Skip to main content

जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करू शकतो.. "डॉ. द.व्यं. . जहागिरदार " लिखित "स्टीफन हॉकिंग " यांचे चरित्र.. थोडक्यात सारांश

      


            "डॉ.द.व्यं.जहागिरदार " लिखित "स्टीफन हॉकिंग " या पुस्तकाचे मुखपृष्ठ 

                                        पृष्ठसंख्या: ९५

   अनेक व्यक्ती समाजात आपण पाहतो, ज्या समाजात वावरताना स्वतःची तुलना इतरांशी करतात. आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीकडे काय जास्त आहे,याचा विचार करून बऱ्याचदा दुःखी  होतात. आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टीची किंमत कळण्यासाठी विचारात खूप परिपक्वता असावी लागते, हे झाले शरीराने आणि बुद्धीने धडधाकट असणाऱ्या व्यक्तींसाठी. पण ज्यावेळी जन्मतः किंवा कोणत्यातरी आजाराने एखाद्याला अपंगत्व आले तर मात्र त्या गोष्टीची,त्याच्या दुःखाची कल्पना देखील आपण करू शकत नाही. पण अशा संकटातून पुढे जाऊन आपल्या  इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या जोरावर समाजापुढे एक आदर्श उदाहरण तयार करणाऱ्या महान व्यक्ती देखील आहेत,त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्यातील क्षमतेपेक्षा जास्त यश आपण संपादन करू शकतो. भौतिकशास्त्रात आपल्या ज्ञानातून, अभ्यासातून दबदबा निर्माण करणाऱ्या संशोधक "स्टीफन हॉकिंग " यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी डॉ. द. व्यं. जहागिरदार यांनी लिहिलेल्या स्टीफन हॉकिंग या चरित्रातून समजतात, यातूनच वाचक म्हणून स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. या स्टीफन हॉकिंग यांच्या जीवन चरित्राच्या अंतरंगात त्यांचे सुरुवातीपासूनचे आयुष्य, असाध्य आजार झालेला असतानाही त्यांनी केलेले संशोधन, त्यांनी दिलेली अनेक व्याख्याने तसेच त्यांच्याविषयी जवळच्या व्यक्तींची असणारी मते या सर्व गोष्टींचा समावेश आहे. प्रत्येक गोष्टीची तक्रार करणाऱ्या, अनेक कारणे देणाऱ्या व्यक्तींसाठी स्टीफन हॉकिंग यांचे चरित्र म्हणजे आपल्या क्षमतांची जाणीव करून देणारा मूलमंत्र आहे.

      स्टीफन हॉकिंग यांचा जन्म आणि मृत्यू महान शास्त्रज्ञांशी जोडला गेलेला आहे. दुसरे महायुद्ध चालू असताना, रात्रीच्या वेळी शत्रूच्या विमानांकडून बॉम्बफेक व्हायची. पण अशी युद्धजन्य परिस्थिती असताना जर्मन वैमानिक केंब्रिज आणि ऑक्सफर्ड या विद्यापीठीय शहरांवर बॉम्बफेक करत नव्हते. त्यामुळे इंग्लिश वैमानिकही जर्मनीतील विद्यापीठीय शहरांवर बॉम्बफेक करीत नव्हते. या सर्व परिस्थितीचा विचार करताना फ्रॅंक आणि इसाबेल आपल्या बाळाचा जन्म ऑक्सफर्ड या शहरात देण्याचे ठरवितात. सर्व विचारांती ८ जानेवारी १९४२ रोजी स्टीफन विल्यम हॉकिंग याचा जन्म होतो. हा स्टीफनचा जन्मदिवस खूप खास आहे,कारण याच दिवशी,तीनशे वर्षांपूर्वी नवविज्ञानाचा प्रणेता गॅलिलिओ मरण पावला होता आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या न्यूटनचा जन्म झालेला होता. स्टीफनचे आई वडील ऑक्सफर्डला शिकलेले होते पण घरची परिस्थिती बेताचीच होती. शिक्षणाचे महत्त्व दोघांनाही माहीत होते. त्यामुळे स्टीफन अकरा वर्षांचा असताना,त्यांनी लंडनच्या प्रसिद्ध पब्लिक स्कूलमध्ये शिकले पाहिजे असे त्यांना वाटत होते. पण स्कॉलरशिपच्या वेळेस आजारी पडल्यामुळे गावातील स्कूलमध्ये त्याला प्रवेश घ्यावा  लागतो. शाळेत असल्यापासूनच त्याची बुद्धिमत्ता अतिशय कुशाग्र होती. या वयातच अतींद्रिय आकलन शक्ती याविषयी जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न केला पण अमेरिकेतून आलेल्या एका व्याख्यात्याने त्यामधील भंपकपणा दाखवून दिला आणि त्यापासून स्टीफन दूर झाला. तो बारा वर्षांचा असताना दोन मित्रांनी त्याच्यावर पैज लावली होती, त्यामधील एकाच्या मते स्टीफन आयुष्यात काहीही करू शकणार नव्हता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यातील सुप्त गुण माहित असणाऱ्या मित्राला हे विचार मान्य नव्हते. अभ्यासात तो कधीही नंबरात नसायचा पण याशिवाय बोटिंग करण्यात त्याला आनंद वाटायचा,त्याचप्रमाणे घड्याळ, रेडिओ कसे काम करतात हे पाहणे देखील त्याच्यासाठी आनंदाचा क्षण असायचे. जगातील अतिबुद्धिमान शास्त्रज्ञ म्हणून स्टीफन ओळखले जातात, पण वयाच्या आठ नऊ वर्षापासूनच आपल्याला शास्त्रज्ञ व्हायचे आहे, हे ठरविणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

       प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन, त्यापाठीमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न स्टीफनचा होता. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असताना, दिवसात फक्त एक तास  अभ्यास करत. पुढे शेवटच्या वर्षात कॉस्मॉलॉजी या विषयाची निवड केली आणि पी.एच.डी साठी केंब्रिज विद्यापीठात अर्ज केला. केंब्रिजमध्ये १९६२ ला तो दाखल झाला आणि पहिल्याच वर्षात त्याला स्वतःच्या शरीरात होणारे बदल जाणवू लागले. हिवाळ्याच्या दिवसात तो घरी आला, त्यावेळी बुटाची लेस बांधणे देखील अवघड वाटू लागले. घरातल्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले. तेव्हा अनेक टेस्ट केल्यानंतर त्याला "मोटारन्यूरॉन "डिसीज झाल्याचे समजले. या आजारात शरीरातले स्नायूंचे  नियंत्रण निघून जाते, स्नायूंची हालचाल करणारा मेंदूचा भाग खराब होतो आणि सुरुवातीला एक एक अवयव निकामा होऊन चालणे, बोलणे, खाणे सर्वच बंद होते. ही अवस्था एखाद्या व्यक्तीसाठी  जिवंतपणे मेल्यासारखी होती. स्टीफनच्या मित्राच्या सांगण्यावरून, आपल्याला मरण जवळ आणणारा आजार झाल्याचे समजल्यानंतर तो पूर्ण नैराश्येत गेला होता. डॉक्टरांनी तर तो फक्त दोन वर्षांचा सोबती असल्याचे सांगितले होते. पण दवाखान्यातून घरी आल्यावर त्याच्या मनात असंख्य विचार चालू झाले. दोन वर्षे निघून गेली आणि आजार वाढला नाही तर आजाराची वाढ खुंटली, आणि यामुळेच स्टीफनचे आयुष्य बदलून गेले. कामात तडजोड न करता आपल्याला मिळालेल्या बोनस आयुष्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे त्याने ठरवले. शारीरिक विकलांगता आणि अपंगत्व असतानाही स्टीफन हॉकिंग यांनी विश्वाची उत्पत्ती आणि त्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टींचे संशोधन केले. पुढे जेन वाइल्ड या मुलीशी त्यांनी लग्न केले. १९७० मध्ये स्वतःच्या पायावर त्यांना चालता येत नव्हते पण तरीही व्हीलचेअरवर बसून ते विश्वाच्या निर्मिती बद्दलचा अभ्यास आणि संशोधन करत होते. जेन या त्यांच्या पत्नीची त्यांना आयुष्याच्या या कठीण प्रसंगातही मोलाची साथ लाभली. तिने स्वतःची नोकरी सोडली आणि आपल्या तिन्ही मुलांना वाढवले. प्रत्येक गोष्ट करत असताना, आपल्या नवऱ्याच्या जगण्यासाठी आवश्यक असणारा पाठिंबा तिने नेहमी दिला. पी.एच.डी प्रबंध टाईप करण्याचे काम देखील तिने प्रामाणिकपणे केले. अनेक व्याख्यानानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली, त्याचप्रमाणे जीनियस,दुसरा आईन्स्टाईन या नावानेही अनेक सहकारी त्यांना बोलावू लागले. वयाच्या एकविसाव्या वर्षी मोटार न्यूरॉन आजाराने त्यांना ग्रासले. त्यांची मुलगी ल्युसी अठरा वर्षांची असताना चांगल्या शाळेत घालण्यासाठी पैसे आवश्यक होते आणि ते मिळवण्यासाठी त्यांनी " A Brief History of Time " हे पुस्तक लिहिले आणि विश्वनिर्मितीची प्रक्रिया सोप्या भाषेत सांगणारे हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर गाजले. 

      पुढे हॉकिंग स्वित्झर्लंडला गेल्यावर त्यांना न्यूमोनियाचा त्रास सुरू झाला, श्वास गुदमरू लागला आणि डॉक्टरांनी त्यांची श्वसननलिका काढण्याचे ठरवले. सुरुवातीला अस्पष्ट आवाजात होणारे उच्चारही बंद झाले. २४ तास आयुष्यभरासाठी मदतनीस त्यांच्यासाठी ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे वॉल्ट वोल्टोझ संगणक तज्ञाने त्यांच्यासाठी एक संगणक तयार करून दिला आणि बोटांच्या, डोळ्यांच्या, शरीराच्या थोड्याशा हालचालीने देखील ते बोलू शकत होते. स्टीफन यांनी तिथून पुढे दिलेली व्याख्याने स्पीच सिंथेसाइजरच्या माध्यमातून दिली. पंचवीस वर्षानंतर जेन आणि स्टीफन विभक्त झाले त्याबद्दलची कोणतीही कारणे दोघांनीही दिली नाहीत. १९८० पासून परिचारिका असणाऱ्या इलेन मॅसनशी स्टीफन यांनी दुसरे लग्न केले. महास्फोट, कृष्णविवरे आणि काळाची सुरुवात व शेवट याविषयी त्यांनी संशोधन केले. परग्रहावरील जीवन प्राथमिक स्वरूपात असेल परंतु; बुद्धिमान जीव तेथे असू शकणार नाही असे मत त्यांनी मांडले. त्याचप्रमाणे अपंगत्वामुळे आपण संशोधनावर अधिक लक्ष देऊ शकलो असे मत स्टीफन हॉकिंग व्यक्त करतात. अनेक पदव्या, बक्षीस यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. सहा आंतरराष्ट्रीय बक्षिसे, सहा सन्माननीय डॉक्टरेट, ल्युकेशियन प्रोफेसर ही मानाची पदवी, रॉयल ॲस्ट्रॉनॉमिक सोसायटीचे सुवर्णपदक, पदार्थ विज्ञानातील वूल्फ फ्राइझ त्यांच्या संशोधन कार्यातील योगदानासाठी देण्यात आले. थिओरॅटीकल कॉस्मोलॉजीमी, काँटम ग्रॅव्हिटी स्ट्रिंग थिअरी,काळ व अवकाश इत्यादी विषयावर त्यांनी संशोधन केले. अशा या थोर शास्त्रज्ञाला त्यांच्या कार्यासाठी सलाम करावासा वाटतो कारण, शारीरिक अपंगत्व असून देखील त्यांनी केलेले संशोधन विश्वाच्या निर्मितीच्या संकल्पनेला नवी दिशा देणारे ठरले.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

"अनिल बर्वे" लिखित नाटक "आकाश पेलताना " short summary सारांश

           अनिल बर्वे लिखित नाटक   "आकाश  पेलताना " खऱ्या अर्थाने हे नाटक म्हणजे समाजकारण आपण कशाला म्हणतो आणि त्या पाठीमागे असणारे सत्य किती विदारक असू शकते, त्याचप्रमाणे यामधील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन या दोन्हीमध्ये मध्य साधत असताना जाणवणारे वास्तव मनाला सुन्न करून जाते. हे नाटक जरी काल्पनिक पात्रांना घेऊन लिहिले असले तरी त्यामध्ये  राजकारण कशा पद्धतीने असू शकते यावरही हे नाटक भाष्य करते.राजकारणाकडे बघत असताना सत्ताकारण आणि समाजकारण  कसे बदलते हे देखील या नाटकाच्या माध्यमातून लक्षात येते.            हे पुस्तक म्हणजे राजकारण आणि समाजकारण यामधील वास्तव परिस्थिती यावर विचार करायला भाग पाडते. या नाटकाची सुरुवात एका दृश्याने होते, ज्यात दोघेजण दारू पीत बसले आहेत आणि त्यांच्यात राजकारण आणि एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेले खून याबद्दल चर्चा चालली आहे. प्रत्येक गोष्ट घडण्यापाठीमागे एक व्यवस्था काम करत असते आणि तीच जर का भ्रष्ट असतील तर त्याठिकाणी चांगल्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. य...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...