विश्वास नवरा बायकोच्या नात्यातील
कोणी आपल्या भविष्याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. कधी काही घडेल, हे आजपर्यंत कुणाला सांगता आलेलं नाही आणि सांगता येणारही नाही. जीवनाबद्दल भरभरून बोलायचं आणि विचार करायचा, त्याचे कारण लग्न बंधनात जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी अडकते तेव्हा, ते दोघेही आपल्या येणाऱ्या आयुष्याबद्दल बरीच स्वप्ने रंगवीत असतात पण त्यातील किती पूर्ण होतात हा विषय बाजूलाच राहतो. या लेखाच्या माध्यमातून लग्नानंतर असणारे नवरा बायकोचे नाते आणि त्यांच्यातील विश्वास याचा उलगडा करणार आहोत.
पूर्वीच्या काळापासून लग्नाची परंपरा आजही भारतात चालू आहे. आपल्या संस्कृतीत लग्नाला पवित्र आणि शुभ मानले जाते. सुरुवातीला जी लग्न व्हायची त्यामध्ये आई-वडिलांच्या शब्दाला किंमत देऊन मुलगा आणि मुलगी पसंत केली जायची. बदलत्या काळानुसार लग्न पद्धतीत बदल होत गेला. पूर्वी घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींनी लग्न ठरवले की त्यामध्ये कोणताही बदल व्हायचा नाही, मुलाला मुलगी पसंत आहे का नाही याचा विचारही त्या ठिकाणी नसायचा. पण असे असतानाही आजच्या तुलनेत ती लग्ने शेवटपर्यंत टिकायची; त्यामागचे कारण होते ते म्हणजे नवरा आणि बायको यांच्यात असणारा अतुट विश्वास. विश्वास हा तसा प्रत्येक नात्यात महत्त्वाचा असतो परंतु नवरा-बायकोच्या नात्यात इतर नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त महत्त्व आहे. आज मुलगा - मुलगी आपल्या पसंतीनुसार लग्न करतात,एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांच्या सहवासात वेळ घालवण्यासाठी, स्वभाव जाणून घेण्यासाठी वेळ देतात आणि त्यानंतर लग्न करतात. एवढं झाल्यानंतरही ही लग्ने बऱ्याचदा शेवटपर्यंत टिकत नाहीत. काही महिन्यातच प्रेम विवाह घटस्फोटापर्यंत कधी येऊन पोहोचतात हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. काही वेळा लग्न घरातल्यांनी जमवून दिल असेल किंवा स्वतःच्या मनाने केलं असेल तरी त्यांना वेगळ रहायचं असतं.
नवरा आणि बायको म्हणजे संसाररूपी रथाची दोन चाक असतात, ती बरोबर चालली तर संसार सुखाचा होतो नाहीतर दोघांच्याही आयुष्याच वाटोळ होतं, असे पूर्वीचे लोक आजही सांगतात. आजच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण वाढताना दिसते, आजूबाजूला घडणाऱ्या आणि ऐकायला मिळणाऱ्या अनेक घटनांपाठीमागे विश्वासघात हेच कारण प्रामुख्याने दिसून येते. लग्नानंतरचे आयुष्य खरे तर, मुलगा असू देत किंवा मुलगी असू दे, स्वतःसाठी राहतच नाही. नवऱ्याच आयुष्य बायकोसाठी आणि बायकोच आयुष्य नवऱ्यासाठी होऊन जाते. एकमेकांच्या सुख - दुःखाचा वेळोवेळी विचार करावा लागतो. कोणतीही छोटी किंवा मोठी गोष्ट करताना एकमेकांना विचारात घ्यावे लागते. शरीरा सुखापेक्षाही मन आणि भावना समजून घ्याव्या लागतात, दोघांपैकी कोणीही खचले तरी एकमेकांचा आधार बनावा लागतो आणि यातील प्रत्येक गोष्ट करणारी जोडपीच आपला संसार सुखाने करताना दिसतात. पण आजच्या काळात सुखाने संसार करणारे किती प्रमाणात दिसतात? आणि या सगळ्याचा विचार करताना विश्वासाला जाणारा तडा किंवा विश्वासाचा अभाव हीच कारणे प्रामुख्याने दिसून येतात. विश्वासाला तडा जास्त करून कोणत्या गोष्टीमुळे जात असेल तर तो अनैतिक संबंधातून. यातून अनेक वाईट घटना घडतानाही समाजात पाहायला मिळतात. आता खरे पाहिले तर लग्न झाल्यानंतर बायकोने आपल्या नवऱ्याला फसवू नये आणि त्याचप्रमाणे नवऱ्याने आपल्या बायकोला फसवू नये हे एक तत्व पाळले तर तुमच्या संसाराला कुणाचीही दृष्ट लागत नाही आणि ही गोष्ट फार काही अवघड नसते. पण नवरा बायको यांच्या नात्यातील पवित्रता न समजणारे गुपचूप , नाहीतर उघडपणे एकमेकांना फसविताना दिसतात. ज्यावेळी लग्न होते तेव्हा तनामनाने एकमेकांना स्वीकारलेले असते आणि असे असतानाही जर का आपण एकमेकांना न सांगता काही गोष्टी करत असू तर त्याला कोणताही अर्थ उरत नाही. जगाला सांगण्यापुरते ते नाते होऊन जाते आणि प्रेम, विश्वास याला अशा नात्यांमध्ये जागा नसते.
एक मुलगी ज्यावेळी आपल्या आई-वडिलांना सोडून एका मुलाशी लग्न करते त्यावेळी तिने आपले सर्व नवऱ्याला बहाल केलेले असते. पण काही दिवसानंतर, तो नवरा जर दुसऱ्या वरती प्रेम करतोय,हे जर त्या मुलीला समजले तर यासारखे दुर्भाग्य कोणतेच नसते, ती स्वतःलाच कमनशिबी समजू लागते. समाजात वावरताना अब्रूच्या भीतीमुळे, ती या गोष्टी कुणालाच सांगत नाही. नवऱ्या वरती असणाऱ्या विश्वासाला तडा गेल्यामुळे तिच्या मनाला होणाऱ्या यातना कुणालाच समजू शकत नाही. रोज झुरण तिच्या आयुष्याचा एक भाग बनून जातो. या अशा संबंधातून एक नाही तर दोन कुटुंबे उध्वस्त होताना दिसतात. अशावेळी मनात विचार येतो लग्नानंतर हक्काचा नवरा ,दुसरीकडे हक्काची बायको, मुलं असताना देखील यांना असं का वागू वाटत असेल. यातून दोघेही जर वाईट वागत असतील तर मुलांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? या प्रश्नाचे उत्तर काही सापडत नाही. वाईट वागणारी लोक सहसा ओळखता देखील येत नाहीत. प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे करून, समाजात चांगुलपणाचा देखावा करत या व्यक्ती वाईट वागत असतात. भोळी बायको असेल तर नवऱ्याच्या सगळ्या चुका पोटात घेऊन येणारा दिवस ढकलत जाते आणि बायको जर बंडखोर असेल आणि नवऱ्याच्या बाह्यसंबंधाविषयी समजल्यानंतर ती नवऱ्याला सुधारण्याची संधी देते, त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही तर घटस्फोट घेऊन वेगळी राहते. यात दोन्ही स्त्रियांच आयुष्य बरबादच होते. आणि या उलट नवरा चांगला असेल आणि बायको वाईट चालीची असेल तरी असेच होते. असे वागणाऱ्या नवरा बायकोच्या नात्यात विश्वासाला काहीच महत्त्व नसते.
अशा गोष्टींबद्दल विचार करताना मन अस्वस्थ होते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम व विश्वासाला किती महत्त्व असते आणि यालाच तडा गेला तर जगायचं कसं? म्हणून लग्न झाल्यानंतर या पवित्र नात्यातील प्रामाणिकपणा जपायलाच हवा आणि नसेल जमत तर अशा व्यक्तीने लग्नच करू नये, दुसऱ्याच आयुष्य बरबाद करण्यासाठी. आणि याच व्यक्ती तर समाजात वावरताना मात्र चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरत असतात. पण यात एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की, या गोष्टी लपून कधीच राहत नाहीत आणि सत्य उशिरा का होईना उजडात येतेच. आपण त्यानंतर मात्र कोणता निर्णय घ्यायचा किंवा आयुष्यभर झुरायचं हा निर्णय प्रत्येकाच्या आयुष्यातील स्वतःचा निर्णय असतो. एका सोबत लग्न करायचं, दुसऱ्या सोबत बोलायचं आणि तिसऱ्या सोबत झोपायच असं वागणाऱ्या व्यक्तींना, आपण चुकीचं वागतोय असं कधीच वाटत नसेल का? आपल्यामुळे कुणाला तरी त्रास होत असेल याची मनाला जाणीव होत नसेल का? अशा गोष्टींचा विचार मनात येत नसेल तर अशा व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यातून दूर करण्यातच खऱ्या अर्थाने शहाणपण असते. कारण चूक न करणाऱ्यानेच नेहमी दुःख का भोगायचं आणि वाईट वागत असूनही त्यांनी मात्र आनंदी राहायचं ,हा कोणता न्याय म्हणायचा. दोन्ही बाजूंनी विश्वास असेल तरच नाती टिकतात हे मात्र खरेच.

Comments
Post a Comment