Skip to main content

चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यातील या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? हेच जाणून घ्यायचं असेल तर "ल. म. कडू " लिखित चरित्र "चार्ली चॅप्लिन " नक्की वाचायला हवे

    


                                                पुस्तकाचे मुखपृष्ठ 

                                                लेखक: ल. म. कडू 

                                               एकूण पृष्ठसंख्या : १००

     प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख संघर्ष आव्हाने असतात पण त्या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर पडून बोलता येणाऱ्या, बोलू न शकणाऱ्या, ऐकणाऱ्या ,ऐकू न शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हसवणारा अवलिया म्हणजे चार्ली चॅप्लिन. एक विनोद वीर स्वतःच्या संपूर्ण आयुष्यात असणारे दुःख विसरून फक्त हसवण्यासाठी आयुष्यभर झटत राहतो. त्यांच्या अनेक चित्रपटांनी, दुःखात असणाऱ्या अनेक जीवांना हसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या अभिनयाची दखल घेऊन अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ज्यांचे नाव ऐकल्यावरही आपल्या ओठांवर हास्य निर्माण होते, ते म्हणजे चार्ली चॅप्लिन. त्यांनी आपल्या वेदना, दुःख,  संघर्षाचे प्रसंग दाखवून जगाला  हसविले परंतु; त्यांच्या हसण्यामुळे कोणालाही दुःख होणार नाही याची देखील काळजी घेतली. जगाच्या इतिहासात दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या या महान कलाकाराला जाणून घेणे म्हणजे एक प्रेरणाज्योत तेवत ठेवल्या सारखेच आहे.

    चार्ली चॅप्लिन यांचे आयुष्य समजावून घेण्यासाठी लेखक ल. म. कडू यांनी  लिहिलेले चार्ली चॅप्लिन यांचे चरित्र वाचले आणि मुक अभिनयातून जगाला हसवणाऱ्या या अवलियाची खरी कहाणी समजली.एकोणीसाव्या शतकात आताच्या सारखी मनोरंजनाची साधने उपलब्ध नव्हती आणि सगळीकडे अशीच परिस्थिती असल्यामुळे लंडनमधील हॅना आणि चार्ल्स स्पेन्सर हे दांपत्य प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम करीत होते. त्यातही  हॅनाचा आवाज गोड असल्यामुळे ते दोघे गाण्याचे कार्यक्रम करायचे आणि त्यातून जे पैसे मिळायचे त्यावर त्यांचे आयुष्य चालले होते. कार्यक्रम अर्धा झालेला असताना थोडा वेळ असायचा आणि त्यात चार्ल्सला दारूचे व्यसन लागले. त्या व्यसनामध्येच तो दोन मुलांना आणि हॅनाला सोडून निघून गेला. हॅनाच्या दोन मुलांपैकी चार्ली चॅप्लिनचा जन्म १६ एप्रिल १८८९ मध्ये लंडनमध्ये झाला आणि त्यासोबतच त्याचा सावत्र भाऊ सिडनी देखील त्याच्यासोबत राहत होता. नवरा अचानक निघून गेल्यानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी हॅनावर येऊन पडली होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळात,  गरिबीत आयुष्य जगत  हॅना लंडनमध्ये राहत होती. जर कुणी पोटापुरते कमवू शकत नसेल तर त्यांना श्रमालयात पाठवले जात आणि  हॅनाला हे नको होते. पोटभर जेवण मिळावे याकरिता प्रमाणापेक्षा जास्त काम करून घेतले जाईल, या भीतीपोटी आपल्या मुलांचा सांभाळ आपणच करायचा अशी तीव्र इच्छाशक्ती एका आईची होती. आणि त्यातूनच आपल्या मुलांसाठी लीली या टोपणनावाने गाण्याचे अनेक कार्यक्रम हॅना करत होती. त्यामुळेच चार्ली चॅप्लिन आपल्या संपूर्ण आयुष्यात आईला कधीही विसरत नाही, त्याचप्रमाणे आपल्या आईसारखी परिपूर्ण स्त्री त्याला कुठे भेटली नसल्याचे देखील तो सांगतो. त्याच्या आयुष्यात वडील सोडून गेल्यानंतर, एक आई मुलांसाठी झटते, झगडते यावर विश्वास बसत नाही. डोक्यावर टोपी, अंगात कोट, हातात काठी आणि गबाळेपण घेऊन वावरणाऱ्या या कलाकाराच्या खऱ्या आयुष्याची कहाणी समजावून घेताना चार्ली चॅप्लिन अधिक जवळचा वाटू लागतो. 

     एके दिवशी त्याची आई  हॅना कार्यक्रम करत असताना अचानक तिचा आवाज नेहमीसारखा येत नव्हता आणि त्यामुळे प्रेक्षकांत टिंगल टवाळी सुरू झाली, दारू पिऊन आलेले प्रेक्षक आचकट विचकट हावभाव करू लागले, रंगमंचावर सडलेली फळे पडू लागली. हॅनाला हा अपमान सहन न झाल्यामुळे तिने रंगमंच सोडला पण त्यानंतर आणखीनच गोंधळ वाढला. हा गोंधळ कमी होत नव्हता आणि त्यातच एका पाच वर्षाच्या छोट्या कलाकाराची रंगमंचावर एन्ट्री झाली, तो कलाकार म्हणजेच सुप्रसिद्ध विनोदवीर चार्ली चॅप्लिन. एखाद्या मुरलेल्या कलाकाराप्रमाणे त्याने Jack Jones well known हे गाणे म्हणायला सुरुवात केली. आणि  प्रेक्षकांना त्याचे गाणे आवडले, रंगमंचावर नाणी पडू लागली, ती गोळा करतच तो अजून नवीन गाणी म्हणू का? असे विचारू लागला. पुढे त्याने त्याच्या आईच्या आवाजात हुबेहूब गाणे म्हणून दाखवले. आणि याच दिवसापासून आईचा रंगमंच बंद झाला आणि चार्ली चॅप्लिनच्या अभिनयाला सुरुवात झाली. त्याची आई, तो आणि त्याचा भाऊ सिडनी या दोघांनाही अभिनयाचे धडे देत होती. जगातल्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्याची, दिग्दर्शकाची जडणघडण एक आई करत होती. त्याच्या आईने माणसे टिपण्यास ,माणसे ओळखण्यास शिकविले. त्यानंतर तो ज्यावेळी शहरात फिरायचा त्यावेळी भेटणारी प्रत्येक व्यक्ती त्याच्या अभ्यासाचा विषय असायची. चार्ली आणि सिडनी लहान असताना छोटी मोठी कामे करून उदरनिर्वाह करत होते. त्या परिस्थितीतच हॅनाला डोक्यात प्रचंड वेदना होऊ लागल्या, दवाखान्यात महिनाभर रहावे लागले. त्यामध्ये सिडनी  श्रमालयात गेला आणि चार्ली एका नातेवाईकाकडे. आई आजारी आहे या कारणामुळे सरकारी अधिकाऱ्यानी त्यांना "सेंट्रल लंडन डिस्ट्रिक्ट पूअर लॉ स्कूल"  मध्ये दाखल केले. काही दिवसांनी आईच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, या कारणामुळे त्या दोघांना वडिलांकडे पाठवले पण वडिलांच्या व्यसनामुळे आणि रागीट स्वभावामुळे ते दोघे तिथून निघून आले. या माय लेकरांची होणारी ताटातूट एक दिवस थांबली आणि आई बरी होऊन मुलांपाशी परत आली. 

      एकदा शाळेत "मिस प्रीसिलाज कॅट" या कवितेला स्वतः लावून चार्लीने ती कविता गायली. आणि या वेळी आपण सामान्य नाही तर आपल्यात काहीतरी खास असल्याची त्याला जाणीव झाली. १८९८ मध्ये त्याने शाळा बंद केली आणि गरिबीतही आपल्यातला कलावंत नाहीसा होऊ नये यासाठी एका नृत्यपथकात तो काम करू लागला. त्या पथकात असतानाच अनेक गाजलेल्या कलावंतांच्या अभिनयाचा त्याने अभ्यास केला. आणि दोन वर्षांनी त्या पथकातून तो बाहेर पडला. जहाजावर सिडनी, तर आई शिलाई काम करीत होती. पुढे अकरा वर्षांचा असताना चार्ली मिळेल ते काम करत होता, डॉक्टरच्या हाताखाली, काचेच्या कारखान्यात नळ्या फुंकण्याचं काम त्याने  केले. १४ वर्षांचा असताना आईला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. वडील चार्ल्स वारले होते आणि भाऊ परदेशात नोकरीला अशाप्रकारे त्याच्या आयुष्याची घडी पूर्णपणे विस्कटली होती आणि तो पुन्हा एकदा एकटा पडला होता. पहिल्यापासून गरिबी आणि त्यामुळे आलेले गबाळेपण, तो बुटका असला तरी देखील देखणा होता. त्यातूनच सोळाव्या वर्षी त्याचे "विस्टाएंड " या नाटक कंपनीत पदार्पण झाले. अनेक नाटकांत अनेक भूमिका चार्ली करत होता. एका पायावर तो गिरकी घ्यायचा आणि अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना आवडत  होत्या. १८१० मध्ये कॉर्नो या दिग्दर्शकाने चार्लीला सोबत घेऊन अमेरिकेचा दौरा काढला आणि त्यावेळी त्याचे सर्वश्रेष्ठ विनोदी कलाकार म्हणून नाव झाले. नाटकातील अभिनय पाहिल्यानंतर कीस्टोन या नामवंत चित्रपट कंपनीने एका भूमिकेसाठी चार्लीला बोलावले. आणि हॉलीवुडमध्ये अभिनेता, दिग्दर्शक या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी या कंपनीत ३५ चित्रपट काढले. पुढे अनेक चित्रपटातील विनोदी अभिनयाने तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करू लागला.विनोदी प्रसंगासाठी लांबून शॉट घेणे आणि भावनिक प्रसंग जवळून दाखविणे, अशी त्याची दिग्दर्शनाची साधी पद्धत होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही चार्ली अत्यंत साधा राहणारा माणूस होता. पुढे १९१५ ला "द ट्रॅम्प " हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यातील सामान्य लोकांचे प्रतिनिधित्त्व करणारा छोटा भटक्या सर्वांच्य पसंतीस उतरला. युरोपातून अमेरिकन आलेल्या लोकांना ही व्यक्तिरेखा उभारी देऊन जायची. "द गोल्डरश ", पॉन शॉप ","द इमिग्रंट ","शोल्डर आर्म्स " यासारखे असंख्य चित्रपट प्रदर्शित झाले आणि गाजले. मनाला कितीही दुःख असले तरी चार्ली चॅप्लिनचे मुकचित्रपट मनाला आनंद देऊन जातात. त्याची हालचाल, हावभाव आणि त्यासोबतच कामातील तल्लिनता दाखवताना हा कलाकार लोकांना मनापासून हसवितो. कलाकाराचा अभिनय प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत असतो. आणि याठिकाणी तर काहीच न बोलता सर्व काही समजावू पाहण्याची धाटणी पाहताना चार्ली चॅप्लिन मधील कलाकाराला सलाम करावासा वाटतो.

     त्याच्या वैवाहिक जीवनात,  सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारा चार्ली पहिल्यांदा मिल्ट्रेड हॅरिस सोबत विवाहबद्ध झाला. त्यांना मूल झालं आणि तीन दिवसांची सोबत देऊन निघून गेले. या गोष्टीमुळे चार्ली पूर्णपणे कोलमडला आणि त्यातूनच एका नव्या चित्रपटाचा जन्म झाला "द किड ".यानंतर १९२० मध्ये पती पत्नी कायदेशीररित्या वेगळे झाले. एका गल्लीबोळातील, उपाशी काबाडकष्ट करणाऱ्या चार्लीने हॉलिवूड जिंकले होते. आणि त्यामुळेच चर्चिल, आइन्स्टाईन, चाउ एन लाय, महात्मा गांधी, पिकासो, बर्नार्ड शॉ, एच. जी. वेल्स हे या सगळ्यांनी त्याच्याशी संवाद साधला होता. १९२५ मध्ये लीटा ग्रे हिच्याशी चार्लीचे लग्न झाले, १९२६ मध्ये मुलगा झाला पण १९२७ ला घटस्फोट झाला. या घटना घडत असतानाही हा कलाकार थांबणार नव्हता. १९३८ मध्ये "द ग्रेट डिटेक्टर " चित्रपटात हिटलर आणि मुसोलिनी  या हुकूमशहांचा खरा चेहरा त्याने चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणला. १९४२ अमेरिकन नाटककाराच्या ऊना हिच्याशी त्याचे चौथ्यांदा लग्न झाले, त्यांना मुलगी झाली आणि हे लग्न मात्र त्याला पाठबळ देणारे ठरले. अशा या विनोदवीराला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. १९६२ साली डॉक्टरेट पदवी, १९७१ साली पॅरिसने " द ग्रांद मेदाई द व्हेरमई" हा किताब, राणी एलिझाबेथ दुसरी यांनी सर हा किताब, १९७२ मध्ये लॉस एंजलिसने वॉक ऑफ फेम म्हणून निवड केली. ८० चित्रपटांची निर्मिती करूनही त्यांना येशू ख्रिस्तावर चित्रपट करण्याची इच्छा होती, ती अपुरीच राहिली. कारण २५ डिसेंबर १९७७ मध्ये अठ्ठ्याऐशी वर्षांचे असताना ते झोपेतून उठले नाही. हा त्यांचा प्रवास वाचत असताना , त्यांच्याविषयीचा अभिमान अजून अधिक वाटू लागतो.


Comments