" सुधा मूर्ती " लिखित कादंबरी " अस्तित्व " मराठीत अनुवाद प्रा. ए.आर.यार्दी ...पुस्तकाचा सारांश Short Summary
पुस्तकाचे मुखपृष्ठ
लेखिका: सुधा मूर्ती
ज्यावेळी आपण अस्तित्व या शब्दाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी प्रत्येक व्यक्ती आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा खटाटोप करताना दिसते. एखाद्या ठिकाणी जर का आपल्या असण्याने किंवा नसल्याने काहीच फरक पडत नसेल, तर मात्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि " सुधा मूर्ती " लिखित " अस्तित्व " ही कादंबरी, या कादंबरीचा नायक मुकेश, याच्या जन्मापासून पुढील आयुष्याला वाचकांसमोर मांडण्याचा आणि त्याबरोबर मानवी स्वभावाच्या अनेक छटा समजावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. ही कादंबरी मूळ कन्नड भाषेत " तुमुला " या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. तसेच या कथानकावर आधारित एक मालिका देखील दूरदर्शनवर गाजलेली आहे. त्यामुळे या कादंबरीचा मराठीत अनुवाद प्रत्येक मराठी माणसाला आनंद देणारा आहे. समाजात वावरताना त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबात अनेक नाते निर्माण करत असताना, काही नाती जन्मजातच आपल्याला चिकटलेली असतात. व्यक्तींच्या स्वभावात राहणीमानात जरी बदल असला, तरी देखील त्यांना समजावून घेऊन प्रेम देणारे अनेक ऋणानुबंध कुटुंबातच तयार होत असतात.
या कादंबरीची सुरुवात लंडनमधील हिमवृष्टी आणि त्याचवेळी स्केटिंगचा आनंद घेणारे अनेकजण दिसतात. त्यामध्ये कादंबरीचा नायक मुकेश आणि त्याची बायको वासंती त्या ठिकाणी आहे. वासंती स्केटिंगचा आनंद घेत आहे, पण मुकेशला स्केटिंग येत नसल्यामुळे,तो एका ठिकाणी बसलेला आहे. त्यावेळी तो विचार करत असताना, त्याच्या प्रेम कहानीबद्दल वाचकांना समजते. हे दोघेही आपले आयुष्य आनंदाने जगत असल्याचेही लक्षात येते. मुकेश हा बीबीसी मधील एका विभागाचा अधिकारी असल्याने आणि त्यातही भारतीय संस्कृतीशी जोडलेला असल्याने त्याला घरची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही,नोकरी काय करायला आवडत होते. आई-वडिलांचे त्याच्यावर खूप प्रेम होते, ज्याप्रमाणे प्रत्येक आई वडीलांचे आपल्या मुलावर असते तसेच. मुकेशला ज्यावेळी मुंबईतील जे. जे. स्कूलमध्ये शिकायचे होते, त्यावेळी त्याची आई मात्र काळजीपोटी इतक्या लांब शिकायला जाण्याची परवानगी देत नव्हती. या सगळ्या गोष्टींना आठविण्याचा प्रयत्न मुकेश करत असतानाच, वासंती टेकडीवरून उतरताना तोल सावरता न आल्यामुळे, झाडावर जाऊन आदळते आणि त्यामध्ये तिचा पाय मुरगळतो. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर आठवडाभर विश्रांतीचा सल्ला डॉक्टर देतात, त्यानंतर मात्र तो एकटाच घरी येतो. घरी आल्यानंतर त्याला काही कॉल आलेले असतात, त्यामध्ये एक कॉल त्याच्या बहिणीचा असतो आणि त्यात नीरजाचा रडण्याचा आवाज येत असल्याचे आणि वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे घरी लवकरात लवकर येण्याबद्दलचा संदेश असतो. आणि वासंतीला हॉस्पिटलमध्ये सोडून वडिलांना बघण्यासाठी तो निघतो. विमानातून बेंगलोरला येईपर्यंत, त्याचे वडील कृष्णाराव ज्यांना गावात खूप मान असतो आणि त्यांच्या चांगल्या स्वभावाबद्दल ते गावात परिचित असतात, या प्रत्येक गोष्टीची त्याला आठवण येत असते. कोणत्याही गोष्टीचा आग्रह न करणारे वडील, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला मुकेशचा पायगुण समजणारे, न मागता प्रत्येक गोष्ट देणारे वडील. आणि ते आजारी असल्याबद्दल येणारा निरोप त्याचे मन अस्वस्थ करतो. आणि घरी पोहचल्यानंतर ते गेल्याचे समजते. मुकेशचे आणि त्याच्या वडिलांचे नाते खूपच वेगळे होते, मृत्यू जवळ आलेला असतानाही त्यांना मुकेशला काहीतरी सांगायचे होते. पण काही न सांगता वडील मुलाला सोडून गेले होते. वडिलांचे अंत्यसंस्कार करून अस्थिविसर्जनासाठी तो बाहेर पडतो आणि त्याचवेळी त्याच्या आयुष्यात एक वादळ तयार होते,ज्याची त्याला कोणतीच कल्पना नसते.
वकील मृत्युपत्र घेऊन येतात,त्यामध्ये सगळी संपत्ती त्यांनी मुकेशच्या नावावर केलेली असते. आणि काही ठराविक रक्कम बायकोच्या नावावर आणि राहिलेली रक्कम मुलगी निरजाच्या नावे केलेली असते. या गोष्टीमुळे निरज्याच्या नवऱ्याला खूप धक्का बसतो. मुकेश घरात नसताना वकील आणि काही कागदपत्रे शोधत असताना, त्या ठिकाणी नीरजा आणि मुकेशचा एक फोटो सापडतो आणि त्या पाठीमागे फोटो काढल्याची तारीख लिहिलेली असते. त्या फोटोत गिरीजा व मुकेश या दोघांचेही वय समान वाटत असते. त्यामुळे गिरजाच्या नवऱ्याच्या मनात संशय निर्माण होतो. आणि त्याबद्दल खरे समजल्यानंतर मुकेशाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण होतो. मुकेश घरी परतल्यानंतर आपल्या आईला त्याच्या जन्माविषयी म्हणजेच, तो त्यांचा मुलगा आहे किंवा नाही याबद्दल विचारतो. त्यावेळी सुमती, त्याची सांभाळ करणारी आई त्याच्याविषयीचे सत्य उघड करते. तिच्या सांगण्यानुसार कृष्णराव आणि सुमती नोकरी असणाऱ्या ठिकाणी राहत होते आणि त्यांच्या शेजारी रुपिंदर कौर आणि परविंदर कौर हे जोडपे राहत होते. सुमती पाण्याची समस्या जाणवल्या वर रुपिंदरपाशी पाणी आणण्यासाठी जाते आणि त्यातूनच त्या दोघींची मैत्री होते. एकमेकांची मुले आपापसात खेळू लागतात. रुपिंदरच्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सुमतीला माहिती होऊ लागतात. तिच्या सांगण्यावरून तिचा मुलगा मुकेश म्हणजेच मुन्ना , त्याचे वडील नेहमीच रागराग करत असतात कारण त्यांचा व्यवसाय त्याच्या पायगुणामुळे बुडाला अशी मानसिकता वडिलांच्या आणि घरातल्यांच्या मनात तयार झालेली असते. नवीन व्यवसाय करण्यासाठी जाताना नेहमी मुकेशला नेण्याचे ते नाकारत असतात. पुढे असाच एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी जात असताना,मुकेशला न्यायचे नाही असा ते निर्णय घेतात. त्यावेळी रुपिंदर आपल्या मुलाला सुमतीला नेण्याची आणि सांभाळण्याची विनंती करते. मुकेश सुमतीकडे राहायला आल्यानंतर काही दिवसांनी मुकेश आणि नीरजाचा फोटो काढलेला असतो, त्या फोटोमुळे त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असतो. दोघांचेही वय तेवढेच असते, पण त्यातही सुमती कडून, आपल्या आई-वडिलांची कहाणी ऐकत असताना, आपल्या पुढच्या मुलाला दुसऱ्याकडे देण्याचे धाडस कोणतीही आई, कोणत्याही परिस्थितीत करत नाही, त्यामुळे त्याला आपली खरी आई असणाऱ्या रूपिंदरच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटते. हेच कारण विचारण्यासाठी तो रुपिंदरचा पत्ता मिळून तिच्याकडे जाण्याचे ठरवतो.
त्यानंतर तो तिला भेटतो आणि तिच्याकडून एक वेगळीच कहाणी त्याला ऐकायला मिळते. रुपिंदर कौर अमेरिकेत राहत असताना शंटो बिगाट आणि नेनी बिगाट एक जोडपे त्यांच्याजवळ राहत असते. आणि एका कार अपघातात ते दोघेही मरतात आणि त्यांच्या दोन मुलांपैकी एक असतो,तो म्हणजे मुकेश, जो वाचलेला असतो. मुकेशची माहिती दिल्यानंतरही कुणी नेण्यासाठी येत नाही. मग रूपिंदर कौर त्याला आपल्यापाशीच ठेवण्याचे ठरवते. त्याच्या येण्यानंतर परविंदरचा धंदा डबघाईस येतो. त्यामुळे मुकेशला ते अपशकुणी समजू लागतात, त्याचा सतत रागराग करू लागतात. मुकेशला आपण रुपिंदर कौर आणि सुमती या दोघांचाही मुलगा नसून रेड इंडियन आहे याविषयी समजते. मी कोण? आपले अस्तित्व? काय याविषयी त्याला शेवटी समजते पण हा देखील त्याच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. तो ज्या घरात, ज्या आई-वडिलांपाशी मुकेश लहानाचा मोठा झाला आणि ते आई वडील त्याचे खरे आई-वडील नाहीत, हा खरा तर त्याच्या मनावर झालेला आघात असला तरी देखील एका कुतूहलापोटी तो आपल्या जन्मदात्यांचा शोध घेतो. नीरजाचा नवरा आपल्या बायकोला सर्व संपत्ती मिळावी यासाठी मुकेशला त्याच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. आपण या पृथ्वीतलावर जन्म घेतो तेव्हा अगदी लहान असल्यापासून,आपण आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत असतो, काही जण आपल्या कर्तुत्वाने समाजात आपले स्थान निर्माण करतात तर दुसरीकडे अनेक जण, काही न करता कधी या जगाचा निरोप घेतात हे समजत देखील नाही. या कादंबरीत मुकेशचे लहानपणापासूनचे आयुष्य अतिशय श्रीमंतीत,आरामात गेलेले असते पण अचानक सापडलेल्या एका फोटोमुळे,त्याच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होते. आणि ते समजल्यानंतर तेथील संपत्तीला बाजू देऊन, स्वतः कष्ट करून प्रत्येक गोष्ट मिळवण्याचे तो ठरवतो. म्हणजेच या कादंबरी मधून हेच लक्षात येते की, कुणालाही आपले अस्तित्व निर्माण करायचे असेल तर परिस्थिती कशी असली तरी देखील मनात जिद्द असेल तर त्या परिस्थितीला तोंड देण्याचे धाडस त्या ठिकाणी निर्माण होत असते. स्वतःच्या अस्तित्वाविषयी प्रश्न असणाऱ्या व्यक्तीचे भावविश्व समजण्यासाठी प्रत्येक वाचक प्रेमीने ही कादंबरी नक्की वाचायला हवी.

Comments
Post a Comment