फकीरा कादंबरी. प्रत्येक लेखकाचे एक शैली असते,पण अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण म्हणजे सामन्यातील सामान्य माणसाचे जीवन,त्याचा संघर्ष आणि त्यांनी त्यांच्या आजूबाजूला बघितलेले अनेक अनुभव यात आहेत. आणि ही शैली खऱ्या अर्थाने वाचकाच्या मनापर्यंत जाऊन पोहोचते ते याच गोष्टीमुळे. त्यांनी जे अनुभवले, बघितले जाणून घेतले तेच आपल्या लेखणीतून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न. लेखक कोणताही असू देत, तो जे काही लिहितो त्यात खरेपणा असेल, प्रामाणिकपणा असेल तर ते लिखाण वाचकांच्या हृदयात लवकर जाऊन पोहोचते आणि त्यामुळेच ही कादंबरी देखील आणि यातील मुख्य नायक 'फकीरा ' मनाच्या कोपऱ्यात एक वेगळं स्थान निर्माण करतो आणि कदाचित हेच एका लेखकाचं यश असतं, जे अण्णाभाऊ साठे यांना मिळाले.
कादंबरीची सुरुवात वाटेगाव या गावच्या वर्णनामधून होते. अतिशय सुंदर पद्धतीने गाव, गावामध्ये असणारे वातावरण याचे वर्णन केलेले आहे. वाटेगावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व विष्णुपंत कुलकर्णी बराच काहीतरी विचार करत बसलेले आहेत आणि त्यांच्या नाराजीचे कारण पुढे कादंबरी वाचताना समजते. त्यांच्या गावाच्या शेजारी तीन-चार किलोमीटर अंतरावर शिगाव हे गाव असते आणि त्या गावात जोगिणीची मानाची यात्रा भरत असते. आणि आपल्या गावात अशी यात्रा कधी भरायची हाच विचार विष्णुपंत करत बसलेले असतात. यात्रेची माहिती या ठिकाणी अशी मिळते की जोगा आणि जोगीन यांच्या हातात खोबऱ्याची वाटी असते. त्या दोघाभोवती गावकऱ्यांचा खडा पहारा असतो. कारण खोबऱ्याची वाटी म्हणजे गावाची इज्जत असते. जर का या जत्रेवेळी दुसऱ्या गावातील एखाद्या व्यक्तीने त्यांच्या हातातून ती वाटी पळवली तर त्या गावची जत्रा बंद होऊन,ज्या व्यक्तीने ती वाटी नेली त्या गावांमध्ये यात्रा सुरू होते. खोबऱ्याची वाटी आणण्याचे काम हे तितकेच जोखमीचे असते. कारण ती वाटी नेत असताना, नेणारी व्यक्ती गावकऱ्यांना सापडली तर मात्र खैर नसते. ती व्यक्ती त्यांच्याच गावच्या हद्दीत सापडली तर त्याचे डोके कापून वेशीला टांगले जाते. त्यामुळे एखादा जिगरबाज आणि धाडसी तरुणच हे काम करू शकतो. शिगावच्या बाजीबा खोताने हीच कामगिरी करून काळ गावच्या जोगण्यात जाऊन मोठ्या धाडसाने ती वाटी आणली होती आणि त्यामुळे शिगावात जत्रा भरत होती. विष्णुपंत हाच विचार करत असताना राणोजी मांग त्यांच्यापाशी येतो आणि ते त्यांच्या मनातील खदखद त्याला सांगतात. आपल्या गावातही अशी जत्रा भरायला पाहिजे असे त्यांना वाटत असते.
विष्णुपंतांच्या बोलण्यावर राणोजी मांग विचार करू लागतो. विष्णुपंतापासून जाऊन तो आपल्या घरी जातो घरी गेल्यानंतर आई राहीबाई,वडील दौलती, बायको राधा आणि साधू व फकीरा या मुलांना तो याबद्दल सांगतो. हे ऐकल्यानंतर फकीरा मात्र आपल्या वडिलांना शिगावच्या जत्रेत जाऊन ती खोबऱ्याची वाटी आणण्यासाठी सांगतो,त्याच्या या बोलण्यावर सगळेजण हसू लागतात. पण खरे तर राणोजीच्या मनातून विष्णुपंतांचे बोलणे जायला तयार नव्हते. तो काहीतरी ठरवून शिगावच्या जत्रेत जातो आणि त्या ठिकाणी केल्यानंतर वाटेगावचा भिवा रामोशी त्याला दिसतो, आपण शिगावातून खोबऱ्याची वाटी घेऊन येतोय,गावकऱ्यांना आडवे यायला सांगा,असा निरोप घेऊन त्याला गावाकडे जायला सांगतो. कडक पहारा असताना राणोजी मांग खोबऱ्याचे वाटी घेऊन,गबऱ्या या त्याच्या घोड्यावर बसून भरधाव वेगाने वाटेगाव कडे जाण्यासाठी निघतो. शिगावातील सर्वजण तलवारी घेऊन त्याच्या पाठीमागे लागतात. शिगावच्या बाजीबा खोताचा मुलगा बापू खोत वाटेगावच्या हद्दीत जाऊन राणोजीचे मुंडके कापतो. शिगावच्या हद्दीत राणोजी सापडला असता तरच मुंडके कापण्याचा नियम होता आणि बापू खोताने हा नियम मोडला होता. वाटेगावातील सर्वजण शिगावात जातात आणि राणोजीचे मुंडके घेऊन परत येतात. आणि राणोजीच्या या बलिदानामुळे वाटेगावात जोगिणीची जत्रा भरायला सुरुवात होते. पण खऱ्या अर्थाने वाटेगावने एक धाडसी तरुण यामध्ये गमावला होता, याची खंत सर्व गावकऱ्यांना आणि त्याच्या घरातल्यांना होते.
दरवर्षी वाटेगावात जत्रा भरत होती आणि बापू खोत प्रत्येक जत्रेत खोबऱ्याची वाटी आणण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यामध्ये त्याला यश येत नव्हते. अकरा वर्षांनी पुन्हा बापू खोत वाटेगावच्या जत्रेतून खोबऱ्याची वाटी नेण्याचा प्रयत्न करतो. पण हे समजल्यावर सर्वजण त्याचा पाठलाग करतात. सर्वात राणोजीचा मुलगा फकीरा पुढे असतो, तो बापू खोतला वाटेगावच्या हद्दीत गाठतो पण मुंडके न मारता त्याला जिवंत सोडतो आणि खोबऱ्याची वाटी घेऊन गावाकडे फिरतो. या घटनेमुळे आपल्या वडिलाप्रमाणेच, फकीराने पुन्हा एकदा गावची अब्रू वाचवलेली असते. यामुळे सगळ्या वाटेगावचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. काही वर्षांपूर्वी, बापू खोताने राणोजी वाटेगावच्या हद्दीत आल्यानंतर पण त्याला मारले होते पण तोच बापू खोत वाटेगावच्या हद्दीत सापडल्यावर त्याच्या हातून खोबऱ्याची वाटी घेतो आणि ती गावकऱ्यांपाशी देतो पण मोठ्या मनाने तो या ठिकाणी बापू खोताला जीवनदान देताना पाहायला मिळते. यामुळे वाटेगावच्या आणि शिगावच्या कौतुकास फकीरा पात्र ठरतो. पुन्हा नेहमी सारखी वाटेगावात जोगणीची यात्रा होते. राणोजी मांग आणि त्याचा मुलगा फकीरा या दोघांनी गावचे अब्रू वाचवली असली,तरी देखील काही लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या मातंग समाजाला गुन्हेगार ठरवून अनेक निर्बंध,नियम सरकारने त्यांच्यावर लादलेले होते. काहीही चूक नसताना त्यांना तीन वेळेस हजरी द्यावी लागत होती आणि हजरी देत असताना देखील पोलिस अधिकारी अपशब्द वापरत. हजरीच्या वेळी फकीराला अपशब्द वापरल्यानंतर तोही त्याच भाषेत उत्तर देतो. आणि काही जणांना उगाचच गुन्हेगार ठरवून हद्दपारीची शिक्षाही त्यावेळी केली जात होती. या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तो विष्णुपंताना सांगून काहीतरी करण्याची विनंती करतो. फकीरचे आणि त्याच्या वडिलांचे गावावरती असणाऱ्या उपकाराला जागून सरकार दरबारी जाब विचारतो आणि तीन वेळेची हजेरी बंद करायला सांगतात. विष्णुपंतांनी फकीराचा शब्द मानल्यामुळे त्यांच्या मातंग समाजाला फकीरा देव वाटू लागतो. काही दिवसांनी फकीराचे सरू या मुलीबरोबर लग्न होते पण त्यानंतरही तो प्रत्येकाच्या अडीअडचणींना धावून जातच होता.
फकीराने सत्तू भोसलेला कशाप्रकारे मदत केली याचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. सत्तू भोसले कुमजेचा ,तो काही वर्ष लष्करात काम करत होता. पण काम करताना होणारा अपमान आणि इतर काही कारणामुळे तो गावाकडे परत येतो आणि गावातील कामे करून आपल्याला उदरनिर्वाह करू लागतो. लष्करात नोकरी केल्यामुळे, तो बऱ्याच गोष्टी शिकला होता आणि कायम कुऱ्हाड खांद्यावर टाकून तो गावात फिरताना दिसायचा. असेच फिरत असताना एका ठिकाणी, एका गरोदर बाईला काही किरकोळ कारणामुळे गावातील एक प्रतिष्ठित समजला जाणारा चौगुले मारत होता. सत्तू भोसले समजावण्याच्या सुरात त्याला मारण्याचे थांबवण्यासाठी सांगतो पण 'ती मेल्यानंतरच मी मारायचे थांबवणार 'असे चौगुले प्रत्युत्तर देतो आणि तुला काय करायचे असेल ते कर असे सांगितल्यावर सत्त्तू भोसले संतापाच्या भरात चौगुल्याला कुऱ्हाडीचे घाव घालून संपवतो आणि फरारी होतो. बरेच दिवस फरारी असताना,एका ठिकाणी त्याला घेराव घालण्यात येतो. त्यावेळी सत्तू भोसले फकिराला मदत मागतो. फकीरा आपल्या साथीदारांचा येऊन त्याला तेथून सोडवतो. या ठिकाणी फकीराचे धाडस बघायला मिळते. यानंतर काही दिवसांनी वाटेगाव आणि आजूबजूच्या गावात दुष्काळ आणि तापसारीचा आजार येतो. आणि त्यात त्याच्या मातंग समाजातील अनेक जण उपासमारीने मरू लागतात. अशा परिस्थितीत काम धंदा नाही म्हणून जगायचं कसे हा मुख्य प्रश्न त्यांच्या सर्वांसमोर उभा राहतो.
काहीही करून आपल्या लोकांना जगवायचे आहे,हा एकच विचार त्याच्या पुढे असतो. आपल्या साथीदारांना सोबत घेऊन माळवाडी मटकऱ्यच्या घरात धान्याची लूट करून, तो आपल्या समाजाला जगवतो. पुढे बेडसगावातील इंग्रजांचा खजिनाही ते आणि त्याचे सहकारी लुटतात पण हा खजिना लुटल्यानंतर त्याच्या कुटुंबातील, त्याच्या वाड्यातील सर्वांना इंग्रज अधिकारी कैद करतात आणि त्यांचा खूप छळ करतात. फकीरा आपल्या साथीदारांसह हजर झाला तरच ते त्याच्या घरातल्यांना आणि मांगवाड्यातल्या लोकांना सोडण्याचे कबूल करतात. सत्तू भोसलेची मदत मिळाली तरच त्या ठिकाणी छावणीत हल्ला करण्याचे सर्वजण ठरवतात. पण सत्ता भोसलेलाही घेराव घातल्याचे लक्षात येते आणि त्याची मदत न मिळाल्याने व आपल्या लोकांचे अजून हाल होऊ नये त्यासाठी फकीरा, सावळा, मुरा, हरी, तायनू, बळी, भिवा हजर होतात. आणि पूर्वजांपासून त्याच्याकडे असणारी तलवार व त्याच्या गबऱ्या या घोड्याला आपल्या घरच्यांच्या ताब्यात देण्याची विनंती करून फकिरा आपली लढाई थांबवितो. असा या कादंबरीचा नायक फकीरा तळागाळातल्या, सामान्य माणसातल्या संघर्षाची कथा, धाडसी बाणा करारीपणा आणि बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी शिकवून जातो.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण, त्यांची लिखाणाची शैली म्हणजे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आणि वास्तवतेला अधिक जवळून जाणण्याचा मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक वाचक प्रेमींनी एकदा तरी अण्णाभाऊ साठे लिखित 'फकीर ' ही कादंबरी नक्की वाचायला हवी.

Comments
Post a Comment