Skip to main content

शेतकरी असल्यानंतर आयुष्य खरंच खडतर असते का? समजायचं असेल तर राजन गवस लिखित कादंबरी "ब,बळीचा " नक्की वाचायला हवी.Short Summary

                                         पुस्तकाचा सारांश 

            


                     "राजन गवस " लिखित कादंबरी 'ब,बळीचा ' पुस्तकाचे मुखपष्ठ 

           कोणत्याही पुस्तकाच्या नावावरून बऱ्याच गोष्टी समजत असतात. हे पुस्तक वाचण्यासाठी घेतल्यानंतर,शेतकऱ्याशी संलग्न कादंबरी असणार आहे हा विचार मनामध्ये होता. आजपर्यंत अनेक पुस्तकांचे वाचन करताना ठराविक कल्पना करता येते, तसे या ठिकाणी करता येत नव्हती. या पुस्तकात कथा, पटकथा आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांचे वास्तव वाचकांसमोर मांडण्याचा सुंदर आणि वेगळा प्रयत्न लेखकाने केला आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जी काही कादंबरी वाचतो, त्यावेळी दिपूशेठ, कोणकेरी आणि आडव्याप्पा या तिघांची वेगवेगळी कथा, शेतकऱ्यांचे,सामान्य माणसांचे त्यांच्या आयुष्यातील वास्तव क्षणाक्षणाला हे पुस्तक वाचताना जाणवते. कित्येकदा आपोआपच डोळ्यांच्या कडा पाणवतात. समाज व्यवस्थेचा ज्यावेळी आपण विचार करतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट मुकाट्याने सहन करणारी व्यक्ती त्या व्यवस्थेचा बळी पडताना दिसते. भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरीही चुकीची गोष्ट घडल्यानंतरही, त्या व्यवस्थेविरुद्ध प्रश्न विचारण्याचे धाडस किती जणांच्या कडे असते? हा विचार करायला लावणारा प्रश्न मनाला अस्वस्थ करून टाकतो. एक शेतकरी आपल्या भावाला शिकवतो त्याला शिकल्यानंतर नोकरी लागते पण त्यानंतर मात्र आपल्या शेतकरी भावाला किंमत द्यावीशी त्याला वाटत नाही. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडताना दिसतात. लोकांचा खेडेगावाकडे व  शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा असतो हे देखील हे पुस्तक वाचत असताना समजते. एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या जीवनातील दाहकता  कशी असू शकते,हे या कादंबरीच्या माध्यमातून या ठिकाणी लक्षात येते. 

         या कादंबरीची सुरुवात होते ती 'उप्पेनबेटगिरी ' या गावापासून. त्यामध्ये या कादंबरीचा प्रमुख नायक कलाप्पा कोणकेरी आणि त्याच गावात भांड्याचे दुकान असणारा दिपूशेठ या दोघांमध्ये एका हॉटेलला चाललेला संवाद दाखवलेला आहे. त्यांच्या बोलण्यातून कोणकेरी काही लिखाण करत असल्याचे म्हणजेच लेखक असल्याबद्दल समजते पण त्यासोबत तो मामलेदार ऑफिस कामाला असतो, कामावरून सुटल्यानंतर बराच वेळ तो दिपू शेठच्या दुकानात येऊन भांड्यावर चांगल्या अक्षरात नाव टाकून देण्याचे काम करत असतो. आणि याच बरोबर येणार्‍या माणसांचे निरीक्षण करत बसायला त्याला खूप आवडत असते. तो मूळचा लेखक असल्याने वाचन आणि पुस्तकांबद्दलची चर्चा या दोघांमध्ये सतत चालत होती. तो सतत दिपू शेठच्या दुकानात असतो आणि त्यावेळी तो लेखक असल्याने वाचन आणि पुस्तकांबद्दल चर्चा त्या दोघांमध्ये चालत  आणि त्यामुळेच दिपूशेठलाही वाचनाची आवड निर्माण झाली होती. तो तिथे असताना, अनेक व्यक्ती त्याला भेटण्यासाठी यायच्या आणि त्यांच्या गावातील हॉटेलात अनेक विषयांच्या चर्चा चालायच्या, त्या ठिकाणी दिपूशेठ असायचा, त्यामुळे त्या दोघांचें एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. पुढील काही दिवसात कोणकेरीची पुरवठा खात्यात जिल्ह्याच्या ठिकाणी बदली झाली होती, लग्न झाले होते तेव्हापासून त्याचे गावात येण्याचा कमी होण्याऐवजी जास्तच वाढले होते. त्याला त्याच गावात बदली पाहिजे होते आणि दिपू शेठला त्या पाठीमागचे कारण कळायला मार्ग नव्हता. कोणकेरी लेखक असल्याने त्याने लिहिलेल्या बऱ्याच गोष्टी वर्तमानपत्रात छापून यायच्या आणि त्याच्या लिखाणाबद्दल त्याला पुरस्कार मिळाला होता, त्याचा फोटोही वर्तमानपत्रात छापून आला होता. कोणकेरी अनेक माणसांना भेटत असला तरी निर्विकार असायचा आणि जास्त काही,कधी वेगळ्या विषयावर बोलताना दिसत नव्हता.    

         या दोघांची ओळख झाल्यानंतर, त्या दुकानात, एके दिवशी झिंगारू दारूवाला एक मोठा दिग्दर्शक त्याच्या शोधात येतो. आणि कोणकेरीला चित्रपटाची पटकथा लिहिण्याबद्दल विचारतो. अशाप्रकारे सुरुवातीची या मुख्य व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी समजते. आणि लगेचच कोणकेरी गायब असल्याची बातमी गावभर पसरते. दिपू शेठच्या दुकानातून नेहमी बसत असल्यामुळे त्याची बायको,त्याचे आई-वडील, पत्रकार, तो दिग्दर्शक आणि त्याने जोडलेल्या अनेक व्यक्ती त्या दुकानात दिपूशेठ कडे चौकशी करताना दिसतात. याच ठिकाणी कादंबरीला एक वेगळे वळण आलेले दिसते. वर्तमानपत्रात कोणकेरीच्या गायब होण्यापाठीमागे घातपाताचा संशय असल्याचे छापून आलेले असते. यामुळे दिपूशेठला कोणकेरी गायब झाल्यापासून बऱ्याच गोष्टीमुळे आणि बरेच जण त्याच्याकडे येऊन चौकशी करत असल्यामुळे, त्याला सतत मनस्ताप होत असतो. या दोघांमध्ये असणाऱ्या जवळच्या संबंधामुळे दिपूशेठने त्याला गावात एक खोली बघून दिलेली असते. आणि नवरा गायब झाल्यानंतर त्याची बायकोही गावी निघून जाते. आणि दिपू शेठला त्या खोलीतील सामान आपला घरात आणून ठेवावे लागते. त्या समानात इतर वस्तूंपेक्षा पुस्तकांचा समावेश जास्त असतो. सुरुवातीला त्या दोघांमध्ये जे काही बोलणं होतं असतं, त्यापेक्षा कोणकेरी खूप वेगळा असल्याचे क्षणोक्षणी त्याची डायरी, त्याने लिहिलेली पत्रे आणि चित्रपटाची पटकथा यातूनच खऱ्या अर्थाने लक्षात येते. त्याचे लिखाणच त्याच्या खऱ्या आयुष्याला आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या परिस्थितीला वाचकांपुढे ठेवते. त्याच्या आयुष्यात त्याला भेटलेल्या लोकांना त्याने वेगवेगळ्या प्रकारे मदत केल्यामुळे अनेक जण दिपूशेठला त्याच्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी सांगत असतात आणि त्याचबरोबर बरेच जण त्याच्याकडे संशयाने बघत. या सगळ्या प्रकारामुळे दिपू शेठ त्याच्या सामानातील तीन डायऱ्या आणि दोन फायली शोधून काढतो आणि एवढी लोक त्याच्याविषयी विचारपूस करायला येतात म्हणून त्याच आयुष्य समजावून घेण्यासाठी, तो त्याची डायरी वाचायला सुरुवात करतो. 

           आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कादंबरीला एक वेगळे वळण लागताना पाहावयास मिळते. सुरुवातीला ' उफराळ ' हे नाव देऊन त्या चित्रपटाची पटकथा लिहायला सुरुवात केल्याचा या ठिकाणी उल्लेख असतो. त्यानंतर त्याच्या स्वतःच्या आयुष्याची कथा त्याने लिहिलेली असते. त्यामध्ये त्याच्या लहानपणापासून, त्याचे आपल्या गावाप्रती असणारे प्रेम दिसते,त्याचप्रमाणे गुढीपाडव्याला त्याची सुरू झालेली शाळा याविषयी देखील लिहिलेले असते. तहसीलदार कार्यालयात कामाला लागल्यापासून,घरच्यांपासून कोणकेरी कसा दुरावत चालला होता याबद्दलचे वर्णन या ठिकाणी केले आहे. आपली स्वतःची परिस्थिती सुधारली पण बायको आल्यानंतर एका मर्यादेमुळे, आपल्या कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे वाटणारे दुःख याबद्दल बऱ्याच गोष्टी त्या डायरीत लिहिलेल्या होत्या. एखादा व्यक्ती वरवर जरी खुश आनंदी वाटत असला, तरीदेखील त्याच्या आतमध्ये किती दुःख साचलेलं असतं याची जाणीव ही कादंबरी वाचत असताना होते. लहानपणापासून गरिबीत काढलेले दिवस आणि नोकरी लागल्यापासून बायको नको त्या गोष्टींमध्ये खर्च करतेय, याबद्दल झालेला आणि जाणवणारा बदल डायरीतील प्रत्येक पानातून वाचताना जाणवतो. लेखक लेखन करत असला तरीही  त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि केलेले कष्ट याचे चित्रण या पुस्तकात आहे. त्याची प्रचिती चित्रपटाच्या पटकथेतून समजते.

         उफराळ गावातील दृश्य आणि त्या गावातील हरिजन वाडा, निळपणकर गल्ली, दानवाडे गल्लीतील जिवबा दानवाड्याचा बंगला, दगडू पाटलाचे घर आणि चित्रपटाचा नायक आडव्याप्पा यांची ओळख सुरुवातीला होते. गावाकडचे असणारे दृश्य आणि याच गावात आपल्या शेतात राबणारे शेतकरी. सुरुवातीपासून आडव्याप्पाचा शेती करण्यासाठीचा संघर्ष, त्याची घरची परिस्थिती, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आयुष्य वाचताना कित्येकदा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. गावातील राजकारणामुळे गरिबांनी जगायचं का नाही? हा प्रश्न आडव्याप्पा या पुस्तकाच्या माध्यमातून विचारताना दिसतो. सुरुवातीला गावामध्ये विहीर मंजूर करण्यासाठी आणलेली योजना आर्थिक निकष न बघता सरपंचाच्या बायकोचे नाव पाठवून दिले जाते. गरीब शेतकऱ्याला कोणकोणत्या अडचणी येत असतात याची देखील समज या ठिकाणी येते. आडव्याप्पा आपल्या शेतात राबत असतो, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या शेतातही मजूरीने जात असतो. दुसऱ्याच्या शेतात राबत असताना येणारे चांगले वाईट प्रसंगही त्याला येतात. खत शेतात टाकता नाही, कुणी देत नाही अशाच भेदभावाच्या प्रसंगाचा त्याला अनुभव येतो. शेतात येत असणारे संकटे तसेच आर्थिक परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी  आणि त्यामुळे आपला मुलगा केसू त्याला जास्त शिकण्याचा सल्ला आडव्याप्पा देतो. पुढे घेतल्यानंतर शिक्षण बदललेली परिस्थिती त्याला समजत असते. पुढे मेहुणा आजारी पडल्यानंतर पैशाची जुळवाजुळव करणारा आडव्याप्पा, आपल्या बहिणीला कॅन्सर झाल्याचे समजल्यानंतर पैसे जमवू शकत नाही. आणि बहिण गेल्याचे कळाल्यावरही साडी घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात. या परिस्थितीमुळे अस्वस्थ होणारा आडव्याप्पा स्वतःला हातबल समजून स्वतःलाच प्रश्न विचारताना दिसतो. त्याआधी बहीण जास्त आजारी आहे हे समजल्यावर  साडी घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात, या परिस्थितीमुळे अस्वस्थ होणारा आडव्याप्पा स्वतःला हतबल समजून स्वतःलाच प्रश्न विचारताना दिसतो. दोघेही परत आल्यानंतर त्यांची म्हैस दगावल्यानंतर धाय मोकलून रडणारी त्याची बायको पूर्ण खचून गेलेली दिसते. ज्या  गोष्टीच्या जीवावर घर चालते तीच गोष्ट नाहीशी झाल्यावर त्या कुटुंबाची झाली दुर्दशा याठीकाणी दिसते. अशा प्रकारची आपत्ती कोसळल्यानंतर सरकारकडून काही पैसे मिळतात, हे समजल्यावर त्याच्या परिस्थितीचा फायदा घेणाऱ्या व्यक्तिरेखा या ठिकाणी दिसतात. सतत कष्ट,संघर्ष, अडचणी आणि मनाला घालमेल करणारे असंख्य विचार आणि आडव्याप्पा  सामान्य शेतकरी वर्गाचे प्रतिनिधित्व करतो. ही पटकथा शेतकऱ्याची आहे आणि झिंगारु तर शेतकरी, खेडेगाव आणि त्याचे  वास्तव दाखवणे त्याला मान्य नाही.  त्यामुळे याशिवाय पटकथाच होऊ शकत नाही असे कल्लाप्पा कोणकेरीचे मत आहे. या कथेत एक शेतकरी, त्याचे कुटुंब,खेडेगावातील राजकारण, त्याचबरोबर असंख्य गोष्टी या पटकथेच्या माध्यमातून लेखकाने आपल्यासमोर ठेवल्या आहेत. आडव्याप्पा ही या पटकथेतील एक व्यक्ती झाली पण सामान्य शेतकरी कुटुंबात अशा समस्या अडचणी आणि किती जणांना येत असतील याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो.

            त्याचप्रमाणे या कादंबरीत कांतारामजी वडेवट्टीवार,श्रमिक शेतकरी संघटना महाराष्ट्र याचा कार्यकर्ता यालाही कोणकेरी पत्र लिहितो आणि शेतकऱ्याची अवस्था, त्याच्यापुढे असणारी संकटे याबद्दल चर्चा करताना दिसतो. दुसऱ्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले यांना देखील शेतकऱ्याची सध्याची असणारी परिस्थिती आणि बिकट परिस्थितीमध्ये अनेक लोक शेतकऱ्याचा कशा पद्धतीने फायदा घेतात हे देखील तो अतिशय आत्मीयतेने आपले मन पत्राच्या माध्यमातून व्यक्त करतो. कल्लाप्पा कोणकेरी,भांड्याचा दुकानदार,दिपूशेठ,धनगर वाड्यातील म्हातारा जो झाडपाल्याचे औषध देण्याचे काम करतो, त्याचप्रमाणे पटकथेतील वास्तवाचे चित्रण करणाऱ्या अनेक व्यक्तीरेखा ही कादंबरी वाचत असताना मनात शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतात. गरीब परिस्थितीमुळे आणि शेतीमध्ये परवडत नसल्यामुळे अनेक स्वप्नांना मुरड घालत, आयुष्य जगणं किती अवघड आहे, हीच या ठिकाणी लक्षात येते. कादंबरीला जरी शेवट नसला तरीही कथा, पटकथा  याच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारच्या  लिखाणाचा आनंद वाचक नक्की घेऊ शकतात. 

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...