Skip to main content

अंगावर फुटलेला कोड आणि त्यामुळे हरवते का माणुसकी?"सुधा मूर्ती " लिखित सुप्रसिद्ध कादंबरी "महाश्वेता " मराठीत अनुवाद "उमा कुलकर्णी " ....थोडक्यात सारांश

       


                              "सुधा मूर्ती " लिखित कादंबरी "महाश्वेताचे"मुखपृष्ठ 


     एखाद्या व्यक्तीला आपण चांगली किंवा वाईट असे लेबल देतो त्यावेळी बऱ्याचदा त्यांच्या असण्यापेक्षा, त्यांच्या दिसण्यावर जास्त भर देतो. एखादी व्यक्ती दिसायला चांगले असेल पण तिच्यावर चांगले संस्कार झालेले नसतील, वर्तन चांगलं असेल तरी देखील फक्त चांगल्या दिसल्यामुळे जर त्यांना समाजात मान सन्मान दिला जात असेल, तर या गोष्टीवर विचार करणे गरजेचे बनते. त्याचप्रमाणे कोणतेही आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना देखील कधी कधी भेदभावाची वागणूक दिली जाते. त्यावेळी त्यांच्या मनावर काही परिणाम होत असेल, याचा विचार आपण सहसा करत नाही. पण ज्यावेळी महाश्वेता ही कादंबरी वाचनात आली, त्यावेळी त्यांचे भविष्य खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर तरळून गेले. "महाश्वेता " या कादंबरीच्या मूळ लेखिका "सुधा मूर्ती " या आहेत आणि या कादंबरीचा मराठीत अनुवाद  "उमा कुलकर्णी " यांनी केलेला आहे. 

     या कादंबरीची सुरुवात होते ती एका हॉस्पिटल मधील महिलेच्या बाळंतपणाच्या सुटकेच्या घटनेतून. बाळाचा जन्म झाल्यानंतर डॉ. देसाई आपले सहकारी डॉ. आनंद यांना काही सूचना देऊन लेबर रूम मधून बाहेर येतात. या प्रसंगातून डॉक्टर देसाई आणि डॉक्टर आनंद यांच्या जवळच्या नात्याविषयी जाणवते. देसाई डॉक्टरांच्या घरी त्यांच्या शामराय नावाच्या मित्राची मुलगी अनुपमा, जी या कादंबरीची प्रमुख नायिका आहे, तिच्याबद्दल समजते. त्यावेळी डॉक्टर आनंद अनुपमाला  पाहतात आणि तिच्या सौंदर्याने मोहित होतात. सौंदर्याला ज्या उपमा दिल्या जातात, त्या सर्व अपुऱ्या पडतील असे अनुपमाचे सौंदर्य होते. आनंदाच्या मनात फक्त अनुपमाचा विचार चालू होता. अपंग संस्थेच्या आर्थिक मदतीसाठी अनुपमा एका नाटकात काम करणार होती आणि त्याच्या तिकीट विक्रीसाठी ती आनंद व डॉक्टर देसाई यांच्याकडे येते. आणि त्यातूनच आनंद आणि अनुपमा यांची ओळख होते. तिने दिलेली तिकीट आनंद घेतो व अनुपमाने प्रमुख भूमिका साकारलेले महाश्वेता नाटक बघायला जातो. त्या वेळेपासून तर तो अनुपमाच्या प्रेमातच पडतो. ते नाटक पाहिल्यानंतर अनुपमाच्या घरच्यांविषयी त्याचप्रमाणे तिच्याबद्दल इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतो. अनुपमाला असणारी तिची सावत्र आई तिचा नेहमीच छळ करताना पाहायला मिळते आणि त्यातच आनंद आपली सहचारिणी म्हणून अनुपमाची निवड करण्याचे ठरवतो. 

     आनंद त्याच्या आईकडून विरोध होत असला तरीही त्याचे कुटुंबीय आनंदाच्या हट्ट पुढे नतमस्तक होतात आणि काही दिवसांतच दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचे लग्न होते. अनुपमाला स्वतःच्या या भाग्याचा हेवा वाटत असतो पण, त्यावेळी पुढे काय घडणार आहे याची पुसटची कल्पना देखील तिला नसते. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आनंद सौंदर्यवती अनुपमाची वाटेल की हौस पुरवायचा, तिला कोणत्याही गोष्टीची कमी जाणवणार नाही याची देखील काळजी घ्यायचा. पण पुढे काही दिवसांनी आनंद त्याच्या विषयातील अजून ज्ञान मिळवण्यासाठी इंग्लंडला जाण्याचे ठरवतो. सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी तो एकटाच पुढे जाणार होता आणि थोड्या दिवसांनी अनुपमाला देखील नेणार होता. ज्या लक्ष्मीनिवासात आनंद सोबत असताना अनुपमाला अतिशय छान वाटायचे, त्याच घरात तिचा जीव करमेनासा झालेला होता. घरातील छोट्या-मोठ्या कामांमध्ये मन गुंतवन्याशिवाय तिच्याजवळ कोणत्याही पर्याय शिल्लक नव्हता. घरी एकटे असताना तिला तिच्या  ननंदेच्या अनैतिक संबंध विषयी समजले,पण घरी किंवा आनंदला सांगण्याचे धाडस झाले नाही. गिरीजा ही तिची ननंद तिचे वागणे बदलायला तयार नव्हती, त्याचप्रमाणे ती गरीब नसल्याने कोणती अडचण येत नव्हती. अनुपमाची असणारी सासू ,अनुपमाशी सुरुवातीपासूनच अंतर राखून वागते. प्रत्येक दिवस आनंदाच्या आठवणीतच जात होता. या सर्व गोष्टी घडत असताना एका वेगळ्या आयुष्याला तिला सामोरे जावे लागते. या अतिशय सुंदर वातावरणात शुक्रवारची लक्ष्मी पूजा करण्यासाठी घरातील सर्वजण जमलेले होते. सुवासिनींना हळदी कुंकू लावण्याचे काम चालले होते, त्यामध्येच पूजा चालू असताना धूप जाण्यासाठी निखारे पाहिजे असतात, त्यावेळी नारायणाचार्याकडून निरोप आल्यानंतर अनुपमा गडबडीने निखारे आणण्यासाठी जाते आणि त्यावेळी तिच्या पायावर निखारा पडतो. त्यामुळे होणारी तगमग थांबवण्यासाठी ती पायावरती थंडगार पाणी ओतते. पुढे त्या जळलेल्या जागे मोठा फोड येतो, तो फुटून जखम होते. जखम भरून आल्यानंतर त्या जागी आग व्हायला सुरुवात होते. यामध्येच काही दिवस निघून जातात आणि एक छोटासा पांढरा डाग  तिला पायावर दिसतो. अनुपमाने ज्या आयुष्याची वाट बघितली असते, त्यामध्ये अंधार दिसायला सुरुवात होते. अंगावर कोड येणे येणे, हा नशिबाचा भाग असला तरी ते पटवून कसे देणार? या अनेक प्रश्नांनी तिला अपराधी वाटू लागते. नवरा आनंद इंग्लंडला गेलेला असतो, घरात सासूबाई राधाक्का आणि ननंद गिरीजा असतात पण त्यांना याबाबत सांगणे म्हणजे स्वतःवर स्वतःच संकट ओढवल्यासारखेच तिला वाटते. तिच्या पायाला भाजल्यामुळे हा डाग दिसतोय ,का खरंच हा कोड आहे याविषयी चौकशी करण्यासाठी ती  दवाखान्यात चोरून जाऊ लागते. दवाखान्यातील तपासणीनंतर तो कोड असल्याची खात्री होते. त्यानंतरही दवाखान्यात ती चोरून जात असते आणि त्यातच एकदा अनुपमाची सासू तिला दवाखान्यातून बाहेर पडताना बघते. सासूने विचारल्यावर ती खरे सांगत नाही पण पाय घसरून पडल्यावर मात्र साडीचा निऱ्यामध्ये लपवलेला तो कोड सर्वांना दिसतो. आता यानंतर काय होणार याबद्दल काही कल्पना केली नसताना, अनुपमाची सासू अनुपमाच्या घरच्यांनी आपल्या मुलाला फसवल्याचे सतत बोलू लागते. हा कोड सुरुवातीला नव्हता, सासरी आल्यानंतर कोड फुटलाय या अनुपमाच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आणि तिला हा कोड जाईपर्यंत माहेरातच राहण्याबद्दल सांगितले जाते. 

       एकापाठोपाठ मनावर आघात होत असताना निदान आपला नवरा आनंद आपल्याला स्वीकारेल याबद्दल  तिला खूप विश्वास असतो. पण जन्मोजन्मीची साथ देण्याचे वचन देणारा आनंद अनुपमाच्या एकाही पत्राला उत्तर देत नाही. ज्या सौंदर्यावर भूलून आनंदाने घरच्यांचा विरोध असताना देखील लग्न केले होते, पण कोड फुटल्यावर आनंदला अनुपमा कुरूप वाटू लागते. ती गोष्ट आईकडून आनंदला समजल्यावर तो अनुपमाशी कोणताही संपर्क ठेवत नाही. अनुपमा माहेरी आलेली तिच्या सावत्र आईला अजिबात आवडत नाही, या माहेरात तिचा सतत अपमान होऊ लागतो. या मानसिक छळातून आत्महत्येचा विचार तिच्या मनात येतो पण त्यातूनही सावरून मुंबईला असणाऱ्या मैत्रिणीकडे जाऊन ती जॉब करू लागते. त्यातील काही रक्कम ती  वडिलांनाही पाठवते. लग्नाआधी असणारी उमेद आणि हुशारी यांचा उपयोग करून ती काम करत असते. अंगावर असणारा कोड वाढतच आलेला असतो पण आत्ता तिला त्याची अजिबात काळजी वाटत नसते. ज्या मैत्रिणीकडे राहत असते तिचा नवरा ही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या मैत्रिणीला याबद्दल अजिबात न सांगता ती दुसरीकडे राहून काम करत राहते. आता पूर्ण शरीरावर कोड पसरलेला असतो, त्यातच डॉक्टर वसंत आणि सत्याशी अनुपमाची ओळख होते. यातच सत्या आजारी असताना अनुपमा त्याची खूप काळजी घेते, हे पाहिल्यावर डॉक्टर वसंत तिला गावाकडील रुग्णांची सेवा करण्याकरता येण्याची विनंती करतो, पण ती नकार देते. महाश्वेता हे नाटक पुन्हा एकदा ती रंगमंचावर सादर करते. आनंदला त्याच्या चुकीची जाणीव होते, पण अनुपमा कोणत्याही परिस्थितीत त्याच्याबरोबर जाण्याचे नाकारते. लहान मुलांना शिकविण्यासाठी आणि रंगभूमीला जोडले जाण्यासाठी घेतलेला निर्णय ती कठोर मनाने स्वीकारते. 

     अनुपमा आनंदशी बोलत असताना जी वाक्ये वापरते, ती वाचकांच्या मनाला वास्तवाची जाणीव करून देतात. जेव्हा समाजात वावरत असताना, अंगावर कोड असलेल्या व्यक्ती बघतो तेव्हा काहीतरी गंभीर आजार असल्यासारखी त्यांना समाजात वागणूक दिली जाते. हा रोग संसर्गजन्य नाही, हे माहिती असूनही या कादंबरीतील डॉक्टर आनंद अनुपमाला स्वीकारत नाही, यातूनच समाजात या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो याची प्रचिती येते. या व्यक्तीच्या मनात त्यामुळे किती संघर्ष चाललेला असतो याची जाणीव ही कांदबरी वाचत असताना होते. त्यामुळे माणसाला समजून घेणे खूप अवघड असतं ,पण अशा कादंबऱ्या वाचण्यात आल्या तर मात्र त्यांच्या भावाविश्वाची, संघर्षाची तसेच दुःखाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. समाजातील प्रत्येक घटकांनी अशा लोकांना स्वाभिमानी जगण्यासाठी कौतुकाचे चार शब्द बोलले तर त्यांचे आयुष्य वेगळ्या वाटेने जाऊ शकते, हेच या कादंबरीतून लक्षात येते.  

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

"अनिल बर्वे" लिखित नाटक "आकाश पेलताना " short summary सारांश

           अनिल बर्वे लिखित नाटक   "आकाश  पेलताना " खऱ्या अर्थाने हे नाटक म्हणजे समाजकारण आपण कशाला म्हणतो आणि त्या पाठीमागे असणारे सत्य किती विदारक असू शकते, त्याचप्रमाणे यामधील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन या दोन्हीमध्ये मध्य साधत असताना जाणवणारे वास्तव मनाला सुन्न करून जाते. हे नाटक जरी काल्पनिक पात्रांना घेऊन लिहिले असले तरी त्यामध्ये  राजकारण कशा पद्धतीने असू शकते यावरही हे नाटक भाष्य करते.राजकारणाकडे बघत असताना सत्ताकारण आणि समाजकारण  कसे बदलते हे देखील या नाटकाच्या माध्यमातून लक्षात येते.            हे पुस्तक म्हणजे राजकारण आणि समाजकारण यामधील वास्तव परिस्थिती यावर विचार करायला भाग पाडते. या नाटकाची सुरुवात एका दृश्याने होते, ज्यात दोघेजण दारू पीत बसले आहेत आणि त्यांच्यात राजकारण आणि एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेले खून याबद्दल चर्चा चालली आहे. प्रत्येक गोष्ट घडण्यापाठीमागे एक व्यवस्था काम करत असते आणि तीच जर का भ्रष्ट असतील तर त्याठिकाणी चांगल्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. य...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...